Tuesday, February 23, 2010

कंटाळा

" तुमच्या पुण्याच्या मुलांना काय रे सारखे बोर होते ? अमुक ढमुक नाही मला बोर झाले. उठला नाहीस कि बोर झाले "  माझा भाचा सुट्टीला आला कि हमखास कानावर पडणारे शब्द ! आणि  अगदीच कोणी नाही म्हणाले तर मी म्हणतेच हे वाक्य. शाळा असली कि मला शाळेत जायला बोर होते आणि सुट्टी असली आणि टी व्ही नाही पाहू दिला कि मग घरात बोर होते . सारखे आपले बोर होतंय याला.  हि आपली सहज प्रतिक्रिया आमची असते.

खरे पाहता आपण म्हणतो.... "  कंटाळा आला " . त्याचा बाप तोच आणि त्याची आई तीच .... आपण फक्त मराठीतून बोर होत असतो इतकेच काय ते !!! असे मला बोर झाले कि हमखास जाणवते.

कंटाळा ..... कोणी तरी खूप कंटाळा आल्यावरच या शब्दाचा शोध लावला असेल नाही ?  कशाला कंटाळला असेल हा शब्द बनवणारा माणूस ? शेतीला ? शब्द्नाचा शोध लावायला ? कि ... बोलायला ?? कि कंटाळ्यालाच ???

मजेशीर आहे हा शब्द आणि आपण तो अगदी सहज वापरतो. "कंटाळ्याचा कंटाळा आलाय  मला  " अशी कोटी पण घरात बऱ्याचदा होते. माझ्या भाच्याच्या बाबतीत  " तुझे बोर ऐकून मला बोर झाले आहे "  असे म्हणतोआम्ही .

थोडक्यात बोर होण्यासाठी actually   काही काही कारण नाही लागत. पण आपण विनाकारण बोर होतोय हे कसे स्वीकारायचे म्हणून आपण सहज म्हणतो " यार नुसते बसून कंटाळा आला आहे "

बरे तीच तीच तीच कृती पुन्हा पुन्हा होते म्हणून कंटाळा येतो असे म्हणालो तर तसेपण नाही . सहज म्हणून कायम घरात बसणाऱ्या बाई ला म्हणा पाहू " काकू चला आपण गावाला जाऊ ८ दिवस" ती उत्तर देते  " प्रवासाचा कंटाळा आला आहे . अगं मला, घरात बसावे वाटते आहे. " बरे तीच बाई तासाभरापूर्वी " घरात बसून कंटाळले आहे मी "  असे म्हणालेली असते.

तर एकंदर कंटाळा आणि माणूस यांचा संबंध तेव्हा  येतो जेव्हा  त्याला चालू कृतीपासून पळायचे  असते ...असा एक शोध आम्ही लावला . पण छे ... तसे पण काही नाही. कारण  " या पळपुटेपणाचा  आता खूप कंटाळा आला आहे " हे पण कानावर पडले आणि आमचा निष्कर्ष चुकीचा आहे हे समजले.

तोच तोच पणा , पळून जाणे , टाळणे , अशा कोणत्याही कृतीला कंटाळा चिकटू शकतो असे आम्हला समजले.

पण कंटाळ्याच्या  मुळाला शोधताना   कंटाळून कसे चालेल ?? boredom is desire of desires वाचले  आणि माझा शोध संपला. थोडक्यात स्वीच मारायचा असला कि माणसाला कंटाळा येतो. असे आम्ही निष्कर्ष काढून मोकळे झालो .

कंटाळा आला ?? कंटाळ्याबद्दल वाचून ???

चला तर कंटाळा येण्याचे अजून एक कारण मी माझ्या शोध निबंधात टाकते.

" कंटाळ्याबद्दल वाचून  सुद्द्धा प्रचंड कंटाळा येतो "

No comments:

Post a Comment