Sunday, January 31, 2010

मी संपलो आहे .

भोलानाथ चे गाणे म्हणत म्हणत चुकवेगिरी शिकत मी मोठा झालो. आणि त्यातच शिकलो कि दुपारी आई झोपली कि लाडू घेतात तसे जग झोपवून किंवा जगाला गुंगारा देऊन लाडवाची गोडी चोरायची अगदी आवाज ना होऊ देता !!!

एखादी गोष्ट कशी टाळावी हे मला चांगले माहिती होते  असा मला सार्थ अभिमान होता. मित्रमंडळ चांगले गोळा झाले होते.... कारण माझा बोलका स्वभाव!!! हम्म ... थापा मारण्यात माझा हात कोणी नाही पकडू शकले. आणि समजा  कोणी पकडलेच तर मी उत्तमरीत्या गुंडाळायचो आणि मग म्हणायचो " अरे मी असे म्हणालो होतो असे नाही. तू असे ऐकलेस का ? " किंवा " तू नेहमीच confused असतोस  मला कशाला गोंधळात टाकलेस  ? " असे म्हणायचे आणि समोरचाच किती मूर्ख आहे हे सिद्ध करायचे ते हि चार चौघात त्याला नावे ठेवून !!!

हो... मी कधीच पकडला  गेलो नाही. नशिबाने कर्तृत्ववान बायको मिळाली .आणि तिला पण असेच थापा मारून पटवले होते ते निराळे .  लांडगा आला रे आला असे म्हणायची वेळ मी कधी येऊ दिली नाही कारण ते देखील मी शाळेत शिकलो होतो. कि लांडगा एकदाच आणायचा आणि मग पुढच्या वेळी काहीतरी दुसरे निमित्त.पण लोकांचे आकर्षण आपणच बनायचे हा माझा यशस्वी प्रयत्न असायचा

घरातला करता सवरता मीच आहे असा आभास मी ऑफिसात आणि ऑफिसात मीच शहाणा असा आभास मी घरात निर्माण करून ठेवलेला . त्यामुळे घरातला पळपुटेपणा दाखवायचा असेल तर मी ऑफिसला जायचो आणि ऑफिसात घरातली थाप पचायाची आणि अगदीच काही नाही झाले तर माझे अपघात ठरलेले होतेच. तो पण मी लोकांना गुंडाळण्यासाठी रचलेला एक कथेचा भागचअसायचा.

एकंदर काय ? तर मी सगळ्या जगाला मूर्ख बनवत आहे आणि ते बनत आहेत असे  मला ठामपणे वाटत होते .

काळ भ्रमाचा  भोपळा फोडतोच एकदा तरी !! हो माझा पण भ्रमाचा भोपळा फुटला .  पण खोटेपणाची सवय यावेळी काही कामात येत नाही आहे. मी स्वतःशी खोटे बोललो तरी सत्य बदलणार नाही आहे .   मला cancer झालाय . blood cancer !!! 

खोटेपणाचा cancer ?  तो फार पूर्वीच झाला होता .आता मला खरे पचतच नाही. खरे कोणी बोलले तर उलटून जाते आहे . पोटात पाणी झाले आहे . आणि मी लाजेने पाणी पाणी होत आहे  . ते समारंभ जे दुसऱ्यांचे होते. ते मी हिरावून घेतले होते,  अगदी गोड बोलून!!! कोणीतरी हिरावून घ्या  माझा हा त्रास असे मला वाटते आहे. गोड सगळेच बोलत आहेत . पण त्रास माझाच आहे. तसाच जसा त्यांचे यश हिरावल्यावर गौरव माझा असायचा... फक्त माझा !!!

खोटे जग का नाही बनवता येत आहे मला माझ्या भोवती ? बायको च्या चेहऱ्यावर चे रडे खरे आहे ?  कि तो पण आभास ? मी जाणार हा आनंद लपवते आहे  का ती ? आयुष्याच्या सगळ्यात मोठ्या असत्यातून तिची सुटका होणार आहे नं आता ?  

मी मरतोय ? खरेच मरतोय ? आज पर्यंत लोकांना फसवून जाळले आणि आता सरणावर मला चढायचे आहे . मला मरायचे नाही. मी मरणार नाही असे कितीही आकांताने ओरडलो तरी मी मरणार आहे. मी संपतोय... मी संपतोय....

मी संपलो...... आज सत्य- असत्य यातून सुटून एका अटळ सत्याचा सामना करतोय. मी आता संपलोय. आयुष्याचा शेवट हे एकच सत्य होते. त्याचा ना आभास होता ना मी कोणाला फसवू शकलो. आज काळाने मला फसवले. त्या प्रत्येक फसवणूकीपेक्षा मोठा घात झाला आहे. माझ्या कुटुंबावर आघात झाला आहे. मी संपलो आहे .

मी जगाला फसवले. आणि एक दिवस पुरता फसलो. शेवट झाला आणि हे समजले. आता व्यर्थ हे सारेच टाहो असे वाटतंय... कारण मलाच मी संपवले त्याच दिवशी जेव्हा मी लाडू चोरला आणि आता..... लाडू आहेत पण मी संपलो आहे .

1 comment:

  1. अग तू ह्या छोट्या छोट्या गोष्टी आकाशवाणीसाठी का देत नाहीस
    " स्नेहबंध साठी "
    तू खरच ह्याचा विचार कर न !

    आरती

    ReplyDelete