Wednesday, February 17, 2010

एका नवीन जगाची कल्पना

पण त्याच्यासोबत येणाऱ्या त्याच्या जगाचं काय?

त्याचे जग नवीन असेल. जिथे मला तो घेऊन जाईल. त्याच्या आणि माझ्या जगाशिवाय तिथे तिसरे जग असेल. पुढे मागे ते पण माझेच जग होईल पण ते माझे होईपर्यंत काय ?

तो असेलच.... पण आत्ता असतो तसा सावलीसारखा नसेल सोबत कायम . कुठेतरी बालवाडीत आईने बोट सोडले तसे तो पण मला या नवीन बालवाडीत बोट सोडून एकटीने पुढे जायला लावेल.

बालवाडीचे बरे असते. तेव्हा माझे तुझे समजत नसते. त्यामुळे बालवाडीच्या बाईंवर हळू हळू आईपेक्षा जास्त विश्वास बसायला लागतो.
उकार चुकलेला आईने दाखवला तरी बाईंनी असेच शिकवले आहे असे तोऱ्यात सांगता येते . आणि आई गप्प बसून आपले कौतुक पाहते. बाईंनी केलेली तक्रार पण लाडिक पणे बाबांना सांगते आणि मग ते दोघे गालातल्या गालात हसतात.

तो पाहणार का असे कौतुक ? मी चुकते आहे हे सांगताना आईने दाखवला तसा संयम असेल त्याचा ? तिथे बाईंनी तक्रार केली तर गालातल्या गालात हसेल ? कि माझ्यावरच रुसेल ?

मनात प्रश्न उभे राहतात जेव्हा वाटते आता माझे जग बदलणार आहे. एक नवीन बालवाडी , प्रत्येक पायरीवर एक परीक्षा आणि मग बालवाडीतून पहिली , दुसरी करत करत मी आईचे बोट सोडून खूप पुढे निघून जाईन.

तो असेलच. बालवाडी पेक्षा जर्रासे मोठे झालेले माझे मन सांभाळायला तो कुठेतरी असेलच. पण त्याच्यासोबत असलेल्या जगाचे काय ?

त्याच्यासाठी पण एक जग असेल. जे आत्ता माझे आहे ते पुढे त्याचे पण जग बनेल. पण थकल्यावर गोड स्वप्न पडावे तसे थोड्याच वेळापुरते ते जग त्याचे असेल. तिथे त्याचा अस्तित्वाला मान असेल . तिथे त्याला थकण्याची संधी कमी असेल आणि आराम भरपूर असेल. तिथे त्याने काही नवीन शिकावे असा अट्टाहास करणारी मीच असेन फक्त. पण तो काही चुकला तरी त्याची चूक मोजलीच जाईल असे नसेल. त्याचे जग chocolate च्या बंगल्यासारखे असेल . सुंदर , मोहक , जिथे मला पण जावेसे वाटेल पुन्हा पुन्हा . कारण तिथेच तर माझे एक जग होते याची जाणीव होत राहील पुन्हा पुन्हा.

पण त्याच्या सोबत असण्याचे खरे सुख या नवीन जगातच असेल नं ? कितीही वाटले तरी पुन्हा पुन्हा माझी नजर जाईल त्याच्या पानाकडे जेव्हा तो खात असेल त्याची नावडती भाजी आणि फक्त माझ्या अट्टाहासासाठी तो ती निमुटपणे खाईल. ठावूक आहे मला कि तो ते सगळे करेल ज्याने मी खुश राहीन. इतकी कि आठवणींचा एक कप्पा सुद्धा त्याच्या प्रेमाने भरून टाकेल तो आणि मला या माझ्या वाटणाऱ्या जगाची आठवण पण नाही येऊ देणार.

त्याला जाणवेल का माझे अवती भवती असणे ? उगाच भीती वाटते. तो पाहत असेल का माझी उगाच होणारी पळापळ ? कोणीतरी परके येऊन फुंकर घालेल मला एकटीला पाहून तेव्हा तो असेल का तिथे माझी नव्याने फुलणारी मैत्री पाहायला ? कि त्यानेच पाठवले असेल या नवीन सोबतीला ?माझी नजर भिरभिरत राहील त्याला शोधायला. पाहत असेल का तो मला दुरून ? बावरलेली माझी नजर समजेल का त्याला ?

नवीन जग , नवीन लोक..  मैत्री तर होईल माझी. तो असेलच.... फक्त सावलीसारखा नसेल. त्याचे अस्तित्व मला जाणवेल आणि माझ्या अस्तित्वाची त्याला फिकीर असेल. ते जपत तो पण मला या नवीन बालवाडीत रूळवेल  . मी बनेन त्याची आणि या जगातल्या सगळ्यांची .अशीच वाढेल माझी मैत्री. त्याच्या प्रेमात , त्याच्या उपस्थित आणि अनुपस्थित.

