Friday, May 28, 2010

पहिली रात्र

पहिली रात्र हि कल्पना हिंदी सिनेमाने ठरवून दिली आहे. कल्पना करायची ठरवली तर सेज पे  शरमाती  हुई नटी आणि शेर म्हणत शेर सारखा खोलीत येणारा नट असे चित्र नजरेसमोर येते नं ? पण ती सुहाग रात असते  . ती पहिली रात्र ....असे आपण मराठीत केलेले भाषांतर आहे असे  म्हणूयात!!!!

माझ्या आयुष्यात मात्र खूप पहिल्या रात्री आल्यात  ( वाचून माझ्यावर संशय आला न  ? ) , गैरसमज नको.... पण खरच माझ्या आयुष्यात  मात्र खूप पहिल्या रात्री आल्यात. आणि त्यांचीच हि आठवण.

हो..... माझी सगळ्यात पहिली रात्र होती तेव्हा मी काय केले असेल अंदाजाने सांगते..... तिला मी माझी पहिली.. पहिली रात्र म्हणते . म्हणजे ...माझा जन्म झाला ती रात्र ...माझ्या आयुष्यातली पहिली... पहिली रात्र होती.  जन्म रात्री १ वाजता झाला त्यामुळे माझी पहिली रात्र रडतच गेली असेल असा माझा एक अंदाज !!

म्हणजे बालवाडी ....पहिलीत... काही आठवत नाही त्या रात्री मी काय केले म्हणून मग थेट मोठी उडी मारतेय माझ्या मोठ्या शाळेवर ....

पुढे मला समजत होते तेव्हाची पहिली रात्र म्हणजे मी पाचवीला शाळेत जाऊन आले  ती रात्र. त्या रात्री मी खूप खुश होते. नवीन शाळा ( आम्ही त्याला मोठी शाळा म्हणायचो तेव्हा .. ) , सगळे काही नवीन. आणि त्यात मला हवी ती म्हणजे अ तुकडी मिळालेली. त्यामुळे माझी स्वारी खूप खुशीत होती. आता मी या शाळेत खूप अभ्यास करेन . आणि नेहमी गृहपाठ पूर्ण ठेवेन असे नवीन नवीन बेत. थोडक्यात माझे शालेय आयुष्य खूप सुंदर कसे बनेलयाचे बेत आखत आणि स्वप्ने रंगवत मी झोपून गेलेले.

मग शाळा , अभ्यास , आणि मग परीक्षा या सगळ्यात  " कुठून मी मोठ्या शाळेत आले रे देवा ?  छोट्या शाळेतच छान होते "  असे वाटायला लागले .  आता पुढच्या पहिल्या रात्रीची स्वप्नं पाहत मी दिवस मोजत होते . शाळा संपली कि मग मी कॉलेजात जाणार अशी स्वप्नं पाहायला लागले.

लवकरच ती पहिली रात्र पण आली. चक्क दहावी पास  होऊन मी कॉलेजात आलेच !!  पहिल्यांदा तिथे गेले ना.... तर खूप मोकळे वाटले . म्हणजे.... हेच हवे होते मला असे वाटले.  नकोत ते सर जे पांढरे बूट नसले कि मग रागवतात आणि नको तो युनिफोर्म . रोज नवीन कपडे ....आहा !! तास बुडवा , पळून जा  ... सगळे हवे तसे.... हो कॉलेजातून आल्यावर पहिल्याच दिवशी कॅन्टीन मध्ये वडा पाव खाऊन आले आणि किती तरी वेळ मी माझ्या कॉलेजात मी काय काय करेन याचे बेत आखत होते आणि स्वप्न रंगवत होते.

मग समजले अरे इथे शाळेपेक्षा जरासे कठीणच आहे. अभ्यास किती वाढलाय ??  तास बुडवून काही काही नाही होणार. तासाला बसले तर निदान काहीतरी समजेल. आणि आता रोज काय नवीन घालू हा प्रश्न . आणि आईने अकरावीतच गाडी मिळणार नाही अशी तंबी दिली आणि मग पुन्हा सायकल आणि मी ... मला हे नको होते. आता मेडिकल कि इंजिनिअर हा एक नवीन प्रश्न आलेलाच होता सोबत. पुन्हा एकदा " कुठून शाळा संपली रे देवा ??  हे रोज उशिरा पर्यंत क्लास आणि मग अभ्यासाचा त्रास. हे जुनिअर आयुच्या नकोच. सिनिअर व्हावे पटकन म्हणजे सुटले मी . " पुन्हा तेच पुढचे बेत , पुढची स्वप्ने ..... आणि... माझी पहिली रात्र!!!

सिनिअर कॉलेजात आल्यावर भावनांमध्ये काही बदल नाही झाला.... आता नोकरी आणि पुढे काय शिकायचे हे प्रश्न सोबत होतेच. आणि त्यांच्याबद्दल वेगळे काही नव्हते पण हो.... आणखीन एक गोड स्वप्न होते . लग्न आता मला प्रश्न सुटतील अशी एकच जागा होती . मी लग्न करेन आणि घरात बसेन. नवरा कमवेल आणि मी मजा करेन. हे स्वप्न !!!  त्याचे बेत !!!  घर कसे सजेल इथ पासून काय करावे कसे बनवावे इथपर्यंत सगळेच..... तर या काळातली स्वप्ने मोठी होती, आणि नेहमीप्रमाणे पुढच्या पहिल्या रात्रीची स्वप्ने पाहणे हा नियम मी सोडला नव्हता. 

हो.... पण ..... अजून त्या पुढे काय हे अनुभवले नाही. पण नेहमीप्रमाणे हि रात्र गोड आणि मग " अरे देवा याच्यापेक्षा एकटीच बरी होते " हि भावना आणि मग  पुढच्या पहिल्या रात्रीची स्वप्नं!!! हे चक्र चालत राहील ना ??

