Thursday, March 10, 2011

पाउस ... !!

मुसळधार पाउस कोसळत होता .. पावसाचा तो आवाज ... आणि सोबत गाणी ... गारवा  ssssss .. एकटेपण खाऊन टाकेल असे वाटले कि गाणीच तिला सोबत करत. मग ते घर असो , गर्दी असो कि ऑफिस , सगळीकडे गाण्यांची तिला सोबत .. आज तर पाउस पण सोबत करत होता. उगाच लग्नाचा अल्बम चाळत बसलेली ती . अगदी हरवून गेलेली कुठेतरी...

" तांदूळ खाऊ नको लग्नात पाउस पडेल .."   .. " अगं आई मी न जानेवारीत लग्न करेन मग पाउस कसा पडेल ?"  .. हा संवाद आठवला आणि स्वतःशीच हसली . मुठभर कच्चे तांदूळ घेऊन ते तासभर खात  राहणे हे काही कधीच सुटले नव्हते न ?? खरेच काही संबंध आहे का तांदूळ आणि पाउस यांचा ?? नेमके जून मध्ये लग्न ठरले आणि ते हि जोरदार पावसाने वरातीचे स्वागत करून  ..घोड्यावर बसून नवरा येणार हे स्वप्न स्वप्नच राहिले ..... तो असाहि घोड्यावरून आला नसताच . " मला छान छौकी आवडत नाही . उगाच का दिखावा करायचा ?? सरळ सही करून लग्न करायचे. आणि सप्तपदी झाली नाही तर तू माझी नाही का होणार ? हे नवीन खूळ घेऊन नको येउस ग . आपण सहीचे लग्न करायचे ..एकदम सही आयडिया आहे हि "  असा उगाच शब्दांची कोटी करून हसायचा तो . पण तिची इच्छा होती म्हणून मोजकी १०० माणसे बोलावून लग्न करायचे ठरले. त्यात पण यादी करताना नेमके कोणाचे नाव गाळावे हा चर्चेचा विषय बनला होता त्या काळात . आई आणि तो किती टाळ्या देत हसायचे एकमेकांना .. ते चित्र क्षणभर समोर आले आणि मी किती भाग्याची असे वाटून गेले तिला. 

" हा पाउस आलाच हम्म .. खरा मित्र आहे तुझा हा  .. लग्नाला हजेरी लावलीच .. "  असे म्हणत तिच्यावर हसलेला तो , मग कुठेच फिरायला न जाता आल्यामुळे चिडलेला तो , आणि मग  रुसवा गेल्यावर तिच्यासाठी फुले आणणारा तो ... सगळेच सुंदर , अकल्पित.  त्याच्या नंतर खरा सखा वाटेल असा पाउसच तर होता . त्याच्याशिवाय जर ती कोणाला कवेत घेत असे तर तो पाऊसच होता . तो पण म्हणायचा कि " पाउस बनून बरसेन मी तुझ्यासाठी . पण फक्त मलाच या मिठीत जागा हवी . " वाटायचे कि किती प्रेम आहे त्याचे तिच्यावर.  प्रेम कि वेड हे तेव्हा उमजलेच नाही. निव्वळ हट्टी होता पण तो .

सुरुवातीला तिचे मित्र घरी येणे बंद केले आणि मग त्याचे मित्र पण ?? आईच्या शेवटच्या दिवसात तर मावस भाऊ सोडायला येतो म्हणून आईला घरी आणून ठेवलेले  त्याने . हे पण त्याने मावस भावाला हाकलून लावले तेव्हा समजले . तोवर वाटत होते कि किती प्रेमळ आहे हा .. अगदी स्वतःच्या आईप्रमाणे काळजी घेतो आईची . आई गेली तेव्हा पण पाउस बरसला . आभाळाला पण दुक्ख झालेले .. इतके ..कि रात्रभर धाय मोकलून आभाळ रडत राहिलेले.

