Tuesday, February 2, 2010

सहज वाचले आणि खूप आवडले .....



मिलिंद फणसे यांची हि कविता सहज नजरेला पडली आणि खूप आवडली म्हणून या ब्लॉग चा एक भाग बनत आहे हि कविता......

शापित

सूर्य राहूशी मिळाला, कृष्णपक्षी चंद्र झाला
दीपही प्रत्येक विझला, ठेवला ज्यावर हवाला

तामसांचे राज्य उलथू पाहतो नाठाळ तारा
कृष्णविवरा घाल वेढा बंडखोरांच्या नभाला

दाटते डोळ्यांत काळी संभ्रमांची मेघमाला
मांदियाळी आसवांची छेद देते काजळाला

गस्त घाली भोवताली भुंकणाऱ्यांची शिबंदी
वास मृगयेचा अशाने येत आहे संगराला

जन्म घेती आजही ती देवकीची सात पोरं
तीच आहे कंससत्ता, तीच आहे बंदिशाला

प्राशिले तू नीळकंठा एकदा केवळ हलाहल
रोजचे मंथन अम्हाला, वासुकीचा रोज प्याला

माणसांनी पेटण्याचे दिवस ते सरले कधीचे
गूल शब्दांचे निरर्थक घासणे आता कशाला

का चिरंजीवित्व भृंगा कांक्षिता आशीर्वचांने
काय महती अमृताची जीविताच्या शापिताला

1 comment:

  1. apratim kuthe wachtes itka cha nehami ???
    khupch great ahe .....

    ReplyDelete