Monday, October 13, 2014

निरागसपण

पहाटे  पहाटे  जाग आली . डोळे किलकिले करून पाहिले तर शेजारी माझे गोंडस बाळ शांतपणे निजलेले . तीच निरागसता अजूनही चेहऱ्यावर आहे जी पहिल्यांदा मी हात हातात घेतला तेव्हा होति. ते निरागस हसू या रोजच्या धावपळीत कुठे दिसतच नव्हते . पण शांतपणे झोपलेल्या चेहऱ्यावर मात्र अगदी शोभून दिसतंय ते हसु. माझ्यावर अगदी निस्वार्थी प्रेम करणारे कोणीतरी म्हणून मी या निरागस चेहऱ्याकडे पाहिले . आणि अगदी खरेच तो निस्वार्थीपणा स्पर्शातून , बोलण्यातून , वागण्यातून मी रोज अनुभवला. कोणीतरी आपले असणे म्हणजे नेमके काय याच अर्थ मला त्या स्पर्शानेच शिकवलेला .

मला न दुखावता प्रत्येक गोष्ट करण्याची धडपड आणि अगदी कसलीच तक्रार नाही .  माझ्या प्रत्येक तक्रारीला , रागावण्याला समजून  घेऊन  सॉरी  म्हणत कुशीत शिरणे , कुरवाळणे आणि माझे चुकल्यावर आत्ता झोपल्यावर  दिसतेय न अगदी तशीच शांत मुद्रा ठेवत मला समजावणे .  कुठून अवगत झाल्यात त्या कला ? प्रेमापोटी असतील तर मग मला का नाही अवगत त्या कला  ?मी किती गृहीत धरले त्या स्पर्शाला , त्या आपलेपणाला .. याची जाणीव आज पहिल्यांदाच झाली . एवढी शांत मुद्रा नेहमीच असते पण मला ती आजच जाणवली.

किती नाती असतात आपलि. पण या नात्यात असे काय असते ? न रक्ताचे नाते असते न जन्मापासून नाळ जोडलेली असते. पण आपलेपणा , माया मात्र अगदी अनोखी.  कुठेतरी आतून कौतुक , कुठे व्यक्त होणारे कौतुक , कुठे  माया,कुठे नजरेतूनच व्यक्त होणारे प्रेम, कधी हट्ट तर कधी रुसवा  , रुसवा गेला तर कधी कडाक्याचे भांडण . कधी एक टोक तर कधी दुसरे पण तरीही प्रत्येक टोकाला असलेले आपलेपण .

श्वास मंद चालू आहे , डोळे मिटलेले  , चेहऱ्यावर कसले हसू आहे कोणास ठावूक पण आहे एक गोंडस हसू . माझे बाळ .  निरागस , शांत , प्रेमळ आणि माझ्याही नकळत मला जपणारे माझे कोणीतरी . माझा नवरा .

सूर्या थोडा वेळ थांब .उजाडू नको देउस . पहाटेचे हे गोंडस रूप मला जरा अनुभवू दे.  उशीर होऊ देत आज . पण हे निरागसपण मला माझ्या डोळ्यात साठवून घेऊ देत.

आत्ता उठेल हा  आणि अगदी छोट्या बाळासारखा चहा बनेपर्यंत माझ्या अवती भवति फिरेल . आणि एकदा कप मिळाला कि त्याच्यातला नवरा ताजा होऊन जाइल आणि रोजच्या धावपळीत पुन्हा एकदा हे गोंडस निरागस हसू दिसेनासे होइल. 

1 comment: