खुप वेळा ' मन रानात गेले गं , पाना पानात गेलं ग ' असे गुणगुणत उड्या मारत रानात स्वछंदपणे फिरावेसे वाटते . एखादे छान गाणं कानावर पडावे ..अणि मग मी त्या गाण्याची नायिका व्हावे अशी एक कल्पना किती सुखद असते !!
आयुष्य क्षणभर कुठेतरी थांबले आहे असे उगाचच वाटते . पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडतो आहे . आणि बैलगाडी चे सर्जा आणि राजा गळ्यातली घुंगरांची माळ वाजवून रस्त्यातल्या लोकांना आपण येत आहे अशी ग्वाही देत आहेत. मी त्यांना "हुर्रर्र " म्हणून वेगाने चालायला सांगते आहे आणि मग हलकेच माझा वेग वाढला आहे असे वाटायला लागते.
पण मग जाणवते अरे गाणं कानावर पड़ते आहे ..पण आपण पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यावर आहे . भोवताली जे सुन्दर तलावाताले पाणी वाटते आहे ते रस्त्यावरच्या खड्ड्यात जमलेले बाजुच्या फुटक्या drainage pipe चं पाणी आहे .मागे कानाशी वाजणारे हॉर्न चे आवाज मला माझा वेग वाढवायला सांगत असतात. घुंगरांच्या आवाजाइतका सुखद भाव मात्र तिथे नसतो . "हुर्रर्र" आवाजाने सर्जा राजाला मी गोंजारते आहे अशा सुखद कल्पनेला तडा देणारा आवाज येतो " ओ बाई हला कि , आssss ईsssssला काsssय वैताग आहे !!! "
कल्पनेतल्या गावातल्या रस्त्यांवरून मी माझ्या झोपडीत येते . आणि मग अग्गबाई अरेच्चा मधल्या गाण्याप्रमाणे " मेघ सावळा माझा राजा , भोळा भाबडा माझा राजा .. माझ्यावरी त्याची डोंगरा एवढी माया " असे गुणगुणत असताना ...राजा येतो ,खांद्यांवरून गवताची गंजी खाली टाकतो.रांगडा वाटणारा कल्पनेतला राजा ओंजळीतून पाणी पिताना हलका इशारा करत आहे असे वाटायला लागते. त्यावेळी त्याने खांद्यावरून खाली टाकलेले गवत पण सुंदर वाटत असते.
कल्पना रंगत असतात ...
आणि वास्तवात मी खड्डयातून गाडी काढत पुढे निघालेली असते. इतक्यात घर येते. माझी गाडी पार्क करून मी माझ्या घरात जाते. घराचे टाळे माझे स्वागत करते आणि मी स्वगत करत घरात शिरते.... ' रोज कुलूप उघडायला मीच .. एक दिवस ह्याला लवकर नाही येता येत. ' गाण्यातल्या प्रेमाची जागा माझा त्रागा घेतो. आणि मग मेघ सावळा आजिबात वाटणार नाही असा माझा शहरी नवरा घरात शिरतो. हातातली भाजीची पिशवी खाली ठेवतो. आणि ' पुन्हा हीच भाजी . जर्रा म्हणून काही वेगळे आणायला नको ' असे आवाज ओठात अडकून राहतात. गवताच्या गंजीकडे कौतुकाने पाहणारी मी भाजीकडे पाहून संतापते. ( पुन्हा वैताग !! ). " जरा पाणी देतेस ? " त्याचा आवाज येतो . " रोज काय रे मीच पाणी आणायचे. मी पण आत्ताच आले आहे ना? " माझा आवाज गरजतो. कल्पनेतल्या इशाऱ्याची जागा त्याच्या तीक्ष्ण कटाक्षाने घेतलेली असते.
संध्याकाळी चुलीपाशी फुंकणी हातात घेऊन मी बसले आहे. भाकरया भाजते आहे. आणि माझ्या डोळ्यात धुराने पाणी आले आहे . मी डोळे चोळते आहे आणि माझा नवरा जवळ येऊन डोळ्यात फुंकर मारून माझा त्रास कमी करतो आहे . आनंदात भाकरी भाजी हातावर घेऊन अन गोड मानून आम्ही खात आहे. असे स्वप्न पाहताना....