 जशी मी आले तसे आणि कोणी येईल याची स्वप्नं आणि मग त्या लहानग्या जीवाच्या आयुष्यातले ते सगळे क्षण आणि त्या सगळ्या पहिल्या रातींची स्वप्नं !! आई ने सुद्धा पहिली असतीलच ना ती सगळी स्वप्ने माझासाठी ?? माझ्या प्रत्येक पहिल्या रात्रीत तिची पण एक पुढची पहिली रात्र असेल नाही ??

प्रश्न ... त्या प्रत्येक फेज चा कंटाळा ....आणि मग पुढे काहीतरी छान असेल ....हे एक गोड स्वप्न !! हे चक्र प्रत्येक जण जगत असेल नाही ?

यात सगळ्यात सुखाचा काळ असतो ..." पहिली रात्र" . आपल्याला हवे ते मिळाले आहे हि भावना.... आणि त्यातून मिळणारे समाधान... हे सगळ्यात जास्त केव्हा असते  ?? तर त्या प्रत्येक पहिल्या रात्री जेव्हा आपण आपल्याला हवे त्या शिखराकडे जाणाऱ्या पुढच्या पायरीवर चढतो आणि  एका रात्री साठी त्या पायरीवर निवांतपणे विसावतो. तीच तर असते  कल्पना केलेली पुढची पहिली रात्र ....

ती सेज.... ती फुले ....असतात ...आपल्या कल्पनेत....  आणि ती प्रत्येक पहिल्या रात्री असतात आपल्या सोबत . हो ....पण शेर सांगणारा शेर आणि शेर  ऐकणारी शेरनी एकदाच येते !!! प्रत्येकाने कल्पना केलेली असते ना  .....सिनेमातली पहिली रात्र !! त्याच दिवशी !!!

Wednesday, May 26, 2010

सोबत

भाजी वाल्याशी हुज्जत घालणाऱ्या देशपांडे काकूला  पहिले आणि काकांची आठवण झाली.

देशपांडे काका .... बोलता बोलता कविता करायचे. कारकुनी नोकरी असली तरी फक्त हिशोबाची वही नाही तर बरेच काही लिहिणारे देशपांडे काका .... बोलता बोलता कविता करणारे देशपांडे काका...... " सोनू ..... एक दिवस माझे पण नाव येईल या व पु आणि हे कोण कवी लोक आहेत त्यांच्या सोबत "... असे म्हणणारे  देशपांडे काका.... आणि आमच्या फुटकळ दाद देण्यावर सुद्धा मनापासून खुश होणारे वल्ली ... देशपांडे काका !!

५०००० रु साठले कि माझे पुस्तक छापेन असे कायम स्वप्न पाहत जगणारे देशपांडे काका....

काका आणि काकू असे हे सरळ रेषेसारखे सरळ आयुष्य जगणाऱ्या दोघांचे कुटुंब. काका आणि काकुनी माझ्यासारखी खूप मुले आणि कबिलाच म्हणूया असा गोतावळा लावून घेतला होता. आणि खरच काकुच्या हातच्या पदार्थांना  चवच न्यारी !!  आणि ते चाखणारे आम्ही आणखीन न्यारे !!  काकांचे खूळ एकच त्यांना आपले पुस्तक प्रकाशित करायचे होते.

कुठून तरी पिवळ्या पडलेल्या वह्या काढून आवर्जून कविता वाचून दाखवणे आणि मगच  "अहो आता चहा आणा आमच्या रसिकांसाठी " अशी काकुकडे फ़र्माईश  करणे हा काकांचा  आवडता नाद  होता . आणि त्या चहा साठी त्यांच्या कविता ऐकण्याचा नाद आम्हाला पण जडला होता. मनापासून सांगायचे तर ते खरच खूप सुंदर लिहायचे.

" एक होती परी .. सुंदर गोरी गोरी .. देवाचं घर स्वच्छ ठेवी भारी  "  हि कविता त्यांनी मला स्पर्धेसाठी खास लिहून दिली होती आणि हो त्याला चक्क शांता शेळकेंची दाद मिळाली होती. " छान आहे अशीच लिहितरहा "  हा त्यांचा ठेवा अजूनही माझ्या वहीत आहे. पण ती दाद पाहून काकांनी " अहो पाहिलंत का ? सोनुला शांता बाई म्हणाल्यात ? अशीच लिहित रहा .. म्हणजे मलाच हा संदेश नाही का ? "  .. " हो त्यांना काय जातंय दाद द्यायला ?? लहान पोरींनी लिहिले आहे वाटून दाद दिली आहे त्यांनी . तुम्ही वही नेली असती न तर थेट भिरकावून म्हणाल्या असत्या अहो हे काय लहान मुलासारखे लिहले आहे  ? " इति काकू . " हो पण अहो त्यांना ती लहान मुलीने लिहिले आहे असे वाटणे हि पण दादच नाही का ? " काका 

हे संवाद नवीन नव्हते . चहा हातावर टेकवताना " तिकीट लावा हे सगळे येतात का पाहू. काय ग सोने येशील का ? चहा देणार नाही मी... फक्त कविता ऐकायच्या " असे काकू म्हणाली नाही तर आज काहीतरी चुकलं  असे वाटायचे. पण तीच काकू काकांची समीक्षक होती. संध्याकाळी घराच्यापायऱ्यांवर बसून काकांनी काकूला ताजे ताजे ऐकवायचे आणि  हातात वाती धरून काकू ने ते ऐकत हे असे का नाही लिहित म्हणायचे हे दृश्य आता सगळ्यांच्या सवयीचे झाले होते. त्यांना तसे पाहताना लग्न ठरले तेव्हा मी नवऱ्याला म्हणाले होते " आपण पण असे म्हातारपण जगायचे"  " तू नाहीस ना कविता वाचणार ? " असे म्हणून त्याने माझी टर उडवली होती.

