Wednesday, March 31, 2010

अपराधी

"आजोबा शब्द विसरलेत." आई दारातच हातातली पर्स  टाकून म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव समजतच नव्हते . आजोबा शब्दच विसरलेत म्हणजे काय ??? हे मला समजत नव्हते. कोणी शब्द कसा विसरेल ?? मग बोलत कसे असतील. ?? हे असले प्रश्न मनात येण्या आधीच आई रडायला लागली होती. घरात आम्ही दोघीच !!! मी.... वय वर्षे १० आणि आई  .

घरात काय चालू आहे मला काही काही समजत नव्हते. समजत होते ते एवढेच कि आई मला जवळ घेत नाही आहे. मी आले कि ,  "  मनु तुझ्या हट्टाने हे काय झाले ग ?? " असे  म्हणून रडत होती.

मी काय केले होते ??  ' आजोबा मला फास्टर फेणे चे पुस्तक '  हा हट्ट !!! हट्ट तर मी नेहमीच करते , पण मग या वेळीच का ??? याच वेळी कसे आजोबा रस्ता ओलांडताना चुकले ??  याच वेळी कसे त्यांचे धोतर त्यांच्या पायात अडकून ते डोक्यावर पडले ??  असे याच वेळी कशामुळे ??  मला ना धड घराचा पत्ता सांगता येत होता ना  घराचा फोन  नंबर  मला ठावूक होता. मी आजीकडे सुट्टीला आले होते .  नेहमी प्रमाणेच !!! आजोबा रस्त्यात पडले होते आणि लोक पाहत होते. भरधाव जाणाऱ्या गाड्या नव्हत्या  भोवताली  पण लोक थांबतही नव्हते. त्यांच्या डोक्यातून रक्त येत होते. माझा फ्रॉक रक्ताने माखला होता.  " आजोबा आजोबा " असे  ओरडण्याशिवाय काय करावे हे मला सुचत नव्हते. पुढे काय झाले मला आठवत नाही . मी डोळे उघडले तेव्हा बाजूला आई रडत होती, मावशीने तिला धरले होते आणि बाबा आजूबाजूला कुठेच दिसत नव्हते.

पोलीस आले आणि ते " ताई कशी हाये आता तू ?? तुजा आजा कसा काय पडला सांग पाहू पोलीस  काकांना ? " असले प्रश्न विचारत होते.  " आजोबा धोतरात अडकून पडले . त्यांना दगड लागला डोक्यात . आणि रक्त आले." मी बोलत होते.  नुसत्या कल्पनेने माझी गादी ओली झाली होती. मी हे माझ्या डोळ्यांनी पहिले  होते.  आणि आता लाल रंग आठवला तरी मला भीती वाटत होती.   पण आई मला जवळ घेत नव्हती. नुसतीच दुरून रडत होती. मी पडले कि ती मला प्रेमाने जवळ घेते. मग आजच का  ??? 

 तिला मी आणि आजोबा यात कोणाला निवडावे असा प्रश्न पडला असेल का तेव्हा  ??

 " बाबा कोम्यात गेलेत " मावशी माझ्या बाबांना सांगत होती.  ' म्हणजे कुठे गेले असतील '   हा मला पडलेला प्रश्न मी कोणालाच विचारू शकत नव्हते. बाबांनी डोक्यावरून हात फिरवत ' झोप बाळा... बाबा आलेच '  असे सांगितले आणि मावशीला माझ्या पाशी बसवून ते कुठे तरी गेले. त्या संध्याकाळी मला घरी आणले आणि मग आई घरी नाही आली ...... पुढचे ८ दिवस.... पहाटेच घरी येऊन गेलेली असायची. पण मला एकदाही नाही भेटली.

