Wednesday, November 12, 2014

पानगळ नव्हे बहर

पानगळ सुरु झाली कि मला नेहमी प्रश्न पडायचा , झाडाला नसेल का होत दुक्ख आपलीच पाने सोडून देताना ? श्रावणात बहर आल्यावर लोक त्या झाडापाशी उभे राहून सौंदर्याची तारीफ करत असतात , प्रेमी युगुलांना ते आपलेच  वाटत असते , पंथास्थाना  ते निवांतपणा  देणारा आसरा वाटत असते. सौंदर्याची लयलूट होणारे मोसम , ती श्रीमंती , तो थाट अनुभवणारे झाड अचानक पानगळ आली म्हणून सगळे अगदी एखाद्या निष्काम कर्मयोग्याप्रमाणे सोडून देते ? कसे काय जमत असेल . नसतील का होत वेदना ?

मला माझ्या कामाचा शेवट अगदी नजरेच्या टप्प्यात येईपर्यंत वाटत होते कि झाडाला पण वाटत असेल वाईट . मला सुद्धा वाटले.  एक एक पान टाकून देणाऱ्या झाडाप्रमाणे मी एक एक जबाबदारी हातावेगळी करत होते. मी माझे वाटणारे एक एक नियमित वापरातले साहित्य कामाच्या प्रोसेस प्रमाणे रिलीज करत होते. तेव्हा आता हे आपण पुन्हा वापरणार आहोत कि नाही हे चित्र सुद्धा स्पष्ट होत नव्हते. अगदी क्रेडीट कार्डला बंद केले तेव्हा हे आता शेवटचे काम. आता जाताना फक्त माझा रोजच्या वापराचा पी सी मी सोडून देणार कि समाप्ती .पण पुढे काय असा एक उगाचच प्रश्न

पण मग मला त्या झाडामध्ये आणि माझ्यामध्ये एक साम्य  दिसले. पानगळ येते तीच नव्या पालवीची ओळख घेऊन . कोणत्याही गोष्टीचा शेवट नसतोच कधी . ती तर एका नवीन सुंदर गोष्टीची सुरुवात असते, किंबहुना आत्तापर्यंत झाडाला मिळालेल्या सौंदर्यात त्याला जी ओळख नव्हती मिळाली ती त्या पालवीने मिळणार असते. आता डेरेदार नसेल झाड…  पण एक सृजन कलाकार येउन झाडाला पाहून म्हणतो " तुझ्याकडे पाहतानाच आयुष्यात नवीन पालवी फुटण्याची आशा मिळते . जगण्याची खरी उमेद तुझ्याकडूनच तर मिळते. "

पानगळीचे हे आगळे रूप सृजन मनालाच कळेल . सौंदर्याचा आस्वाद घेणारा असो , कि प्रेमी युगुल कि कोणी पांथस्थ..  प्रत्येकासाठी झाडाचे बहरलेले रूप क्षणिक सुख होते. पण पालवीने आयुष्याला उमेद दिली होती नव्याने जगण्याची !!

माझ्या कामाचा शेवट करताना माझ्या आयुष्यात येणारी उमेद आहे माझी नवीन भूमिका !! माझे नवीन आयुष्य हे या  आत्ता बहारदार वाटणाऱ्या आयुष्यासारखे  क्षणभंगुर नाही . मला आता एक कायमची ओळख मिळणार आहे. आई असण्याची ओळख . जी शाश्वत आणि कायमस्वरूपी असेल. एका निस्वार्थी , निरपेक्ष आयुष्याची सुरुवात असणार आहे ती  . या जाणीवेने मन अगदी बहरलय !! श्रावणात डेरेदार दिसणाऱ्या झाडासारखेच… जे पानगऴ  होऊन गेल्यावरच बहरते !! हि पानगळ नव्हे  हा तर आहे बहर ….  सौंदर्याचा बहर 

Monday, October 13, 2014

निरागसपण

पहाटे  पहाटे  जाग आली . डोळे किलकिले करून पाहिले तर शेजारी माझे गोंडस बाळ शांतपणे निजलेले . तीच निरागसता अजूनही चेहऱ्यावर आहे जी पहिल्यांदा मी हात हातात घेतला तेव्हा होति. ते निरागस हसू या रोजच्या धावपळीत कुठे दिसतच नव्हते . पण शांतपणे झोपलेल्या चेहऱ्यावर मात्र अगदी शोभून दिसतंय ते हसु. माझ्यावर अगदी निस्वार्थी प्रेम करणारे कोणीतरी म्हणून मी या निरागस चेहऱ्याकडे पाहिले . आणि अगदी खरेच तो निस्वार्थीपणा स्पर्शातून , बोलण्यातून , वागण्यातून मी रोज अनुभवला. कोणीतरी आपले असणे म्हणजे नेमके काय याच अर्थ मला त्या स्पर्शानेच शिकवलेला .