काकांचे पैसे साठवणे नेमाचे होते आणि काकू पण पदरमोड करून पैसे साठवत होत्या. महिन्याला ५०- १०० कसे जमेल तसे आणि तेवढे काकू " कविता संग्रहासाठी फंड " असे लिहिलेल्या पेटीत पैसे टाकत रहायची. आणि आम्ही पण चार आठ आणे टाकायचो. खाऊ ला शाळेत मिळायचे ते. मी दुसरी तिसरीत होते तेव्हापासून हे स्वप्न त्यांच्या इतकेच मी पण पहिले होते. पहिला पगार आला तेव्हा मी ५०० रु घेऊन गेले आणि काकांनी  " सव्वा रुपया टाक सोने पुरे तेवढा !! " असे म्हणून सव्वा रुपया आपल्या फंडात टाकलेला.

मला आठवते.... पगार झाल्यावर सहाच महिन्यात काकांनी "५०००० रुपये जमले हम्म सोने "  असे म्हणून मला पेढे भरवलेले . " आता प्रकाशक पाहायला हवा. "  असे म्हणून प्रकाशकाकडे खेपा घालणे त्यांनी सुरु केले होते.  रोज ह्या ना त्या कारणाने त्यांचे लेखन नाकारले जात होते. पण निराशा नव्हती. त्यांची हि भावना पण कवितेतून आलेली. 
                           बाजारात विकण्यासाठी शब्द नाही मांडले , अन बाजारासाठी त्या शब्द माझे सांडले. 

वर्षभर काका खेटे घालत होते. साठी आली असेल त्यांची . पण " अभी तो जवानी कि शुरुवात हे सोनी  " असे म्हणत ते धावत राहिले. त्या फंडातून बरचशी रक्कम  प्रकाशकांकडे खेटे घालताना खर्च व्हायची. पण आमच्यासाठी येताना खाऊ आणणे त्यांनी कधीच नाही सोडले .   काकांचा षष्ठी होम मी आणि आमचा गोतावळा यांनी मिळून घरातच केला. आणि मग काकू पण नटून थाटून शामिल झाली. " सोने पोर नाही पोटची पण तू आहेस गं . नाहीतर यांचे असे वेड पांघरून जगणे आता सहन नाही होत. काल त्यांचे कसले पगारातून कापले जायचे कसला प्रोवी काहीतरी... फंडाचे पत्र आलंय . तू पहा बाई . ते पैसे पोस्टात टाकू. नाहीतर त्यांच्या फंडात जातील ते. " असे डोळ्यात पाणी आणून काकू म्हणाली तेव्हा पहिल्यांदाच काकांच्यावेडाचा तिला त्रास होतोय असे जाणवले. तोपर्यंत तिने कधीच तक्रार म्हणून नाही केली.

दोन खोल्यांचे घर आणि वर्षाला ३ साड्या हे आयुष्य हसत जगली. आणि फंडात पैसे टाकत राहिली . ती काकू खूप वेगळी वाटत होती. पण अगदी लक्ष्मी सारखी  दिसत होती त्या दिवशी काकू. त्यात तिने डोळ्यात पाणी आणू नये असे खूप वाटले .

पण शेवटी काकांना एक प्रकाशक मिळाला. आणि पुस्तक छपाई ला प्रेस मध्ये गेले सुद्धा !!!  त्या दिवशी काकूचा आनंद पाहण्याजोगा होता. "  पुस्तकाच्या १० हजार प्रती सोने १० हजार. पहा आता " ... " काका मला सही करुन द्यायचे हम्म पुस्तक " असे म्हणत त्या आनंदात शामिल झालेली मी . सोन्याचाच दिवस होता तो.

पुस्तके छापून आली. आता प्रसिद्धी ?? त्याचा विचार आम्ही कोणी कधी केलाच नव्हता. बरे असाच पत्रिका छापणारा कोणीतरी  होता आणि प्रकाशक म्हणून त्याने पुस्तक छापून दिले होते आणि प्रसिद्धीची जबादारी काकांनी आपल्याच खांद्यावर घेतली होती हे नव्यानेच समजले. मग मी थोडी पुस्तके फुकट ऑफिसात वाटावीत असे ठरले. 

तसे मी केले सुद्धा , आणि मग कोणी ती विकत घेईना .कारण .. " कविता संग्रह खरेदी करुन कोण वाचेल आग सोनाली ? "  ... " फारच छान आहे हो सोनाली. मग मी हे भेट म्हणून ठेवून घेऊ ना ? " " सोनाली मला ना हि छान आयुष्याचे स्वप्न फारच आवडली . बाकी ठीक ठक आहेत ."  या प्रतिक्रिया हे मुख्य कारण होते.

वर्षभर ती पुस्तके बाहेर अंगणात असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये पडली. काकांचे पण वय वाढत होते. आणि  पुस्तकाच्या छपाई ला ६० हजार रुपये लागले म्हणून काकूचे तोडे गहाण टाकले आणि १० हजार रुपये उचलले हि कबुली काकांनी दिली आणि घरातले वातावरण गढूळ झाले .  काकू ची बडबड आणि वाद वाढले. ती पण थकली होती. आणि काका विश्वास गमावून बसले होते.

अशातच एक दिवस मेंदू मध्ये ताप गेला आणि काका गेले. माझा साडीचा पदर ओला होईपर्यंत काकू रडली. " सोने हा माणूस प्रसिद्ध झाल्याशिवाय मरू कसा शकतो ? " असे पुन्हा पुन्हा म्हणत राहिली.  अशी हतबल आणि रडताना काकूला मी त्याच दिवशी आणि त्या नंतर प्रत्येक दिवशी पहिले.

वाती वळताना हातातला कापूस भिजून जायचा आणि काकूला भानच नसायचे. मी गेले कि म्हणायची " आता चुका काढायला कोण गं राहिले माझे ? "  रोज एकदा सगळी पुस्तके काढून साफ करणे हा तिचा नित्यक्रम झाला होता. आणि तिला सफाई करताना पाहून मला सासरी फोन करुन "  सोनी ये गं बाई "  म्हणत आईचाओला आवाज ऐकणे हा माझा नित्य क्रम झाला होता. फोन ठेवताना " देवा काकूला सोडव " हे वाक्य नकळत निघून जायचे.