एका सकाळी मावशीने बाबांना हाक मारली आणि म्हणाली " ताई चा फोन होता बाबा शुद्धीवर आलेत "  मग बाबा ,  मावशी दोघे तयार झाले आणि कामाच्या मावशींना माझ्याकडे लक्ष द्यायला घरात थांबायला सांगून कुठे तरी गेले.  आई  आली तरी मला टाळायची . " जरा गप्पा बस ग मनु मला कामे आहेत , डबा न्यायचा आहे दवाखान्यात आजी साठी "  म्हणून मला  दूर लोटायची. आजी सकाळी येऊन अंघोळ करून परत कुठेतरी निघून जायची, पण ती आली कि मला जवळ घ्यायची . " मनु भीती नाही ना वाटत बाळा आता कसली ??   " असे म्हणायची . घटकाभर मला जवळ घेऊन मग पुन्हा आपली कामे उरकायच्या मागे धावायची. येताना आवर्जून बिस्किटाचा पुडा आणायची.

आज आजोबा येणार आहेत हि बातमी कानावर आली आणि मी खूप खुश झाले . पण.... "आजोबा शब्द विसरलेत."  हे आईचे शब्द आणि आई आधी आले आणि मला काहीच समजेना झाले.

आजोबा आले . डोक्याला जड पांढऱ्या पट्ट्यांनी झाकले होते. ' त्यांची काळी टोपी रस्त्यातच पडली का त्या दिवशी ??'  टोपिशिवाय जायचे नाहीत कुठे ते म्हणून मला आठवले. काळा कोट, काळी टोपी, पांढरे धोतर , झब्बा असेच पहिले होते मी त्यांना. पण आज त्यांना पाहवत नव्हते.  ते खूप विचित्र वागत होते. "  ह्या sss "  , " शुक शुक ssss " असे काहीतरी तोंडाने आवाज काढत होते. पण "  ह्या sss "  म्हणताना चेहऱ्यावर वैताग नसायचा , ते हसत होते , " शुक शुक ssss "  करून हाक मारण्याऐवजी ते खायला दिलेले आवडले असे हावभाव करत होते.

हे सगळे खूपच विचित्र होते. आजोबा शब्द विसरले  म्हणजे नेमके काय झाले ते आत्ताच कुठे समजत होते मला.  कोणत्या गोष्टीला काय म्हणायचे हे त्यांना समजताच नव्हते . 

आता मागे पहिले कि वाटते कि एका माणसाला किती नावे असतात , आजी त्यांना ' अहो ' म्हणायची , आई ' बाबा ' म्हणायची , मी ' आजोबा ' म्हणायचे . आणि यातली कोणतीही हाक त्यांना ओळखीची वाटत नव्हती . गेले ६० वर्षे त्यांना हि सगळी नावे होती , पण आज त्यांना ती सगळी नवीन वाटत होती. लहान बाळ सुद्धा ४ महिन्यांनी सोनुले म्हणाल्यावर हाकेला ओ देते.... पण आजोबाना ऐकूच न गेल्यासारखे ते निश्चिंत बसायचे. 

आजी हरली नव्हती. तिने उजळणी आणली होती. ती अक्षरे शिकवायला बसली कि  आजोबा विचित्र आवाजात ओरडत तिला मारायला धावायचे. आईने आवाज चढवला कि गप्प बसायचे. हळू हळू बाबा या हाकेला ते प्रतिसाद द्यायला लागले होते. म्हणून सगळेच त्यांना बाबा म्हणायला लागले. पण आजीला ते जमत नव्हते.

आम्ही आता आजीकडेच राहायला आलो होतो. सकाळी आई (तिच्या )  बाबांना खायला घालून ऑफिसात जायची. आणि मग आली कि पुन्हा खाणे , पुन्हा नवीन सुरुवात व्हायची ... त्यांना अक्षरे शिकवण्याची..... आता त्यांच्या हाव भावांची जागा " पापा" म्हणजे पाणी , " मम मम " म्हणजे भूक लागली  आहे  अशा शब्दांनी घेतली होती. ते छोट्या छोट्या गोष्टीना अगदीच लहान मुलासारखे प्रतिसाद द्यायचे.  औषधे चालू होती पण परिणाम शून्य होता. दवाखान्यात ते पिसाळल्यासारखे करायचे. म्हणून आजीने आता ते पण कमी करून टाकले होते . डॉक्टरच घरी येऊन तपासून  जायचे.