मला न दुखावता प्रत्येक गोष्ट करण्याची धडपड आणि अगदी कसलीच तक्रार नाही .  माझ्या प्रत्येक तक्रारीला , रागावण्याला समजून  घेऊन  सॉरी  म्हणत कुशीत शिरणे , कुरवाळणे आणि माझे चुकल्यावर आत्ता झोपल्यावर  दिसतेय न अगदी तशीच शांत मुद्रा ठेवत मला समजावणे .  कुठून अवगत झाल्यात त्या कला ? प्रेमापोटी असतील तर मग मला का नाही अवगत त्या कला  ?मी किती गृहीत धरले त्या स्पर्शाला , त्या आपलेपणाला .. याची जाणीव आज पहिल्यांदाच झाली . एवढी शांत मुद्रा नेहमीच असते पण मला ती आजच जाणवली.

किती नाती असतात आपलि. पण या नात्यात असे काय असते ? न रक्ताचे नाते असते न जन्मापासून नाळ जोडलेली असते. पण आपलेपणा , माया मात्र अगदी अनोखी.  कुठेतरी आतून कौतुक , कुठे व्यक्त होणारे कौतुक , कुठे  माया,कुठे नजरेतूनच व्यक्त होणारे प्रेम, कधी हट्ट तर कधी रुसवा  , रुसवा गेला तर कधी कडाक्याचे भांडण . कधी एक टोक तर कधी दुसरे पण तरीही प्रत्येक टोकाला असलेले आपलेपण .

श्वास मंद चालू आहे , डोळे मिटलेले  , चेहऱ्यावर कसले हसू आहे कोणास ठावूक पण आहे एक गोंडस हसू . माझे बाळ .  निरागस , शांत , प्रेमळ आणि माझ्याही नकळत मला जपणारे माझे कोणीतरी . माझा नवरा .

सूर्या थोडा वेळ थांब .उजाडू नको देउस . पहाटेचे हे गोंडस रूप मला जरा अनुभवू दे.  उशीर होऊ देत आज . पण हे निरागसपण मला माझ्या डोळ्यात साठवून घेऊ देत.

आत्ता उठेल हा  आणि अगदी छोट्या बाळासारखा चहा बनेपर्यंत माझ्या अवती भवति फिरेल . आणि एकदा कप मिळाला कि त्याच्यातला नवरा ताजा होऊन जाइल आणि रोजच्या धावपळीत पुन्हा एकदा हे गोंडस निरागस हसू दिसेनासे होइल. 

कदाचित चुकलंच

तुझ्यामध्ये एकट्याने उभे राहण्याची ताकद नसताना हात दिला … कदाचित चुकलंच
 तुझ्यामध्ये आत्मविश्वास नसताना तो निर्माण होण्यासाठी धडपड केली … कदाचित चुकलंच
 तुला नाही माहिती म्हणून शिकवल्या काही गोष्टी … कदाचित चुकलंच
 वाटलंच नव्हते कधी कानामागून आली आणि तिखट झालीये ती मिरची एवढी झोंबेल
 वाटलंच नव्हते कधी मला माझी ओळख सिद्ध करायला लागेल .
 वाटलंच नव्हते कधी माझ्या पाठीशी उभा राहणारा प्रत्येक जण माझ्याकडे कामाचा हिशोब मागेल
 आता सिध्द करू स्वतःला कि प्रसिद्ध करू चुकांना .. ह्याचा विचार करतोय … कदाचित चुकलंच
 तुला सोडायला हवे होते आहे त्या परिस्थिती मध्ये
 तुला सांगायला हवे होते शोध तुझा मार्ग तूच
 आता उशीर झालाय , आणि माझा मार्ग एकला उरलाय
 मी वाट शोधतोय आणि उत्तर शोधतोय नेमके काय गडबडले ?
मदतीचा हात देणे चुकले कि आधार देणे चुकले
 आता तू गळ्यातला ताईत आहेस आणि मी सगळ्यात वाईट आहे
 हे चित्र बदलण्यासाठी मदत करणारा तिर्हाईत आहे
 उभा राहून दाखवेन मी , सिद्ध करेन स्वतःला अजूनही किंमत आहे
माझ्या एखाद दुसर्या मताला
 तेच मत वापरून येउन दाखवेन वर
 तुझ्यासोबत उभा होतो आता उभा राहून दाखवेन एकट्याच्या बळावर !!