Monday, February 1, 2010

गोष्ट एका चिऊताई ची

आटपाट नगर होते .  नगरात मुसळधार पाऊस आला . पावसात चिऊ ताई  उडत होती.  पंख भिजून चिंब झाले होते. आणि फडफड सुद्धा करता येत नव्हती . कोणी कोणी दार उघडायला तयार नव्हते . म्हणे आज काल जमाना खराब आला आहे.

चिऊ चे स्वगत .....

शी  आजच या मोबाईल ची हि अवस्था व्हायची होती. या माणसांच्या towers  पेक्षा जास्त height नको का आमच्या towers ची ?  at least Aeroplane  mode  तरी पाहिजे होता या मोबाईलला . जाम वैताग  आहे . उडताना नेमकी range जाते .

     हम्म शेजारच्या कावळे काकुना सांगितले कि  घरी पोहोचलात कि आई ला निरोप द्या तर म्हणतात कशा "आमची तुमची खानदानी दुष्मनी आहे . दार उघड म्हणाले मामंजी तर तुझ्या आजी ने थांब माझ्या बाळाचे अमुक....... तमुक...... करत दार नाही उघडले बराच वेळ . आणि  मोबाईल आहे ना तर वापर कि " आता हा वरचा टोमणा कशाला ?  त्यांच्या मामन्जीना शहाणपणा नव्हता  ?  शेणाचे घर कशाला बनवायचे ?  आणि या जाऊन बोलल्या आईशी तर आई काही दार नाही उघडणार का ? नाटके उगाच ? कधी संपणार हि भांडणे. माणसातल्या हिंदू मुस्लीमांसारखे आमचे झालंय . वर्षानुवर्षे तीच भांडणे. कंटाळा आला आहे.

बरे आश्रयाला एक झाड नाही आहे इथे आणि कोणत्याही जागी थांबता नाही येत आहे. जरा खिडकीवर बसावे म्हणाले तर " भुर्रर " करून उडवून लावतात मला. आमच्याच जातीतले चिमण मंडळ समाजातले पण कोणी दार नाही उघडत आहे.

हि माणसे पण ना  !!!  रोज एक झाड पाडतात . आणि यांच्या flat  मध्ये आम्ही घरटे नाही बांधायचे. लोकसंख्येमुळे यांच्या नगरपालिकांच्या महापालिका झाल्या  आणि आमचे मात्र बरोब्बर उलटे चित्र !!! परवा पंख्यात अडकून मोठ्या चिमणे काकू गेल्या.  आणि त्यांच्या पेपरात मात्र लेख !! तर काय म्हणे चिमण्या हरवल्या आहेत . यांनी आम्हाला हरवून टाकले आहे या सिमेंट च्या जंगलात .  आजी च्या लग्नाचे फोटो पहिले तर त्यात कित्ती सुंदर दिसत होती ती. झाडांमध्ये फिरायला गेले होते म्हणे ती आणि आजोबा . आणि हा चिमणा मला विचारतो  "कुठे नेऊ तुला ? CCD  च्या छतावर जाऊ "  शी मला बाई तिथे सिगारेट चा धूर सहन होत नाही. जीव घुसमटतो. आणि CCD  च्या छतावर नीट बसता पण नाही  येत .

पूर्वी थेटरात जाऊन बसता तरी यायचे हल्ली हे A .C . असलेले multiplex  आत पण जाऊ देत नाहीत . त्यामुळे रोमांटीक सिनेमा पाहायला पण नाही नेत चिमणा मला हल्ली.

हे काय ?? खाली कित्ती पाणी साठले आहे !!! गाड्या पहा !!! रांगेत एकामागे एक अडकून पडल्यात. माणसांचे पण मोबाईल बंद पडलेत वाटते.  आज काय बरे तारीख ??? २६ जुलै !!!  उद्या आई च्या लग्नाचा वाढदिवस. आई सांगते तिचे लग्न भर पावसाळ्यात पण झाडांमुळे थाटात झाले होते.  मंडप पण छान होता फांद्यांचा. 

शी बाई पुरे हे एकटे बडबडणे . रात्र झाली. अंधारात धड दिसत नाही आहे.  

पूर्ण रात्र आटपाट नगरात पावसाने हाहाकार  माजवला होता. चिऊ ताई भुकेजली होती. गाड्या अडकून पडल्या होत्या. लोकांची लगबग चालू होती. सगळे पळापळ करत होते पण काही काही होत नव्हते. प्लास्टिक च्या कचऱ्यामुळे पाणी तुंबले होते. माणसाच्या चुकांमुळे चिऊ ताईला शिक्षा झाली होती. 

ती कायमच होत आली होती. चिऊ ताईचे  कित्तीतरी नातेवाईक माणसांच्या मुळे आपले घर गमावून बसली होती. आता तर त्यांच्या जमातीत तिला शहरातली स्थळे पण मिळत नव्हती . कारण शहरातल्या चिमण्या हरवल्या होत्या. शिक्षण झालेली चिऊ ताई खेड्यातल्या चिमण्याला होकार  देऊ शकत  नव्हती. आणि शहरातला चिमणा तिला हवे तसे  मोठे मेणाचे ...झाडाच्या  फांद्यांमधून सूर्याच्या हलक्या प्रकाशात न्हाऊन निघणारे घरटे देऊ शकत नव्हता. शहरात साधा  flat मिळणे कठीण होते.

दिवस उजाडला. चिऊ  ताई घरी नाही आली त्यामुळे चिमणकर मंडळी घाबरली होती . इतक्यात TV  चा  आवाज आला . पुरामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती आणि बातमीतून हिंदू मुस्लीम एकत्र येऊन... भांडणे विसरून.... एकमेकाला मदत करत आहेत पुन्हा पुन्हा हे सांगितले जात होते.

इतक्यात दार वाजले. बेशुद्ध चिऊ ताई ला घेऊन कावळे काकू आणि काका आले होते. " घ्या तुमचे बाळ... तिकडे बेशुद्ध होऊन पडलेले.... थंडी ने काकडली आहे. गरम काहीतरी घालायला द्या.  आम्ही निघतो "  कावळे काका बोलले.

" आत या ना  . काहीतरी घ्या. "  चिमणकर काका म्हणाले.

पावसात  चिऊताई च्या आयुष्यात एक चांगली गोष्ट घडलेली. खानदानी दुष्मनी जराशी तरी कमी झाली होती . 

तेच माणसांमध्ये पण घडले होते. एका पावसाने सगळ्या भिंती पाडून टाकल्या.

भेदाच्या भिंती भेदल्या होत्या एकाच विजेतून!!!  जी कडाडली.......... आणि प्रेम बरसले.

2 comments:

  1. IYLA LAI BHARI RE ....KASA SUCHA TULA ITKA CHAN CHAN ....
    U R SIMPLY GREAT YAR

    DI..........

    ReplyDelete
  2. Hi,
    khupach chhan jamaliye. Mast mast mast!!! (Mahesh Manjarekaranchya style madhye ;-) )

    ReplyDelete