या प्रकाराला १ वर्षे झाले . हे सगळे पहिले कि मनातून मला खूप अपराधी वाटून जायचे.  हे सगळे माझ्या पुस्तकाच्या एका हट्टामुळे झाले होते असे वाटण्याइतकी  मी आता मोठी झाले होते. आणि ' असे काही नाही.... हे होणारच होते ...'  असे वाटायला लागले कि नेमका एखादा नातेवाईक येऊन आईला तुझ्या मुलीच्या हट्टामुळे हे कसे झाले हे  सांगून जायचा आणि तिने मला दूर ढकलून देण्याचे सत्र आठवडाभर चालू राहायचे.

आजी ने मात्र मला कधीही दूर नाही केले. आजोबा नीट असते तर त्यांनी जे काही केले असते ते सगळे ती माझ्यासाठी करत होती. ज्या पुस्तकाच्या हट्टासाठी हे झाले ते सुद्धा आता माझ्या संग्रहात दाखल झाले होते. पण ते सगळे आजोबांनी करण्यात मजाच वेगळी होती. ती हरवली होती. मावशी अधून मधून यायची, मला पुस्तक वाचताना पहिले कि " आता माझा बाप खाऊन टाकायची वेळ आली  , तरी पुस्तकाचे वेड नाही गेले तुझं ??"  असे म्हणून जायची. जिच्या मांडीवर डोके ठेवून रडावे ती जवळच नाही घायची. आणि  बाबा आणि आजी चे प्रेम आई आणि मावशी समोर मुके होऊन जायचे. तेव्हा जीव घाबरून जायचा.

पाडव्याची तयारी चालली होती. आई बाबांना ( तिच्या बाबांना ) गुढी दाखवत होती. तिने हावभावाची भाषा आता आत्मसात केली होती. पण आज बाबा नेहमीसारखे वागत नव्हते .  आजीने त्यांच्या आवडीचे म्हणून कडबू केले होते, पण त्याची चव सुद्द्धा  त्यांना आठवत नव्हती. आनंदात असल्याचे अवसान सगळ्यांनी आणले होते.आज माझे बाबा पण छान तयार झाले होते. आजी ने आजोबाना आवडेल म्हणून नऊ वार आणि नथ घातली होती. 

आम्ही गाडीतून त्याच रस्त्यावरून जात होतो जिथे आजोबा पडले . आज तारीख तीच होती ज्या तारखेला ते पडले फक्त महिना वेगळा होता. वेळही साधारण तीच होती. तिथून जाताना जीव उगाच घाबरत होता. रस्त्यात आजोबा पुन्हा पुन्हा विचित्र वागत होते. आणि अचानक ते आजी कडे पाहून हसले . गेले वर्षभर ती ह्या क्षणासाठी आसुसली होती. ते तिला " अगं  sss  " म्हणाले आणि अगदी विचित्र हसले. आजीने त्यांना लहान मुलासारखे कुरवाळले. आणि मनापासूनगोड हसली. आता सगळे छान होईल असा वाटून मी पण खुदकन  हसले. आज आईने मला पापी दिली. मी खूप आनंदात होते.

पण नियतीच्या मनात मला अपराधी बनवण्याचा डाव होता. 