काकू मात्र नवऱ्याला प्रसिद्ध झालेले पाहिल्याशिवाय नाही जाणार असे ठाम ठरवून असल्यासारखी आपला क्रम जगत होती. आम्ही अधून मधून जाऊन भेटत होतो. एकदा गप्पा मारताना एका सेवाभावी संस्थेसाठी काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीने मला काकांच्या कवितांचा कार्यक्रम करुन बाहेर त्या पुस्तकांचा खप करायला stall  लावावा असे सुचवले . आणि तिच्या कल्पनेला मूर्त रूप आले . ६० पुस्तके खपली आणि त्याचे पैसे घेऊन मी काकुकडे आले. तिने ते काकांचा फंड असलेल्या डब्यात टाकले आणि " त्यांचे आहेत बाई त्यांनाच राहू देत " असे म्हणाली.

एक दिवस आई चा फोन आला . अगं काकूने बोलावले आहे म्हणाली. काकू कडे आल्यावर तिने मला एक पत्र दाखवले. काकांचे पुस्तक वाचून कोणीतरी त्यांना पाठवलेले पत्र . " सोने हे असे पत्र आले कि त्या पत्रांचे पुस्तक छापायचं गं " असे म्हणत तिने तो कागद माझ्या हातात दिला. " आता हा दारातला पहा कसा हसतोय . म्हणाला बाकी पत्र सोनी आणि तुझा गोतावळा करेल गोळा . आणि छापेल पुस्तक . आता तुझी वेळ झाली. कविराज वाट पाहत आहेत म्हणतोय पहा कसा. ते गेले तेव्हापासून दारात उभा आहे हा असा . रोज त्याला सांगते थांब रे एक पत्र आले कि लगेच निघू. मी माझी कामे केली. कोणी खरेदी करेना म्हणून मग रद्दी वाला आलेला म्हणाला आजी चला एक रुपया जास्ती देतो किलोला , म्हणून त्याला ती पुस्तके विकली. रद्दीच्या दुकानातून पण लोक घेतात गं पुस्तके. तू आलीस आणि मघाशी सखाराम चा मुलगा आणि बाकी रसिक लोक येऊन गेले. आता तुला चहा देते थांब "  असे बोलत ती हातात चहा घेऊन आली.

" सोने आता परत येऊ नकोस बाई . मला मग कवितांची आठवण येते, आता रसिक आहेत त्यांचे . पहा पत्र आले आहे. आता तुम्ही रसिक मंडळातल्या लोकांनी इथे येऊ नये हि इच्छा आहे म्हणून आज सगळ्यांना शेवटचं बोलावून चहा पाणी केले . सहज आई कडे आलीस तर ये गो बाई माझी. पण काकासाठी आणि काकुसाठी अशी नको येउस . मला त्रास होतो. "

" काकू पण ... " यापुढे काकूने मला बोलूच नाही दिले.  आज किती दिवसांनी दिसतेय असे वाटले तिला  बाजारात आज पाहिल्यावर. जाऊन मिठी मारावी आणि खूप रडून घ्यावे असे वाटले. पण तिची आज्ञा....  तिला शेवटचे भेटले २ महिन्यांपूर्वी आणि आज पहिले.  " काकू " मी हाक मारल्यावर तीच येऊन मिठी मारून रडायला लागली " सोने येत जा गं . ते मला एकटीला कविता ऐकवतात. फार फार त्रास होतो. आणि तो दारातला मला इथून नेत नाही. वेड लागेल गं मला एकटीला ... "

" येईन गं काकू . करमत नाही मला पण " असे म्हणून मी पण पोटभर रडले. आल्या आल्या सगळ्या रसिक लोकांना फोन करुन काकुकडे जमायला सांगितले. आणि संध्याकाळी  काकूला हसवण्याचा  बेत केला.  

सोबती असेन मी दुरावालास तू तरी..... अशी एकदा काकूने काकांना कवितेत सुधारणा सुचवलेली .. तेच आठवले. ती काकांच्या कवितांची खरी रसिक होती, निस्वार्थी आणि दर्दी. कविता मनापासून जगली आणि तिनेच ती कविता काकांच्या मनात जगवली  .

पण तरीही आता सोबत पुरे . देवा काकूला सोडव असे मनापासून वाटले . नेहमीप्रमाणे आणि पुन्हा एकदा !!!  

Thursday, May 6, 2010

सोशल कंडिशनिंग

माझ्या मागच्या लिखाणात प्रतिक्रियांमध्ये सोशल कंडिशनिंग असा कोणी तरी उल्लेख केला आणि त्याच्याबद्दलच लिहावेसे वाटले.

गेले काही दिवस माझ्या भोवताली अशा काही घटना घडत आहेत कि सोशल कंडिशनिंग हि असली मूर्ख कल्पना कोणी आणली ? आणि त्याचा परिणाम काय होत आहे ? असले परिणाम कशासाठी ? असे वाटायला लागले .

त्यातच डॉक्टर राजीव शारंगपाणी यांचे एक पुस्तक आज वाचनात आले. आणि मग हा माणूस करतो आहे तसा विचार सगळेच लोक का नाही करत असे वाटले. ( त्यातले काही विचार माझ्या आत असलेल्या भारतीय मुलीला पचले नाहीत पण तरीही लिखाणाचा मनावर परिणाम झाला कुठेतरी ) म्हणून हा प्रपंच !!!

सुरुवात अगदी सध्या उदाहरणाने केली तर परवा आमची एक मैत्रीण तयार झाली आणि मग म्हणाली कि " मला हा असा पिवळा धमक ड्रेस फार आवडतो अगं , आणि माझ्यावर हा छान पण दिसतो पण मी हे घालून गेले तर माझ्या ग्रुप मधले लोक काय म्हणतील ?? " सोशल कंडिशनिंग .....