पिझ्झा चे खोके घेऊन चिरंजीव शिरतात आणि " आई गं आज तुला सुट्टी !!! Dominos ने नवीन flavor आणला आहे म्हणून मी आपल्याला पिझ्झा आणला आहे ." असे जाहीर करतात . मग काय ?? हातावरच्या भाकरीची जागा पिझ्झा घेतो . भाजी वेगळ्याने घ्यावी लागत नाही, ती त्यातच आलेली असते . पण तो पिझ्झाहि हातातच घेऊन आम्ही गोड मानून खातो. ( मुळात त्याचा कंटाळा आलेला असतो , कल्पनेतली भाकरी आठवून जीव तुटत असतो . ' कार्ट्याला कसले पिझ्झे आवडतात ?' असे वाटत असते ) .चूल लावलेलीच नसते त्यामुळे धूर , नवऱ्याचे कौतुकाने जवळ येणे स्वप्नातच राहते.
रात्र होते.... " शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला , थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला " असे शब्द गुणगुणत मी खोलीत येते. आणि आता मात्र ... स्वप्न खरे होईल असे वाटणारे वातावरण माझ्या साजणाने खोलीत निर्माण केलेले असते. माझ्यासाठी आणलेला मोगरा खोलीत दरवळ पसरवत असतो.
अचानक सर्जा राजाला " हुर्र्र" म्हणताना फेटा घालून बसलेला माझा नवरा , पाणी पिताना इशारा करणारा रांगडा गडी वाटणारा माझा नवरा , चुलीपाशी डोळ्यात फुंकर घालणारा माझा नवरा असे सगळे जण माझ्या शहरी नवरयाच्या भोवतालून मला खुणावत आहेत असे वाटायला लागते.
मी मनातून लाजून जाते. एवढा वेळ मनातल्या मनात चालू असलेले गाणे मी गुणगुणायला लागते.
स्वप्नातला दिवस आणि स्वप्नातला गाव नसे ना का नशिबात ....पण स्वप्नातला राजकुमार आता माझा राजा आहे या वास्तवातल्या जाणीवेने मी सुखावते आणि पुन्हा एकदा "स्वप्नाच्या गावा जावे" म्हणत नवरयाच्या मिठीत शांतपणे झोपून जाते .
छान लिहिलं आहेस गं...
ReplyDeleteसहज आठवलं म्हणून सांगतो...
एकदा अनुराधा पौडवालनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. अशाच काही सहजीवनाबद्दल गोष्टी चालल्या होत्या (पती आणि प्रसिद्ध संगीत संयोजक अरुण पौडवाल यांच्यासोबत. आत्तापुरतं या इथे आपण सगळेजण अरे तुरे करुया...)
अनुराधा म्हणाली, "आमचा प्रेम विवाह आहे...आता आमची मुलं मोठी झाली आहेत...पण देवाच्या कृपेने आमच्या दोघां मध्ये कधीही कटुता आली नाही...प्रसारमाध्यमांमध्ये गुलशनकुमार आणि माझ्याबद्दल काय वाट्टेल ते छापून येत असते. पण अरुणनी कधी चुकूनसुद्धा माझ्याकडे एक ही अक्षर काढले नाही. याला म्हणतात विश्वास. तसंच कधी कधी त्यांना रेकोर्डिंग वरून यायला रात्री खूप उशीर होत असे. ते आल्याशिवाय मला कधीच झोप लागत नाही. कधी कधी त्यांच्या गाडीचा पोर्च मध्ये आवाज ऐकला की ते खालून वर घरात पोहोचेपर्यंत मला गाढ झोप लागलेली असायची. मला नाही वाटत नवरा बायकोत एवढी समज असेल तर कुठे विसंवाद होईल असं..."
रुपाली, तू अजून bachelor आहेस मला माहित आहे...(आरतीने सांगितलं आहे...)...तुझ्या लेखनशैलीवरून मला आपलं असं वाटतं की तू खूप वाचत असशील. चांगलं आहे...
KHUP KHUP CHAN LITES GA ??? KASA SUCHTA TULA ??
ReplyDeleteARTI ....