Tuesday, May 4, 2010

नेमके कोण चुकतंय ?

तिची बाजू .....
माझे स्वप्नांचे दिवस मजेत जात होते. अचानक एक स्थळ ओळखीतून आले. मुलगा छान शिकलेला आणि आई वडील आपल्याच भागातले आहेत . माहितीतून आलेले स्थळ आहे असे कसे हातचे घालवा. पत्रिका जुळली , मुलाला मुलगी ... मुलीला मुलगा पसंत पडले झाले .......अजून काय पाहतात ?? असा विचार करून लग्न झाले.

घरात सगळे अगदीच छान होते. मुलाची नोकरी , प्रगती होत होती . मुलगा अगदी सोन्यासारखा होता . साधा , निर्व्यसनी , शांत , सुस्वभावी !! एकुलता एक मुलगा आहे, छान घर आहे ह्याचे समाधान माझे आई वडील मानत होते.

पण ... घरातले वातावरण माझ्या घरापेक्षा खूप वेगळे होते. जे आत्तापर्यंतच्या भेटी गाठींमध्ये कधी जाणवले नाही ते आता समजत होते . इथे स्वतंत्रपणे विचार करण्याची परवानगी नव्हती. छोटीशी गोष्ट सुद्धा परवानगीने होत होती. घरात कोणती भाजी बनवावी हे सुद्धा ठरवण्याचे स्वातन्त्र्य नव्हते. अगदीच कधी बदल म्हणून काही करायला गेले तर घरात वाद होत होते. मला रागावून गप्प करणारी एक स्त्रीच होती. आणि घरातले पुरुष या सगळ्यापासून अलिप्त राहायचे.

ह्याची घरी तक्रार तरी कशी करायची ? आई ला पण तर सुरुवातीला जुळवून घ्यावे लागले होते. म्हणून मी घरातल्या गोष्टींशी जुळवून घेत राहिले . अगदीच त्रास झाला तर दार बंद करून रडणे . आणि नवऱ्याशी भांडून रुसून बसणे हि आता सवय झाली होती. सगळे छान आहे आणि आपण उगाच त्रागा करतोय अस मी समजावत राहिले . आणि खुश राहत राहिले . पण हल्ली हे सगळे असह्य होत होते. फोडणी टाकणे कसे असते इथपासून कसे जेवावे हे सगळे मला नवीन आई ( अहो आई ) शिकवत होती. आणि अगदीच नाही जमले तर " तुझ्या आई ने काहीच शिकवलेले दिसत नाही . आमच्या घरात असे नसते" हे ऐकवणे आणि आता काम करता करता कान पिळणे सुरु झाले होते . आधी मी हे गमतीने घेतले. " आई कान धरून शिकवतात हल्ली " असे हसत हसत मी नवऱ्यापर्यंत नेले सुद्धा पण ... परिणाम शून्य होता.

" आईकडे जावे तर ते घर माझे नाही आता. आणि हे घर ह्यांचे ... माझे घर आहे का कुठे ?? मनासारखे काहीच करता येऊ नये ?? " इथपासून सुरु होऊन विचार अगदी आत्महत्येपर्यंत गेले पण घरात पाळला जाणारा मंत्र एकाच होता .. " दुर्लक्ष !! "

लग्नानंतर १० वर्षे हे असेच चालले. मुलाला कोणत्या शाळेत घालावे इथेपासून सगळे निर्णय घेताना माझ्या अस्तित्वाचा विचार सुद्धा केला जात नव्हता, आणि आता कान पिळणे हे मारण्यापर्यंत आले होते.
मानसिक अवस्था ढासळत होती. पण support असा कोणाचाच नव्हता. माझे रडणे कधी कोणाला ऐकू गेले नाही कि डोळ्यातले पाणी कोणाला दिसले नाही. मी सांभाळून घेत आहे नं तोवर चालू देत असाच म्हणत प्रत्येक जण शांततेची वाट पाहत होते. एव्हाना १० वर्षातले सत्य सगळ्यांना समजले होते . पण कोणी काही करू शकत नव्हते. परिणाम वेग वेगळे आजार मला होत होते. या शिवाय माहेरी आली कि चीड चीड , प्रत्येक जण आपल्याला काहीच समजत नाही असेच वागतोय आपल्याशी असा विचार , त्यातून न्यूनगंड आणि नवे नवे आजार आणि त्यांची औषधे !! हे माझे आयुष्य बनले.