माहेरची नाती तर त्याने कधी जुळू दिली नाहीत आणि सासरच्या कोणाला ती पसंतच नव्हती म्हणून कधी त्यांच्याशी संबंधाच नाही आला. पण तिने तिचे जग बनवलेले. त्यात होते ती , तो आणि वर्षातून चार महिने आवर्जून तिच्यासाठी बरसणारा पाउस. पाउस गेला कि उरलेले ८ महिने तिच्यासाठी कधी बोचरे वारे सुद्धा नसायचे . असायचे ते फक्त रखरखते उन . घरातही आणि घराबाहेरही !!

पण मग कधी कधी वळवाच्या पावसासारखा तो तिच्यावर बरसायचा आणि मग  ' आणखीन काय हवे त्याच्याकडून ?? '  असा विचार मनात चमकून जायचा .' कोणाची दृष्ट लागू नये या संसाराला 'असे वाटून जायचे. हि भावना होती म्हणूनच तर त्याच्याबद्दलची ओढ , प्रेम  अजूनही तशीच होते . मनातली भावना अगदी तशीच होती जशी पहिल्या भेटीतच त्याच्या प्रेमात पडल्यावर होती .. 'ह्याच्याशिवाय दुसरे कोणीच नसले तरी चालेल. पण तो नसला कि आयुष्याला काहीच अर्थ नसेल  '  हीच भावना तिला व्यापून होती. आणि त्याच्या मनात तर तिच्याशिवाय कोणत्याच गोष्टीला स्थान नव्हते. म्हणूनच त्याचे तिच्यावर प्रेम होते म्हणण्यापेक्षा त्याला तिचे वेड होते असे म्हणणे योग्य वाटेल !!  वेड्यासारखा प्रेम करायचा तो. आणि तिच्यासाठी ...  तोच तिचे सर्वस्व होता . त्याच्या संतापासकट प्रत्येक गोष्टीवर ती कायम मनापासून प्रेम करायची .

खिडकीतून तळवा बाहेर काढत तिने पावसाचे चार थेंब हातावर झेलले आणि जणू कोणीतरी हसत टाळी देत आहे असा भास झाला. वाटले पावसाने सोबत आईला आणले आहे. तोच स्पर्श , तोच ओलावा .. मायेचा !!  अचानक एक वीज कडाडली आणि समोरच्या झाडावर पडली . झाड जाळून खाक झाले. त्यानेच पावसाला टाळी देताना तिला पहिले कि काय असे वाटून घाबरून तिने खडकी बंद करून घेतली. इतके दिवस मनाच्या खिडक्या देखील अशाच बंद केल्या होत्या तिने ... तो जिवंत असेपर्यंत .. 

यांना blood  cancer  झाला आहे . हे शब्द आई गेल्यावर अगदी वर्षभरातच  कानावर आले आणि  आई गेल्यावर रात्रभर बरसणारे आभाळ त्या वेळी तिच्यावर कोसळले ...  त्याच्या सोबतचे शेवटचे ते क्षण किती छान होते .  जाताना " एकदाच मला तुझ्या कुशीत घे " हि त्याची विनवणी आणि मग डोळ्यात तरळून गेलेले पाणी. तो दिवस .. ती संध्याकाळ .. आणि आजची संध्याकाळ यात साम्य एकच होते . पाउस ...  !!  तो गेला त्या दिवशी बरसला , आई गेली त्या दिवशी बरसला तोच पाउस . 

आज तिला कोणाच्या तरी मिठीची नितांत गरज वाटली . ठीक एक महिन्याने.... त्याच्या मिठीची तहान लागली पण आता पावसाच्या थेम्बानेच फक्त ती भागणार होती . मनाच्या ..घराच्या खिडक्या उघडून तिने बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पहिले. दाराकडे धावत गेली . पावसाला कवेत घेतले आणि तिच्याच नकळत तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहायला लागले. तिने हव्रतासारखे पावसाच्या प्रत्येक थेंबाला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला . आणि गुडघ्यांवर खाली बसून आभाळा कडे पाहत ती जोरात ओरडली ... " आनंद मला नको रे सोडून जाउस .... मी अपूर्ण आहे तुझ्याशिवाय ... आनंद ...."  ...........प्रतिसाद म्हणून आभाळात एक वीज कडाडली ..... 

