Wednesday, May 8, 2013

यमुनोत्री

हे लिखाण माझे नाही .  हे माझ्या  ८०  वर्षीय आजोबांचे अनुभव आहेत . सगळ्यांनी जरूर वाचा आणि आपली मते लिहा . ती मी त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचे लेखन व्यर्थ नाही हे त्यांना सांगण्याचा एक प्रयत्न करणार अहे. 

भारत मातेच्या लाडके , संस्कृतीच्या हृदय स्वामिनी , कृष्णाच्या संगिनी 
तुझ्या पुळणीवर …  बासरीच्या धुनीवर राधेसह गवळणी आणि आजचे स्त्री मन  बेभान होते. 

त्या यमुने , तुला आज रांगताना पाहतो आहे. तुझे अवखळ बेभान धावणे..  
तुझ्या दोन सहेल्या आणि तु. 

या उसळत्या निनादाने , या खोल दरीचा शेवट गाठण्याची स्पर्धा … पण तू प्रथम होतीस आणि या पहाडाने ल्याला होता हिर्या मोत्यांचा हार . ते तुझे अनादी आणि अविनाशी बाल्य मी पाहतो आहे . 

बाळे -
तू या परिसराचे  सर्वार्थाने जीवन बनून गेलीस . हि सारी माणसे , घोडे , गाड्या , यात्री , शासन यांचे संगोपन करतेस . 

हा निसर्ग सुद्धा किती भारावून गेलाय . तुझ्या बाल रूपाचा वेध घेत ह्या हिमशिखरांच्या संगतीत अन्तः करणात  वेडावून गेलो. 
तुझ्या अबोध जीवनात देव देवतांनी तुझा आश्रय शोधला . तपस्व्यानी ध्यान  धारणा केली . 

आम्ही सुद्धा आनंद शोधतोय . 
पण आज या क्षणी रमवलेस गं 

Monday, January 7, 2013

माणुसकी

पहाटे पहाटे जाग आली म्हणून मी उठून गच्चीत गेले. सुंदर प्रकाश खेळ नुकताच सुरु झाला होता. पक्षी किलबिलाट करत आपापल्या उद्योगाला लागले होते . आमची किलबिलाट करण्याची वेळ व्हायची होती.

आणि हे काय ...वासुदेव ??? कोणत्या तरी मराठी सिनेमात पहिला होता अगदी तसा. शाळेत बडबड गीताच्या पुस्तकातल्या चित्रात असतो तोच. वासुदेव !!

चिपळ्या वाजवत तो किती सुंदर गीत गात होता. नवऱ्याला हाक मारायला वळले आणि तेवढ्यात एक नऊवारी साडी नेसलेली एक म्हातारी कुठून तरी चालत आली आणि तिने वासुदेवाला काहीतरी झोळीत घातले. ' हे अजूनही चालते ?? ' मला उगाच प्रश्न पडला. पुण्यासारख्या शहरात ह्या गोष्टींचे अस्तित्व जपले गेले आहे ? आणि मला ठावूक सुद्धा नाही ??

वासुदेवाने आपले गाणे चालू ठेवले आणि तो चालत चालत जरासा पुढे गेला. बंडू काका त्याच्या समोर नेहमीचे वेडे चाळे करत आले आणि वासुदेवाने कसल्याश्या पिशवीतून काहीतरी त्यांना दिले. आणि आपले घाणेरडे हात आपल्या अति घाणेरड्या सदऱ्याला पुसत ते काहीतरी खायला लागले. ' दिवस उजाडला नाही आणि हे वेडं खातंय काय ?? ' असा मला प्रश्न पडला आणि कुतूहल देखील जागे झाले. नेमके कशाची देवाण घेवाण झाली असेल ?? त्या दिवशी का कोण जाणे बंडू काका नावाचा प्राणी मला माझ्या अवती भवती दिसला तरी मी त्यांच्या कडे कुतूहलाने पाहत होते. ते तीच पिशवी मिरवत होते. आणि जरा जरा वेळाने काहीतरी काढून खात होते.