माझे नवीन आयुष्य असेच बनवायचे आहे नं मला ? त्याचे , माझे , आमचे ?? त्याच्या आनंदात माझे जग बनेल , ते फुलेल अगदी तसेच जशी आमची मैत्री फुलली , प्रेम वाढले आणि आता आमचे जग नव्याने उभे राहील.

- ती

ती नवीन जग घेऊन येईल , त्याचे काय ?

ती आता इथे नवीन जग बनवेल. तिच्या कल्पनांचे , तिच्या आवडीच्या गोष्टीनी सजलेले. कॉलेज मध्ये रंगमंच सजवायची तेव्हा सगळी कल्पकता तिचीच तर असायची. पण मला सगळे आवडायचे . अगदी काळा पडदा आणि पांढरे दार पण तिने बनवले आहे याचे कौतुक असायचे. तेच कौतुक इथे होईल सगळ्यांकडून यात शंका नाही. तिच्या असण्याच्या गन्धापेक्षा मोठे सुख काहीच नाही आहे हे नक्की.

पण रंगमंच मोकळा असायचा. आणि इथे एक जग आहे. ते माझे आहे, ती ते सगळेच बदलून टाकेल ? कि याच जगाचा एक भाग बनून जाईल. नाही ...पण तसे झाले तर तिच्या कल्पनांचे काय ? आणि तसे नाही झाले तर हे आहे या जगाचे काय ?

तिच्यासोबातचे जग ती सोडून येईल . सुट्टीच्या दिवसात ते माझे जग असेल. पण मग लहानपणी मी मजा अनुभवली तशी सुट्टी असेल ? नकळत वागण्यावर बंधने आलेली असतील. आणि ती मी शहाण्या मुलासारखी पाळतोय पाहून लहानपणी बाबांच्या शिक्षेला मुकाट सहन करणाऱ्या मला नावडती भाजी खाताना पाहून नकळत डोळे भरायचे आईचे तसे तिचे पण डोळे भरून येतील ? तिच्या जगात असताना ती घेईल का माझी काळजी ? कि हरवून जाईल त्या सुखात जे सोडून कायमची आलेली असेल ती माझ्यासोबत ?

पण ती देखील पाळेल या नवीन शाळेतली शिस्त . तेव्हा तिचा मीच असेन इथे . फक्त मी !! बाकी सगळे अनोळखी जगातले तिचे नवीन सोबती. त्यांची आणि तिची मैत्री होईलच. पण तोवर तिला जाणवणारी पोकळी मी भरू शकेन ? कितीही सोबत असली तरी मनात एक मोकळी जागा असेल तिची... तिच्या आठवणींसाठी. कधी भरू शकेन का मी ती माझ्या प्रेमाने ?

पळत राहील कायम. कॉलेजात पण तेच करायची. पाहीन मी तिला . आणि मग तिच्या दमलेल्या चेहऱ्याला गर्दीत मी नाही दिसलो कि जी छटा येईल. ती पाहण्यासाठी मी पण दुर्लक्ष करेन आणि मग हळूच कोणाला तरी पाठवेन तिच्याशी नव्याने मैत्री करायला. तिची भिरभिरती नजर कळेल मला . पण मी दूर असेन तेव्हाच तर तिला माझ्यासभोवतीच्या जगात कोणी तरी तिचे आपले वाटेल . दुरून काळजी घेईनच मी तिची .

ती करेलच मैत्री . मला विश्वास आहे. असेच बनवेल नं ती आमचे जग ? अगदी सुंदर. कॉलेज च्या स्पर्धांमध्ये stage बनवले अगदी तितकेच ...किंबहुना त्यापेक्षा सुंदर असेल माझ्या आयुष्याचा रंगमंच .....सुंदर आणि कल्पनेपेक्षाही  वेगळा


- तो

2 comments:

  1. नवीन जग , नवी माणसं ...
    आयुष्याचा रंगमंच नक्कीच अप्रतिम असतो....
    त्या रंगमंचावर तुम्हा दोघांच ...
    मनःपूर्वक स्वागत ....
    तुम्ही ह्या रंगमंचावर खूप यशस्वी व्हाल ह्यात शंकाच नाही ...आमच्या सर्वांच्या ती आणि तो ला शुभेच्छा
    ....दी

    ReplyDelete
  2. हुं..... वेध लागले वाटत ?
    काय रूप्स ???

    ReplyDelete