सारख्या सूचना हा सा सु चा अर्थ आता नको वाटत होता. घरी जाणायची भीती वाटत होती . ८ तासाची नोकरी जवळची वाटत होती. पण आता मुलगा आई कडे वेळ मागत होता म्हणून घरी असणे गरजेचे झाले होते. या विचारात मी नोकरी सोडली. आणि एक दिवस मला जखम होईल असे मला मारले गेले. लहान मुलगा घाबरला.
आणि मी तिरीमिरीत येऊन घर सोडले. नवरा सोबत आला पण ... अजूनही त्याला त्याच्या आई सोबत राहायचे होते. म्हणून तो मला माझ्या बहिणीकडे घेऊन गेला होता. निर्णय होईपर्यंत राहू असा विचार चालू होता.
आता पुरे झाला आहे त्रास .... मी आता सहन करणार नाही ... हा एकाच विचार मनात पिंगा घालत होता .


त्याची बाजू ....

तिला पाहिल्या बरोबर मी तिला पसंत केले. साधीशी आणि सगळ्यांशी जुळवून घेणारी वाटली पहिल्या भेटीत. आणि खरच ती तशीच होती. माझी आई तापट आहे पण मनाने चांगली आहे हे तिने समजून घेतले होते. हे मला लग्नाआधीच जाणवले आणि तिच्या बद्दल त्याचे प्रेम अजूनच वाढले होते.

आईने गरिबीतून मला मोठे केले होते. त्यामुळे आई ने घरात आता थोडाशी अरेरावी पण केली तर तिचे कष्ट आठवून मी गप्प राहत होतो . आईच्या डोळ्यात सुद्धा पाणी होते जेव्हा मी लहान होतो , आता बायकोने जरासा त्रास सहन केला तर हरकत काय आहे. आणि ती सुद्धा हसत हसत सगळे सहन करतेय तर आपण शांत राहावे. मुठी आवळून सुटत नाहीत ते प्रश्न मिठी जराशी आवळली कि सुटत होते म्हणून मी तिच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले होते.

पण आज घरी आल्यावर तिच्या अंगावरची जखम पाहून मी सुद्धा संतापलो होतो . म्हणून मी तिच्या सोबत बाहेर पडताना कसलाही विचार केला नव्हता.पण म्हणून वेगळे होणे ??? हा मार्ग नव्हता ..

तिने पुन्हा घरात येणे म्हणजे पुन्हा एकदा तिची मुस्कटदाबी आहे खरी पण त्याची तिला सवय आहे आणि आई ने माफी मागावी हि अपेक्षा चूक आहे . तिचे माझ्याशिवाय कोणी नाही तर आईचा पण मीच आहे नं फक्त ?
आई ला भेटायला गेलो तेव्हा तिला आणि कायम मौन पाळणाऱ्या वडिलांना रडताना पाहून माझे मन विरघळले आणि बायको किती चुकीचे करतेय असा एकदा वाटले आणि अशा वेळी वेगळे होण्याचा घेतलेला निर्णय तितकासा ठाम राहू शकत नव्हता .

हि आई च्या स्वभावाशी जुळवून घेईल असे वाटले होते आणि हि अशी कशी वागतेय ?? आता जरासे वाद झाले तर ठीक आहे नं !! म्हणून आई ने केलेले कष्ट विसरायचे ?? तिला समजावणे सोपे आहे. आता आईचे वय नाही कि तिने स्वभावात बदल करावा !!!आणि आईने तरी असा अमानुषपणा का केला ? आता कशासाठी रडारड ? दुसर्याच्या घरातून आलेली पोर रडताना नाही का दिसली तिला कधी ?? मी तिला रडताना पाहावे असे आता का वाटते आहे तिला ?

काय करू समजेना झालंय . दोघींना फक्त निर्णय हवाय. आणि मी काय करावे ??

घरात तिढा तसाच आहे ...