आणि रात्री मी झोपले असताना आजोबा गेले. ' पाडव्याचा सण साजरा करून गेले ' ... ते कधी गेले ,काय झाले मला ठावूक नाही, आजीचा  हंबरडा  कानावर आला तेव्हा मी दचकून उठले आणि आईचा रडण्याचा आवाज आला त्या खोलीच्या दिशेने धावले. आजोबा शांत झोपले होते. गेल्या वर्षभरात पहिलीच रात्र इतकी शांत झोप लागली असेल त्यांना. डोक्यावर पट्टी तशीच होती. डोळे मिटलेले होते. आजी चे सकाळचे सुंदर रूप आणि आताचे भेसूर रूप यातला फरक आजच मी पाहत होते, अनुभवत होते.

" याच दिवशी जायचे नशिबात होते पहा " , " हीच तारीख होती नाही ?? " , " त्या रस्त्यावरून देवळात गेले होते म्हणे सकाळी ,  यमदूत वाट पाहत असेल तिथे आणि यांना गाठले पहा " ."आजीने खूप त्रास सहन केला " , " माझ्या आईने खूप केले कारण चूक माझी होती न करून सांगते कोणाला ? " ... असे संवाद कानावर पडत होते .

' हे माझ्यामुळेच ... मी गेलेच नसते त्या वाटेवरून त्या दुकानात, तर यमदुताशी आजोबांची पहिली गाठ पडलीच नसती .... त्यांचा शेवट असा विचित्र नसता झाला... मला बाळबोध शिकवणारे होते ते आणि त्यांचा  शेवट अक्षरे विसरून का झाला ??? '   शब्द , गंध ,भावना सगळे सगळे विसरले होते ते. तरीही शेवटी त्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू होते. मला पहिले कि त्यांच्या चेहऱ्यावर असायचे  तेच गोड हसू..... "

आजीने मला अपराधी कधी मानलेच नव्हते. चित्रगुप्ताच्या वहीवर तिचा विश्वास होता. त्यातच तसे लिहिले होते आणि झाले असे ती मानत राहिली. तिचे माझ्यावरचे प्रेम कधीच कमी नाही झाले. माझ्या बाबांच्या खूप प्रयत्नानंतर आईने मला माफ केल्याचे जाणवले. न जाणे ती कधी मला खरच मनापसून माफ करू शकली होती कि नाही.

आता आजी नाही , आई सुद्धा गेली , बाबा गेले .....

आज ४० वर्षे झाली या गोष्टीला पण मी विसरले नाही.... सगळे आठवते आहे ... तसेच्या तसे... हरवलेल्या शब्दांसकट .... आणि आज हि  वाटते मीच होते.... " अपराधी ".... आईची ....आजीची .... आणि त्या आजोबांची ज्यांना अपराधी  हा शब्द सुद्धा लक्षात नव्हता .....

4 comments:

  1. Hi kalpana aahe??
    Vatat nahi...
    Agadi khare khure chitra umatvley...
    Hridyala sparsh karun jate..
    - Jayashree

    ReplyDelete
  2. हा कुणाच अनुभव कि मनातली एक कल्पना ग ?
    कल्पना असेल तर खरच तुझं कौतुक वाटत ... मनाला स्पर्शून जाणारे शब्द ..भाव .....
    कागदावर असे कसे काय उतरवले जातात ग तुझ्याकडून ....
    खूप दिवसांनी तुझ्या ब्लॉगवर वाचलं आणि गालावर ओघळ कसे काय आले समजलंच नाही !!
    अप्रतिम लिहितेस तू ...वाचणारा त्यात सहज स्वतःला विसरून जातो ..अगदी हरवतो शब्दांच्या त्या मोहमयी दुनियेत ...
    अभिनंदन ...अशीच लिहित राहा हीच सदिच्छा !
    - आरती सिन्नरकर

    ReplyDelete
  3. मस्तच लिहिलं आहेस ग!!! अगदी चित्रासारखं सर्व समोर घडतंय असं वाटलं!!!

    ReplyDelete
  4. He khari goshta ahe ki kalpana....??
    sgale chitra samor disale ani dolyat pani ale..!
    Heart touching hote he sagalech..!

    ReplyDelete