' मला आवडते ते मी करणार ' असा विचार का नाही होत ?? घातला ड्रेस हसले लोक " हसतील त्यांचे ( पुढे आम्ही घासलेले असे म्हणतो ) दात दिसतील" असा विचार का नाही होत ??

एक पाऊल पुढे जाऊन सांगायचे तर ... माझी एक मैत्रीण प्रेमात पडली . मुलगा छान..... दिसायला , वागायला , आणि तिच्यासोबत एम बी करणारा होता , नोकरी पण अगदीच छान होती. फक्त तो तिच्या जातीतला नव्हता . म्हणजे म्हणायचे झाले तर दोघे एकाच जातीचे होते पण ती त्या जातीतल्या उच्च कुळातली होती. म्हणून घरच्यांनी भेटून त्याला समजावले आणि तिला ते म्हणाले " अगं आपल्या जातीतले लोक काय म्हणतील ?? काय पाहिलेस त्याच्यात ?? जात कुळ तरी पहायाचेस नं ?? " सोशल कंडिशनिंग ..... " ती सुद्धा मला तो आवडला आहे ... असे ठामपणे म्हणू शकत नाही " आणि मग आता तिच्यासाठी बळजबरीने मुले पाहणे चालू झाले आहे .

परिणाम ??? ती आता पळून जाण्याच्या विचारात आहे . आणि अगदीच एक दोन वेळा मोठ्यांना समजावण्याचे प्रयत्न निष्फळ झाले तर ते होईल सुद्धा . सोशल कंडिशनिंग च्या प्रयत्नात आई वडील तिला चुकीचे ( समाजाने चुकीचे म्हटले आहे ) असे काहीतरी वागायला प्रवृत्त करत आहेत . हे असे किती तरी मुलींच्या बाबतीत होते. आणि मग एक तर बळजबरी च्या लग्नात त्या संसार रेटत राहतात ...... आणि धाडस झाले तर पळून जातात . आता पळून गेली हि चर्चा होणे काय आणि जातीतला मुलगा नाही तरी लग्न करून दिले हि चर्चा होणार काय ??? एकच नं ??? सोशल कंडिशनिंग च्या प्रयत्नात अब्रू ( जिचे इतके अवडंबर केले ती ) जाणारच नं ?? त्यापेक्षा अगदीच मुलीचे अहित असेल ते तिला योग्य पद्धतीने सांगून किंवा मुलगा चांगला असेल तर भलत्या भानगडीत पडून लग्न लावून देणे हे शांततेचे मार्ग लोक विसरून जातात.

आणखीन एका प्रकारात मुलाने लग्न मोडले ... " अरे लोक काय म्हणतील याचा विचार केला आहेस का ?? " हे त्याला ऐकवण्यात आले . " तुम्ही जरा माझा विचार करा आणि लोक काय म्हणतील त्याचा नंतर " असा जबाब त्याने दिला. काही भेटीत मुलगी नाही आवडली तरी त्याने लोकापवादास्तव ते लग्न ठरले आहे म्हणून रेटणे कितपत योग्य आहे ?? देवच जाणे . पण त्याने घेतलेला निर्णय पुढचे १० प्रकार वाचवत आहे . पुढे जाऊन घटस्फोट , वैवाहिक जीवनात ताण तणाव असू शकतील हा विचार सोशल कंडिशनिंग च्या मागे धावताना होतच नाही.

माझ्या मागच्या कथेतल्या मुलीने सुद्धा आपल्या बहिणीचे लग्न कसे होईल असा विचार करत १० वर्षे त्रास सहन केला आणि आता बहिणीचे लग्न ठरलेले आहे म्हणून ती सहन करणार होती, हे ऐकून तिचे कौतुक करू कि कीव करू असे वाटले . बहिणीच्या सासरचे लोक काय म्हणतील हि भीती . सोशल कंडिशनिंग चे एक रूप. आधी लग्न ठरेल का आणि ठरलेले लग्न मोडेल का ?? पण... मला त्रास होत आहे आणि मी सहन नाही करणार.... असे म्हणून वेळीच निर्णय घेतला गेला असता तर मग पुढे झालेले किती तरी त्रास वेळीच मिटले असते.

या सगळ्या घटना घडताना लोक काय म्हणत होते ते पाहूयात आता   .... कोणी म्हणाले " आज काल च्या पिढीला आपले दुक्ख कळत नाही . शेवटी आपल्याला समाजात राहावे लागते . हे इतके सोपे नसते " , " लग्न ठरवताना अक्कल नव्हती ?? आता पुढच्या लग्नाला किती अडचणी येतील ?? ( हे वाक्य बोलणाऱ्या काकूचे सुनेशी पटत नसते आणि तिचा मुलगा पण बायकोला वैतागलेला असतो.थोडक्यात ते चुकलेला निर्णय रेटत असतात आणि आपली सोशल इमेज जपत राहतात . मानसिक त्रास होतो पण सांगणार कोणाला ??  ) , " सासूने त्रास दिला नाही का आम्हाला कधी ?? असे चालायचेच " ( हे वाक्य बोलणाऱ्या काकू ची मुलगी वेगळी झालेली असते . तिला हा नियम नसतो ) , "ड्रेस किती भकास असतात तिचे ?? पिवळा काय अरे?? " ( तिला आवडला.... तिने घातला .... आणि हे असले वाक्य बोलणार्याने केशरी pant वर लाल शर्ट घातलेला असतो )

सोशल कंडिशनिंग स्वतः वर जे लागू करून घेतात त्यांच्या तर नैसर्गिक विधिना सुद्धा ते लोक काय म्हणतील याचा विचार करून ते जात असतात . ( म्हणजे प्रवासात !!! गैरसमज नको !!! ) तेव्हा आत्ता हे आपल्याला असे वाटत आहे असा विचार होत नाही.हि मनाची आणि शरीराची गरज आहे आणि व्हायला हवे असे वाटणे महापाप वाटते त्यांना .