लहान मुलगा ( वय वर्षे ८ , अगदी लहान वयात खूप मोठ्यासारखा वागणारा एक मुलगा )

मी घाबरलो थोडासा . पण आई नेहमीच अशी रडते. आज आजी ने मारले तिला म्हणून मला भीती वाटली. आई च्या हातातून रक्त येत होते . पण आजी ने तिचा हात तसाच धरून ठेवला होता.

मग आम्ही मावशीकडे आलो. इथे किती छान आहे. मोठ्या आवाजात गाणी ऐकायला मिळतात. आवाज वाढवला कि आजी मारते घरात. आणि इथे मी किती खेळतोय पण आईने एकदा पण रागावले नाही कि शांत बस आजी मारेल म्हणाली नाही . मला आजी मारेल ची भीती आई ला जास्ती वाटते असा वाटते मला. मी तर लक्षच देत नाही आजी कडे. मग ती परत परत मारते. आता सवय झाली आहे. लागते तेव्हा रडतो पण मी . आणि आज आई पण हसतेय.

पण आता आजीच्या घरी नको जायला. बाबांना सांगू का ?? माझी खेळणी घेऊन या आणि आपण इकडे मावशीकडेच राहू. मला शाळा पण जवळ आहे इथून . मग मी रोज खेळेन आणि मग आम्ही आता जातो तसे फिरायला जाऊ. मजा येईल नं. आजी नसेल तर भीती वाटायचे कारणच नाही
पण मला आई नसली कि झोप नाही लागत तसे बाबांना पण होईल का ? मग ते नाही झोपले तर ते आजारी पडतील नं ?

आता काय करायचे?? आणि आजी मारत असली नं तरी ती छान छान शिकवते आणि मला खायला आवडेल ते बनवते. आम्ही सगळे फिरायला गेलो कि मजा येते. मग आजी कडे पण जायला पाहिजे नं ?? तिला माझी आठवण येईल नं ?

बाबा कधी ठरवणार ??

हे आणि अशा स्वरूपाचे प्रश्न बहुतेक वेळा कानावर येतात ....
मग मला प्रश्न पडतो नेमके चुकते कोण?

मारहाण करणे हे चूक ?? कि सहन करणे चूक ?? कोणाची बाजू घ्यावी हे न कळणे चूक ?? वेगळे होणे चूक ?? एकत्र राहणे चूक ?? नेमकं चुकते कुठे ???

एकत्र आनंदाने राहणे आणि कोणी रागावलेले ऐकून घेणे , कोणाची चूक आपली मुलगी असल्याप्रमाणे पोटात घेणे , आणि लहान मुलांना मोठ्यासारखे वागायची वेळ न येऊ देणं हे सगळे त्रासामुळे , वादामुळे तयार होणार्या तिढा आणि मानसिक ताण यापेक्षा चांगले असूनही असे का होत नाही ?

आजारपणात , त्रास होताना सगळ्यात जवळ आधी असते ती सून आणि सुनेला सासू हे सत्य आहे पण जवळ असण्यासाठी त्रास असायलाच हवा का ? मधल्या मध्ये होणारा त्रास पुरुषांना सगळ्यात जास्त होतो आणि तरी रडारड बायका करतात , पुरुषांची मनस्थिती कोणीच का समजून घेत नाहीत ? लहान मुलांवर याचे काय परिणाम होतात हे मोठ्यांना कळत नाही कि कळूनही ते असेच वागतात ??

"आणि ते सारे सुखा ssss त राहू लागले" असे खूप थोड्या लोकांमध्ये का होते ?

आणि ते सुखात राहू लागले असा शेवट आयुष्यात होत नसेल कारण .....

picture अभी बाकी ही मेरे दोस्त !!

समजूतदारपणा नसणे , असला तरी न वापरणे इथेच कदाचित चुकत असावे .

म्हणजे................. नेमके कुठे ????????..........नेमका कोणाचा समजूतदार पणा ? .....

हा वेगळा संशोधनाचाच विषय होईल नाही का ?

2 comments:

  1. hey...article khupach chhan lihlay ! And what i like most is that u gave justice to every character...

    ReplyDelete
  2. tasa me faar vachat nasto pan sahaj search engine var sasu sun yanchyat honar bhandan kivanh susune dilela tras ya goshti var search kartana tumcha ha article disla............he kaan pilana kharach chalta ka aaj kal??????? me corporal punsihments var articles shodhat aahe

    ReplyDelete