बंडू काका - आमच्या सोसायटीत फिरत असतात. कोणी म्हणते कि त्यांच्या मुलीने सगळी प्रोपर्टी काढून घेतली आणि त्यांना हाकलून दिले. कोणी काय नि कोणी काय. लहान मुले त्यांच्या अवताराकडे पाहून घाबरून जायचे. आणि आमचं कार्टे रडायला लागले कि " बंडू काका ssss याssss ... याला न्या " असे म्हणायचं अवकाश आवाज एकदम बंद व्हायचा.

बंडू काका हे एक गूढ होते आमच्यासाठी. ते कोण ? कुठून आले? वसुदेवाने त्यांना काय दिले ? का दिले ? असे कितीतरी प्रश्न मनात रुंजी घालत होते . त्यांच्या हातातल्या पिशवीत काय असेल हे कुतुहल  जागे होते मनात ! दुसर्या दिवशी पहाटे  वासुदेवाच्या गाण्याचा आवाज येताच मी बाहेर जाऊन उभी राहिले आणि काल सारखाच प्रकार पुन्हा घडला. 

मी सुद्धा एका परातीत तांदूळ घेऊन वासुदेवाच्या पुढ्यात जाऊन उभी राहिले .  आणि मग तांदुळाने वासुदेवाची झोळी भरल्यावर न राहवून मी विचारले. काय देता तुम्ही बंडू काकांना ? वासुदेव गोड हसला. त्याच्या डोक्यावरच्या त्या मोर पिसांकडे  पाहून मला क्षणभर उगाचच खर्याखुर्या वासुदेवाचा  भास झाला. 


तो म्हणाला " ताई  ह्ये आमचे मालक हायती . अहो ह्यांच्यासाठी सकाळी हे वासुदेवाचे कपडे घालून येतो मी . मालक लई दिलदार . पण त्यांच्या पोरीने त्यांचे सगळे काढून घेतले आणि जावयाने डोक्यात हाणून त्यांना हाकलून दिले . त्या दिसापासून हे असा उघडे फिरत्यात. आम्ही हातावर पोट असलेली माणस पण साहेबांनी कधी काही कमी न्हाई केले. पण आम्ही काय देणार यांना ? मग रोज झोळीत पडेल ते बायको सकाळी  शिजवून देते . मी मालकांना आणून देतो आणि दिवसभर ते तेच खातात. अहो हे कोण हसणारे ? साले सगळे कर्ज म्हणून पैसे नेणारे लोक त्यांना आता दगड हन्त्यात. जीवाचे पानी  पानी  होतंय ताई . पन  त्यांना ठेवून घेतले तर आमची नोकरी जायची म्हणून हे मार्ग . लोक श्रद्धेपोटी द्येतात काही बाही. मालकांचे हाल पाहवत नाहीत ताई . देव देतो आणि  काढून पण घेतो .पण ताई उपकाराला जागावे आणि देवाकडे साहेबांचे औक्ष मागावे हे आता आमचे काम आहे. "

त्यांची मुलगी कोण हे समजल्यावर खूप धक्का बसला . वडील गेले म्हणून न चुकता त्यांचे श्राद्ध  घालणारी एक परिचित  बंडू काकांची त्यांना हाकलून  देणारी  मुलगी  आहे हा धक्का पचवणे  कठीण होते. 

बोलता बोलता डोळ्यात पाणी दाटून आले .मी वासुदेवाच्या रुपात खरा खुरा देव पाहिलेला त्याला नकळत हात  जोडले . वासुदेव गेला . त्याची आकृती धुसर झाली .

वास्तव हे कल्पनेच्या पलीकडचे असते ह्याचा प्रत्यक्ष अनुभव मी आज घेत होते. हि पहाट  माझ्यातल्या मला जागे करून गेली. बंडू काकांबद्दल असलेले कुतूहल संपले आणि मागे उरली एक जाणीव.... माणुसकी  मनापासून जगण्याची जाणीव  !!