आता पुस्तकातले एखादे वाक्य तरी टाकायलाच हवे ...... पुस्तक " चतुर साहचर्य " या बद्दल होते . त्यात त्यांनी छान उदाहरण दिले होते आणि ते सोशल कंडिशनिंग कसे असते त्यात फिट बसत आहे म्हणून लिहित आहे ( थोडी धाडसी वाटली वाक्य तर क्षमा !! मी पण जरासे सोशल कंडिशनिंग पाळते इथे !! लिखाणातला विरोधाभास !! ) " माणूस सुख शोधात असतो, लहान मुलगा त्याच्या लैंगिक अवयवांशी खेळत असेल . तर तेव्हा त्याला पहिल्यांदा सुखाची अनुभूती येते .. आणि आपण त्याला रागावून सांगतो " असे घाणेरडे पणा नाही करायचा " ... बरे नाही म्हणाले कि मग ते हवेसे वाटते आणि मग त्यातून चोरून वागायची वृत्ती निर्माण होते त्यातून मग कसले तरी video पाहणे चोरून काहीतरी वागणे सुरु होते "

उदाहरणाचा संदर्भ सोडू पण त्याचा आशय मात्र मला आवडला सोशल कंडिशनिंग पाळण्याच्या प्रयत्नात आपण चुकीच्या वागण्याला प्रवृत्त करतो आणि त्याला नकळत आपण support करतो. म्हणजे धडधाकट भिकारयाला भिक देऊन आपण त्याला " माग रे भिक... काम नको करूस ...आमच्यासारखे देतीलच " असे सुचवण्यासारखे आहे .

फक्त त्याला आपण भिक मागू नकोस हे सांगत नाही  आणि मग भिक मागण्याचे चुकीचे काम करायला आपण त्याला प्रवृत्त करतो . आणि घरात आपण ...करू नकोस , असे नको , चांगले नाही असे म्हणून त्यांना चुकीचे वागायला प्रवृत्त करतो .

मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करणारी मुले असोत , मुलीला सासरी कोणी काही म्हणू नये म्हणून ऐपत नसताना भरमसाठ खर्च करून मुलीचे लग्न करणारे पालक असोत , मुलाला मार्क कमी पडले तरी त्याला डोनेशन देऊन कुठेतरी शिकायला पाठवणारे पालक असोत . सगळे लोक अवास्तव कल्पनांनी समाजात आपल्याला कोणी काही म्हणेल म्हणून मन काय म्हणत आहे याच्याकडे लक्ष देत नाहीत.

मग पुढे हुंड्यासाठी मुलीला मारून टाकणे , मुलांनी अभ्यास न केल्यामुळे त्यांनी नापास होणे , मुलांनी आई वडिलांच्या अब्रू ( ? ) चा विचार करून कमी मार्क पडले म्हणून जीव देणे हे प्रकार पेपरातले कॉलम च्या कॉलम भरून लेख लिहिण्याचे विषय बनलेत . पण त्यामुळे सोशल कंडिशनिंग काही थांबले नाही आहे .
" घालवा असे वागून बापाची आणि आईची अब्रू घालवा " , " लोक काय म्हणतील हे असे करू नकोस " . असल्या वाक्यांना थाराच दिला नाही तर ???

" हे असे केले न तर तुझ्यासाठी चांगले नाही " , " हे असे केलेस न त्यापेक्षा असे करायला हवेस , खूप फायदा होईल " " तुला वाटते न मग होऊन जाऊ देत " असे संवाद झाले तर त्यातून तन तणाव, भोवताली घडणारे किती तरी प्रकार टळतील .

सोशल कंडिशनिंग पेक्षा पर्सनल कंडिशनिंग केले तर घरातले वातावरण आनंदी आणि हसरे होईल.

" कधीतरी वेड्यागत वागायला हवे " हि संदीप खरे ची कविता म्हणूनच मला फार आवडते मग तिनेच या लेखाचा शेवट करूयात . आणि पर्सनल कंडिशनिंग अमलात आणायला लागुयात.

कधीतरी वेड्यागत वागायला हवे

भांड्यावर भांडे कधी भिडायला हवे
उगाचच सखीवर चिडायला हवे
मुखातून तिच्यावर पाखाडता आग
एकीकडे प्रेमगीत लिहायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे

मनातल्या माकडाशी हात मिळवून आचरावे कधीतरी विचारावाचून
झाडापास झोम्बुनिया हाती येत फळ ........
सहजपणाने ते हि फेकायला हवे.
कधीतरी वेड्यागत वागायला हवे

कधी राती लावूनिया नयनाचे दिवे , पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे
शोधुनिया मनातले दुमडले पान...... मग त्याने आपल्याला चाळायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे

स्वतःला विकून काय घेशील विकत , खरी खरी सुखे राजा मिळती फुकट
हपापून बाजारात मागशील किती ,
स्वतःतच नवे काही शोधायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे

तेच तेच पाणी आणि तीच तीच हवा आणि तुला बदल हि कशासाठी हवा ?
जुनेच आहे अजून रीयाजावाचून ....
गिळलेले आधी सारे पचायला हवे .
कधीतरी वेड्यागत वागायला हवे

नको बघू पाठीमागे येईल कळून  , कितीतरी करायचे गेलेले राहून...
नको करू त्रागा असा उद्याच्या दारात.....
 स्वतःलाही कधी माफ करायला हवे .

कधीतरी वेड्यागत वागायला हवे

अर्थात काही गोष्टींमध्ये समाज मर्यादा आणि  कौटुंबिक मर्यादा योग्य वेळी योग्य ठिकाणी पाळायलाच हव्यात. त्यातूनच तर परफेक्ट पर्सनल कंडिशनिंग  होईल ना? पर्सनल कंडिशनिंग  मधून अपोआप सोशल कंडिशनिंग होईलच आणि तेही विनासायास .

मग वागुयात न कधीतरी वेड्यागत

Tuesday, May 4, 2010

नेमके कोण चुकतंय ?