Tuesday, March 1, 2011

मला भेटलेल्या आजी

सावरकर स्मृतिदिनाच्या दिवशी मी आणि माझा नवरा एकत्र त्याच्या आई बाबांच्या निवेदनाला ऐकण्यासाठी मुद्दाम पुण्याहून पेण ला गेलो होतो . त्यांनी नेहमीच्या कामा व्यतिरिक्त केलेले हे पहिलेच सादरीकरण असावे कदाचित . पण ते त्या दिवशी एकत्र पहिल्यांदाच कार्यक्रम सादर करणार होते आणि आम्हाला भारी कौतुक म्हणून आम्ही पेण ला गेलो होतो. संध्याकाळी कार्यक्रम जोरदार झाला. सावरकरांवर आधारित गोष्टी आणि मग त्यांना बहारदार बनवणारे आई बाबांचे निवेदन आणि सोबतीला सावरकरांच्या कवितांनी केलेली वातावरण निर्मिती . या सगळ्यानंतर बराच वेळ आमचा पाय निघत नव्हता तिथून . आई बाबांना लोकांनी गराडा घातलेला आणि त्यांचे कौतुक चाललेले होते .  मी नवीन सून अनोळखी वातावरणात इकडे तिकडे पाहत बसलेले.

मी माझ्या साडीला सावरत बाजूला बसलेले. तेवढ्यात एक तरुण मुलगी आली . माझे छोटे छोटे केस आणि त्याच्यावर साडी असे रुप पाहून ... " तुम्ही मराठी साहित्य मंडळातल्या आहात का ?" असे विचारून गेली . "नाही ....पेहरावावरून शहरातल्या  वाटता म्हणून विचारले " असे म्हणून पुढे गेली . मला अचानक मी प्रभावी वगैरे वाटतेय कि काय असे वाटले .

इतक्यात एक आजी समोर आल्या . अंगात ढगळ म्हणावा असा एक भडक निळ्या रंगाचा सलवार कमीज अडकवलेल्या , तोंडात दात नसलेल्या , अतिशय कृश म्हणावे अशी शरीरयष्टी असलेल्या त्या आजी माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या , " तुम्ही इथल्या नाही दिसत . मराठी साहित्य मंडळात आहात का ? तुमच्याकडे पाहून तुम्ही काहीतरी वेगळे काम करत असाव्यात असे वाटले. मग मनातून वाटले कि तुमच्याशी बोलावे . " असे म्हणत जवळच्या कापडी पिशवीत हात घालत त्यांनी एक कागद बाहेर काढला !! " मी हे लिहिलेले . माझ्या शेजारी एक जण राहतात न त्यांना दाखवलेले मी हे लिखाण ... मी पुण्याच्या स . प  ची विद्यार्थिनी . मला शिकवायला पु ग सहस्त्रबुद्धे होते . त्या वेळेपासून लिहिते मी. पण हल्ली वाचायला कोणी नसते. आम्ही दोघेच इथे राहतो . मुलगी परदेशात आहे आणि मुलगा ठाण्याला असतो . मी सावरकर भक्त आहे एकदम  !! आणि आज मी हे वाचायला घेऊन आले होते. पण कार्यक्रम संपेपर्यंत कोणाला सांगू नाही शकले कि मी लिहून आणले आहे आणि मला हे वाचून दाखवायचं आहे . तुम्ही हे वाचाल असे वाटले. "  असे म्हणत त्यांनी एक कागद पुढे केला. सावरकरांचे चित्रच त्यांनी काढले होते. त्या कार्यक्रमातून आले समोर ते इतिहासातले सावरकर आणि या आज्जीच्या लेखणीतून समोर आले ते तिला आवडलेले ... तिने पाहिलेले सावरकर .

काय योगायोग असतो न ?? खूप दिवसात काहीच लिखाण न करू शकलेली मी आणि खूप काही लिहून कोणाला वाचायला देऊ न शकलेली आजी असे आम्ही  अशा वेळी समोर यावे . तिने पण नेमका मलाच कागद द्यावा . आणि मला माझ्याच वयाची लाज वाटावी . ७५+ वय असेल नक्कीच त्यांचे . आणि मी लग्नानंतर ३ च महिन्यात आळशी झाले आहे. गोष्टी मनात येतात पण कागदावर लिहिल्या जात नाहीत . वेळ मिळत नाही .... असल्या मूर्ख सबबी सांगत असते. मी मनातून ओशाळून गेलेले. ते लिखाण अगदी भाषण करण्याच्या तयारीत लिहिले असावे असे वाटत होते. पण आजींच्या वयाकडे पाहता .. फारच छान . शुद्ध भाषा , स्पष्ट विचार आणि सुसंगत मांडणी .

