Wednesday, June 9, 2010

मीटिंग

मीटिंग मध्ये बसून मीटिंग बद्दल लिहिण्याचे धारिष्ट्य आमच्यासारखे मीटिंग मध्ये लक्ष नसलेलेच करू शकतात !! पण माझे मीटिंग मध्ये बसलेल्या प्रत्येकावर लक्ष होते म्हणूनच ह्या लिखाणाचा जन्म झाला आहे . अर्थात या प्रकरणाचा मला किती कंटाळा आहे असे वाटून घेऊ नकात. उलट माझ्या आतला कलाकार या कामाच्या धबडग्यात जागा राहतो..... आणि त्याला जागे ठेवणारी जागा म्हणजे मीटिंग रूम .


मीटिंग !! काय शब्द आहे हा !! कोणी शोधून काढला असले देव जाणे पण हे प्रकरण शोधणारा एक तर अतिशय कामसू असेल , किंवा कामाचा कंटाळा आला म्हणून त्याने एकत्र गप्पा मारण्याची जागा शोधली असेल . मग ऑफिस च्या वेळेत गप्पा मारण्याचा उत्तम मार्ग म्हणून त्याने त्याला मीटिंग असे नाव दिले असेल. चला आपण पहिली शक्यता खरी मानू कारण दुसरी शक्यता शक्य असण्याची शक्यता जरा कमी वाटते ( मीटिंग च्या चर्चेत हे असले अशक्य शब्द मला सुचत आहेत )


काय चालते नेमके या मीटिंग मध्ये??? तर .... इथे खरोखर काम करणारी माणसे बोलत असतात ( आत्मीयतेने वगैरे विशेषण लावता येईल असे बोलतात हो हे लोक !!! ) , आणि काम न करणारे लोक एखादा असा कामाचा प्रश्न विचारतात कि ज्याची चर्चा उगाच ताणली जाते आणि मग मीटिंग ची लांबी वाढते .अर्थातच काम न करणाऱ्यांना ते हवेच असते , जेणेकरून आपल्या जागेवर पुन्हा लवकर जाण्याची वेळ येऊ नये आणि कामाला पुन्हा एकदा ( आधी केलेली असते कि नाही ठावूक नाही पण म्हणूयात पुन्हा एकदा ) सुरुवात करावी लागू नये.


आता प्रेझेन्टेशन देणारा उगाच साहेबाला घाबरून सज्जनपणे बोलत असतो. आणि लिहून आणलेले मुद्दे नीट नेटक्या पद्धतीने मांडत असतो. साहेबगिरी गाजवताना साहेब पण न चुकता एखादा मुद्दा ठळकपणे हे संगयाला हवे असे उगाच आंग्ल भाषेत सांगत असतो. आणि प्रेझेन्टेशन देणार्याला अजून बोलायला प्रवृत्त करत असतो.
काही जण तोंड उघडून जोरात आवाज काढून जाम्भयी देता येत नाही म्हणून तोंड दाबून बसलेले असतात आणि मग जरा जरा वेळाने ते डोळे टिपत असतात. काही जण उघड्या डोळ्यांनी चक्क झोपलेले असतात.आता डुलक्या घेताना त्यांची मान होकारार्थी हलत असते कि ते खरच मधून मधून जागे होऊन मान डोलावून आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत असतात ते त्यांचे त्यांनाच ठावूक पण अधून मधून माना हलत असतात हे खरे.

काही लोक गालातल्या गालात हसत एकमेकांना काहीतरी खुणावत असतात. कोणी डोळे चोळत असते , कोणी नाक खाजवत असते , कोणी कान खाजवत असते. गम्मत म्हणजे नको तिथे खाज येत असल्याने अस्वस्थ !! असे पण काही प्राणी असतात !! वहीत टिपणे काढण्याच्या निमित्ताने शेजारी शेजारी बसून काही लोक ब्लॉग पोस्ट लिहित असतात . वहीत टिपणे काढण्याच्या निमित्ताने शेजारी शेजारी बसलेले दोन लोक एकमेकांना " तो पहा $$$$ कसा डुलकी घेतोय " अशा लोकांकडे वेधून घेणाऱ्या सूचना करत असतात. अचानक कोणीतरी हलवल्यावर जागे होणारे असतातच !! ते मधेच एखादे वाक्य ऐकलेले असते त्याला अनुमोदन देऊन मोकळे होतात ( मनातल्या मनात हुश म्हणतात !! ) .

हो पण याचा अर्थ तीथे कोणाचेच लक्ष नसते असे नाही हम्म !! बाहेर गेल्यावर नेमके आपल्या गळ्यात कोणते काम पडले आहे आणि त्याच्याशी संबंधित माणसे कोण आहेत याच्याकडे प्रत्येकाचे लक्ष असते . बाहेर जाऊन कोणाला कोणता प्रश्न विचारायचा याची तयारी झालेली असते. काही लोक खरेच चर्चा आणि त्यातून पुढे तयार होणार वाद याच्यात प्रामाणिक सहभाग घेत असतात . काही लोक आपल्याला हलवल्यावर योग्य मुद्द्यावरच बोलत असतात. काही लोक हे आधण अजून जरा वेळ कसा चालेल ते पाहत असतात.
बाहेरचा पाऊस सगळ्यांना बोलावत असतो . पण ए सी ची कुबट हवा सोसत सगळेच बसलेले असतात.छान चहा हवा असे मनातून वाटत असते.आता आमच्यासारखे काही लोक बाहेर बसलेल्या एच आर ला चहा पाठव असा एक मेसेज टाकतात आणि मग मीटिंग आवरती घेऊन चहा नको आता झालंच आहे असे सांगून साहेब मीटिंग थांबवतात .

पण मला मात्र हि मीटिंग चालूच राहावी असे वाटते कारण माझ्याकडून एका नवीन कलाकृतीचा जन्म होत असतो . आणि मला ते काम पूर्ण करूनच बाहेर पडायचे असते .कारण मीटिंग मध्ये माणसे जितकी जास्त तितका सावळा गोंधळ आणि लोकांचे बारकावे टिपण्याची संधी जास्त असते. तितके लिहायला मुद्दे जास्त असतात. पण या सगळ्यापेक्षा पावसासोबत एक कप चहा हवा म्हणूनपळायची घाई जास्त असते म्हणून मी पण मीटिंग रूम मधले लिखाण आता आवरते घेते आणि पावसाकडे धावत जाते.