Wednesday, November 12, 2014

पानगळ नव्हे बहर

पानगळ सुरु झाली कि मला नेहमी प्रश्न पडायचा , झाडाला नसेल का होत दुक्ख आपलीच पाने सोडून देताना ? श्रावणात बहर आल्यावर लोक त्या झाडापाशी उभे राहून सौंदर्याची तारीफ करत असतात , प्रेमी युगुलांना ते आपलेच  वाटत असते , पंथास्थाना  ते निवांतपणा  देणारा आसरा वाटत असते. सौंदर्याची लयलूट होणारे मोसम , ती श्रीमंती , तो थाट अनुभवणारे झाड अचानक पानगळ आली म्हणून सगळे अगदी एखाद्या निष्काम कर्मयोग्याप्रमाणे सोडून देते ? कसे काय जमत असेल . नसतील का होत वेदना ?

मला माझ्या कामाचा शेवट अगदी नजरेच्या टप्प्यात येईपर्यंत वाटत होते कि झाडाला पण वाटत असेल वाईट . मला सुद्धा वाटले.  एक एक पान टाकून देणाऱ्या झाडाप्रमाणे मी एक एक जबाबदारी हातावेगळी करत होते. मी माझे वाटणारे एक एक नियमित वापरातले साहित्य कामाच्या प्रोसेस प्रमाणे रिलीज करत होते. तेव्हा आता हे आपण पुन्हा वापरणार आहोत कि नाही हे चित्र सुद्धा स्पष्ट होत नव्हते. अगदी क्रेडीट कार्डला बंद केले तेव्हा हे आता शेवटचे काम. आता जाताना फक्त माझा रोजच्या वापराचा पी सी मी सोडून देणार कि समाप्ती .पण पुढे काय असा एक उगाचच प्रश्न

पण मग मला त्या झाडामध्ये आणि माझ्यामध्ये एक साम्य  दिसले. पानगळ येते तीच नव्या पालवीची ओळख घेऊन . कोणत्याही गोष्टीचा शेवट नसतोच कधी . ती तर एका नवीन सुंदर गोष्टीची सुरुवात असते, किंबहुना आत्तापर्यंत झाडाला मिळालेल्या सौंदर्यात त्याला जी ओळख नव्हती मिळाली ती त्या पालवीने मिळणार असते. आता डेरेदार नसेल झाड…  पण एक सृजन कलाकार येउन झाडाला पाहून म्हणतो " तुझ्याकडे पाहतानाच आयुष्यात नवीन पालवी फुटण्याची आशा मिळते . जगण्याची खरी उमेद तुझ्याकडूनच तर मिळते. "

पानगळीचे हे आगळे रूप सृजन मनालाच कळेल . सौंदर्याचा आस्वाद घेणारा असो , कि प्रेमी युगुल कि कोणी पांथस्थ..  प्रत्येकासाठी झाडाचे बहरलेले रूप क्षणिक सुख होते. पण पालवीने आयुष्याला उमेद दिली होती नव्याने जगण्याची !!

माझ्या कामाचा शेवट करताना माझ्या आयुष्यात येणारी उमेद आहे माझी नवीन भूमिका !! माझे नवीन आयुष्य हे या  आत्ता बहारदार वाटणाऱ्या आयुष्यासारखे  क्षणभंगुर नाही . मला आता एक कायमची ओळख मिळणार आहे. आई असण्याची ओळख . जी शाश्वत आणि कायमस्वरूपी असेल. एका निस्वार्थी , निरपेक्ष आयुष्याची सुरुवात असणार आहे ती  . या जाणीवेने मन अगदी बहरलय !! श्रावणात डेरेदार दिसणाऱ्या झाडासारखेच… जे पानगऴ  होऊन गेल्यावरच बहरते !! हि पानगळ नव्हे  हा तर आहे बहर ….  सौंदर्याचा बहर