 " मी पण लिहिते. तुम्ही फारच छान लिहिले आहे. तुमची हरकत नसेल तर मी ते  तुमच्या नावाने इंटरनेट वर लिहीन . लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला पोस्टाने पाठवेन . मी हे xerox करून घेतले तर काही हरकत नाही न ?? "   " मी देते न स्पष्ट xerox मिळतात न त्या दुकानातून आत्ता काढून आणते , देव पावला बाई ... मला वाटलेच तुमच्याशी बोलावे असे , कोणी वाचायला नसते न घरी म्हणून मग मी असा कोणी वाचले कि खुश होते एकदम . देवानेच सांगितले मला तुमच्याशी बोलायला . तुमची तंत्रज्ञ भाषा काळात नाही मला. पण मी इंटरनेट वर कसे पाहीन माझे लेखन ?? मी शिकेन पाहिजे तर .. म्हणजे माझा लेख इंटरनेट वर कसा दिसतो कसे कळेल ? "  .

 " कागद द्या माझा नवरा काढून आणेल xerox . तुम्ही नका धावपळ करू . " असे म्हणत मी त्यांच्या हातातला कागद काढून घेतला आणि नवर्याला नजरेनेच आज्ञा केली आणि तो पण आजींच्या कौतुकात सामील होत दुकान शोधायला बाहेर पडला. पण रात्र बरीच झालेली . त्यामुळे दुकाने बंद झाली होती . कागद हलवत तो परत आला. मी त्यांना माझा पत्ता दिला " या पत्त्यावर पोस्टाने पाठवा ,मी तुमचे लिखाण तुमच्या नावाने सगळ्यांना वाचायला देईन . चालेल न ? " असे म्हणत माझा पत्ता त्यांच्या हातात दिला.  त्या खूप खट्टू झालेल्या खऱ्या पण दुकाने बंद झालेली त्यामुळे त्यांच्याकडे पर्याय नव्हता . त्यांनी मला त्यांच्या सुंदर अक्षरात त्यांचा पत्ता आणि फोन नंबर दिला. आणि माझा आणि त्यांचा संवाद सुरु झाला.

दूर बसलेल्या माझ्या दिराला हि आजी हिला बोर करतेय कि काय असे वाटल्याने त्याने मला बोलावून घेतले आणि मग मी काय करणारे हे ऐकून खुश झाला आणि मला म्हणाला कि जा आपण घरी गप्पा मारू. आत्ता जाऊन तू त्यांच्याशी गप्पा मार .

त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कोणत्याही फोटो मध्ये नाही दिसणार असा होता. बोळक्यात दात नसताना ते दाखवत बाहुली मिळाली कि हसून दाखवणारी लहान मुलगी आणि हि आजी यात काहीच फरक नव्हता वाटत . त्या भरभरून त्यांनी कोणकोणत्या विषयांवर लिहिले आहे हे बोलत होत्या. " सगळे जण सावरकरमय झाले तरच या देशाचे खरे आहे  "  इथपासून " असे आमचे गणपती आणि असा आमचा उत्सव " पर्यंत सगळ्या लिखाणांची मला माहिती मिळाली होती. आता ते सगळे लेख वाचायला कधी मिळतील असे मला झाले आहे .

त्यांचे लेखन मला पोस्टाने मिळाले कि त्यांच्याच नावाने मी मा बो वर लवकरच प्रकाशित करेन. त्याच्यावर सगळ्यांनी जरूर प्रतिक्रिया टाकाव्यात म्हणून लिखाणाचा हा खटाटोप .

आजींचे लेखन घेऊन लवकरच मा बो वर येईन आणि तेव्हाच त्यांचे नाव पण सगळ्यांना सांगेन . तोपर्यंत हा लेख वाचणार्यांचे आभार  !!