तिची बाजू .....
माझे स्वप्नांचे दिवस मजेत जात होते. अचानक एक स्थळ ओळखीतून आले. मुलगा छान शिकलेला आणि आई वडील आपल्याच भागातले आहेत . माहितीतून आलेले स्थळ आहे असे कसे हातचे घालवा. पत्रिका जुळली , मुलाला मुलगी ... मुलीला मुलगा पसंत पडले झाले .......अजून काय पाहतात ?? असा विचार करून लग्न झाले.

घरात सगळे अगदीच छान होते. मुलाची नोकरी , प्रगती होत होती . मुलगा अगदी सोन्यासारखा होता . साधा , निर्व्यसनी , शांत , सुस्वभावी !! एकुलता एक मुलगा आहे, छान घर आहे ह्याचे समाधान माझे आई वडील मानत होते.

पण ... घरातले वातावरण माझ्या घरापेक्षा खूप वेगळे होते. जे आत्तापर्यंतच्या भेटी गाठींमध्ये कधी जाणवले नाही ते आता समजत होते . इथे स्वतंत्रपणे विचार करण्याची परवानगी नव्हती. छोटीशी गोष्ट सुद्धा परवानगीने होत होती. घरात कोणती भाजी बनवावी हे सुद्धा ठरवण्याचे स्वातन्त्र्य नव्हते. अगदीच कधी बदल म्हणून काही करायला गेले तर घरात वाद होत होते. मला रागावून गप्प करणारी एक स्त्रीच होती. आणि घरातले पुरुष या सगळ्यापासून अलिप्त राहायचे.

ह्याची घरी तक्रार तरी कशी करायची ? आई ला पण तर सुरुवातीला जुळवून घ्यावे लागले होते. म्हणून मी घरातल्या गोष्टींशी जुळवून घेत राहिले . अगदीच त्रास झाला तर दार बंद करून रडणे . आणि नवऱ्याशी भांडून रुसून बसणे हि आता सवय झाली होती. सगळे छान आहे आणि आपण उगाच त्रागा करतोय अस मी समजावत राहिले . आणि खुश राहत राहिले . पण हल्ली हे सगळे असह्य होत होते. फोडणी टाकणे कसे असते इथपासून कसे जेवावे हे सगळे मला नवीन आई ( अहो आई ) शिकवत होती. आणि अगदीच नाही जमले तर " तुझ्या आई ने काहीच शिकवलेले दिसत नाही . आमच्या घरात असे नसते" हे ऐकवणे आणि आता काम करता करता कान पिळणे सुरु झाले होते . आधी मी हे गमतीने घेतले. " आई कान धरून शिकवतात हल्ली " असे हसत हसत मी नवऱ्यापर्यंत नेले सुद्धा पण ... परिणाम शून्य होता.

" आईकडे जावे तर ते घर माझे नाही आता. आणि हे घर ह्यांचे ... माझे घर आहे का कुठे ?? मनासारखे काहीच करता येऊ नये ?? " इथपासून सुरु होऊन विचार अगदी आत्महत्येपर्यंत गेले पण घरात पाळला जाणारा मंत्र एकाच होता .. " दुर्लक्ष !! "

लग्नानंतर १० वर्षे हे असेच चालले. मुलाला कोणत्या शाळेत घालावे इथेपासून सगळे निर्णय घेताना माझ्या अस्तित्वाचा विचार सुद्धा केला जात नव्हता, आणि आता कान पिळणे हे मारण्यापर्यंत आले होते.
मानसिक अवस्था ढासळत होती. पण support असा कोणाचाच नव्हता. माझे रडणे कधी कोणाला ऐकू गेले नाही कि डोळ्यातले पाणी कोणाला दिसले नाही. मी सांभाळून घेत आहे नं तोवर चालू देत असाच म्हणत प्रत्येक जण शांततेची वाट पाहत होते. एव्हाना १० वर्षातले सत्य सगळ्यांना समजले होते . पण कोणी काही करू शकत नव्हते. परिणाम वेग वेगळे आजार मला होत होते. या शिवाय माहेरी आली कि चीड चीड , प्रत्येक जण आपल्याला काहीच समजत नाही असेच वागतोय आपल्याशी असा विचार , त्यातून न्यूनगंड आणि नवे नवे आजार आणि त्यांची औषधे !! हे माझे आयुष्य बनले.

सारख्या सूचना हा सा सु चा अर्थ आता नको वाटत होता. घरी जाणायची भीती वाटत होती . ८ तासाची नोकरी जवळची वाटत होती. पण आता मुलगा आई कडे वेळ मागत होता म्हणून घरी असणे गरजेचे झाले होते. या विचारात मी नोकरी सोडली. आणि एक दिवस मला जखम होईल असे मला मारले गेले. लहान मुलगा घाबरला.
आणि मी तिरीमिरीत येऊन घर सोडले. नवरा सोबत आला पण ... अजूनही त्याला त्याच्या आई सोबत राहायचे होते. म्हणून तो मला माझ्या बहिणीकडे घेऊन गेला होता. निर्णय होईपर्यंत राहू असा विचार चालू होता.
आता पुरे झाला आहे त्रास .... मी आता सहन करणार नाही ... हा एकाच विचार मनात पिंगा घालत होता .


त्याची बाजू ....

तिला पाहिल्या बरोबर मी तिला पसंत केले. साधीशी आणि सगळ्यांशी जुळवून घेणारी वाटली पहिल्या भेटीत. आणि खरच ती तशीच होती. माझी आई तापट आहे पण मनाने चांगली आहे हे तिने समजून घेतले होते. हे मला लग्नाआधीच जाणवले आणि तिच्या बद्दल त्याचे प्रेम अजूनच वाढले होते.

आईने गरिबीतून मला मोठे केले होते. त्यामुळे आई ने घरात आता थोडाशी अरेरावी पण केली तर तिचे कष्ट आठवून मी गप्प राहत होतो . आईच्या डोळ्यात सुद्धा पाणी होते जेव्हा मी लहान होतो , आता बायकोने जरासा त्रास सहन केला तर हरकत काय आहे. आणि ती सुद्धा हसत हसत सगळे सहन करतेय तर आपण शांत राहावे. मुठी आवळून सुटत नाहीत ते प्रश्न मिठी जराशी आवळली कि सुटत होते म्हणून मी तिच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले होते.

पण आज घरी आल्यावर तिच्या अंगावरची जखम पाहून मी सुद्धा संतापलो होतो . म्हणून मी तिच्या सोबत बाहेर पडताना कसलाही विचार केला नव्हता.पण म्हणून वेगळे होणे ??? हा मार्ग नव्हता ..

तिने पुन्हा घरात येणे म्हणजे पुन्हा एकदा तिची मुस्कटदाबी आहे खरी पण त्याची तिला सवय आहे आणि आई ने माफी मागावी हि अपेक्षा चूक आहे . तिचे माझ्याशिवाय कोणी नाही तर आईचा पण मीच आहे नं फक्त ?
आई ला भेटायला गेलो तेव्हा तिला आणि कायम मौन पाळणाऱ्या वडिलांना रडताना पाहून माझे मन विरघळले आणि बायको किती चुकीचे करतेय असा एकदा वाटले आणि अशा वेळी वेगळे होण्याचा घेतलेला निर्णय तितकासा ठाम राहू शकत नव्हता .

हि आई च्या स्वभावाशी जुळवून घेईल असे वाटले होते आणि हि अशी कशी वागतेय ?? आता जरासे वाद झाले तर ठीक आहे नं !! म्हणून आई ने केलेले कष्ट विसरायचे ?? तिला समजावणे सोपे आहे. आता आईचे वय नाही कि तिने स्वभावात बदल करावा !!!आणि आईने तरी असा अमानुषपणा का केला ? आता कशासाठी रडारड ? दुसर्याच्या घरातून आलेली पोर रडताना नाही का दिसली तिला कधी ?? मी तिला रडताना पाहावे असे आता का वाटते आहे तिला ?

काय करू समजेना झालंय . दोघींना फक्त निर्णय हवाय. आणि मी काय करावे ??

घरात तिढा तसाच आहे ...


लहान मुलगा ( वय वर्षे ८ , अगदी लहान वयात खूप मोठ्यासारखा वागणारा एक मुलगा )

मी घाबरलो थोडासा . पण आई नेहमीच अशी रडते. आज आजी ने मारले तिला म्हणून मला भीती वाटली. आई च्या हातातून रक्त येत होते . पण आजी ने तिचा हात तसाच धरून ठेवला होता.

मग आम्ही मावशीकडे आलो. इथे किती छान आहे. मोठ्या आवाजात गाणी ऐकायला मिळतात. आवाज वाढवला कि आजी मारते घरात. आणि इथे मी किती खेळतोय पण आईने एकदा पण रागावले नाही कि शांत बस आजी मारेल म्हणाली नाही . मला आजी मारेल ची भीती आई ला जास्ती वाटते असा वाटते मला. मी तर लक्षच देत नाही आजी कडे. मग ती परत परत मारते. आता सवय झाली आहे. लागते तेव्हा रडतो पण मी . आणि आज आई पण हसतेय.

पण आता आजीच्या घरी नको जायला. बाबांना सांगू का ?? माझी खेळणी घेऊन या आणि आपण इकडे मावशीकडेच राहू. मला शाळा पण जवळ आहे इथून . मग मी रोज खेळेन आणि मग आम्ही आता जातो तसे फिरायला जाऊ. मजा येईल नं. आजी नसेल तर भीती वाटायचे कारणच नाही
पण मला आई नसली कि झोप नाही लागत तसे बाबांना पण होईल का ? मग ते नाही झोपले तर ते आजारी पडतील नं ?

आता काय करायचे?? आणि आजी मारत असली नं तरी ती छान छान शिकवते आणि मला खायला आवडेल ते बनवते. आम्ही सगळे फिरायला गेलो कि मजा येते. मग आजी कडे पण जायला पाहिजे नं ?? तिला माझी आठवण येईल नं ?

बाबा कधी ठरवणार ??

हे आणि अशा स्वरूपाचे प्रश्न बहुतेक वेळा कानावर येतात ....
मग मला प्रश्न पडतो नेमके चुकते कोण?

मारहाण करणे हे चूक ?? कि सहन करणे चूक ?? कोणाची बाजू घ्यावी हे न कळणे चूक ?? वेगळे होणे चूक ?? एकत्र राहणे चूक ?? नेमकं चुकते कुठे ???

एकत्र आनंदाने राहणे आणि कोणी रागावलेले ऐकून घेणे , कोणाची चूक आपली मुलगी असल्याप्रमाणे पोटात घेणे , आणि लहान मुलांना मोठ्यासारखे वागायची वेळ न येऊ देणं हे सगळे त्रासामुळे , वादामुळे तयार होणार्या तिढा आणि मानसिक ताण यापेक्षा चांगले असूनही असे का होत नाही ?

आजारपणात , त्रास होताना सगळ्यात जवळ आधी असते ती सून आणि सुनेला सासू हे सत्य आहे पण जवळ असण्यासाठी त्रास असायलाच हवा का ? मधल्या मध्ये होणारा त्रास पुरुषांना सगळ्यात जास्त होतो आणि तरी रडारड बायका करतात , पुरुषांची मनस्थिती कोणीच का समजून घेत नाहीत ? लहान मुलांवर याचे काय परिणाम होतात हे मोठ्यांना कळत नाही कि कळूनही ते असेच वागतात ??

"आणि ते सारे सुखा ssss त राहू लागले" असे खूप थोड्या लोकांमध्ये का होते ?

आणि ते सुखात राहू लागले असा शेवट आयुष्यात होत नसेल कारण .....

picture अभी बाकी ही मेरे दोस्त !!

समजूतदारपणा नसणे , असला तरी न वापरणे इथेच कदाचित चुकत असावे .

म्हणजे................. नेमके कुठे ????????..........नेमका कोणाचा समजूतदार पणा ? .....

हा वेगळा संशोधनाचाच विषय होईल नाही का ?