माझ्या मागच्या लिखाणात प्रतिक्रियांमध्ये सोशल कंडिशनिंग असा कोणी तरी उल्लेख केला आणि त्याच्याबद्दलच लिहावेसे वाटले.
गेले काही दिवस माझ्या भोवताली अशा काही घटना घडत आहेत कि सोशल कंडिशनिंग हि असली मूर्ख कल्पना कोणी आणली ? आणि त्याचा परिणाम काय होत आहे ? असले परिणाम कशासाठी ? असे वाटायला लागले .
त्यातच डॉक्टर राजीव शारंगपाणी यांचे एक पुस्तक आज वाचनात आले. आणि मग हा माणूस करतो आहे तसा विचार सगळेच लोक का नाही करत असे वाटले. ( त्यातले काही विचार माझ्या आत असलेल्या भारतीय मुलीला पचले नाहीत पण तरीही लिखाणाचा मनावर परिणाम झाला कुठेतरी ) म्हणून हा प्रपंच !!!
सुरुवात अगदी सध्या उदाहरणाने केली तर परवा आमची एक मैत्रीण तयार झाली आणि मग म्हणाली कि " मला न हा असा पिवळा धमक ड्रेस फार आवडतो अगं , आणि माझ्यावर हा छान पण दिसतो पण न मी हे घालून गेले न तर माझ्या ग्रुप मधले लोक काय म्हणतील ?? " सोशल कंडिशनिंग .....
' मला आवडते ते मी करणार ' असा विचार का नाही होत ?? घातला ड्रेस हसले लोक " हसतील त्यांचे ( पुढे आम्ही न घासलेले असे म्हणतो ) दात दिसतील" असा विचार का नाही होत ??
एक पाऊल पुढे जाऊन सांगायचे तर ... माझी एक मैत्रीण प्रेमात पडली . मुलगा छान..... दिसायला , वागायला , आणि तिच्यासोबत एम बी ए करणारा होता , नोकरी पण अगदीच छान होती. फक्त तो तिच्या जातीतला नव्हता . म्हणजे म्हणायचे झाले तर दोघे एकाच जातीचे होते पण ती त्या जातीतल्या उच्च कुळातली होती. म्हणून घरच्यांनी भेटून त्याला समजावले आणि तिला ते म्हणाले " अगं आपल्या जातीतले लोक काय म्हणतील ?? काय पाहिलेस त्याच्यात ?? जात कुळ तरी पहायाचेस नं ?? " सोशल कंडिशनिंग ..... " ती सुद्धा मला तो आवडला आहे ... असे ठामपणे म्हणू शकत नाही " आणि मग आता तिच्यासाठी बळजबरीने मुले पाहणे चालू झाले आहे .
परिणाम ??? ती आता पळून जाण्याच्या विचारात आहे . आणि अगदीच एक दोन वेळा मोठ्यांना समजावण्याचे प्रयत्न निष्फळ झाले तर ते होईल सुद्धा . सोशल कंडिशनिंग च्या प्रयत्नात आई वडील तिला चुकीचे ( समाजाने चुकीचे म्हटले आहे ) असे काहीतरी वागायला प्रवृत्त करत आहेत . हे असे किती तरी मुलींच्या बाबतीत होते. आणि मग एक तर बळजबरी च्या लग्नात त्या संसार रेटत राहतात ...... आणि धाडस झाले तर पळून जातात . आता पळून गेली हि चर्चा होणे काय आणि जातीतला मुलगा नाही तरी लग्न करून दिले हि चर्चा होणार काय ??? एकच नं ??? सोशल कंडिशनिंग च्या प्रयत्नात अब्रू ( जिचे इतके अवडंबर केले ती ) जाणारच नं ?? त्यापेक्षा अगदीच मुलीचे अहित असेल ते तिला योग्य पद्धतीने सांगून किंवा मुलगा चांगला असेल तर भलत्या भानगडीत न पडून लग्न लावून देणे हे शांततेचे मार्ग लोक विसरून जातात.
आणखीन एका प्रकारात मुलाने लग्न मोडले ... " अरे लोक काय म्हणतील याचा विचार केला आहेस का ?? " हे त्याला ऐकवण्यात आले . " तुम्ही जरा माझा विचार करा आणि लोक काय म्हणतील त्याचा नंतर " असा जबाब त्याने दिला. काही भेटीत मुलगी नाही आवडली तरी त्याने लोकापवादास्तव ते लग्न ठरले आहे म्हणून रेटणे कितपत योग्य आहे ?? देवच जाणे . पण त्याने घेतलेला निर्णय पुढचे १० प्रकार वाचवत आहे . पुढे जाऊन घटस्फोट , वैवाहिक जीवनात ताण तणाव असू शकतील हा विचार सोशल कंडिशनिंग च्या मागे धावताना होतच नाही.
माझ्या मागच्या कथेतल्या मुलीने सुद्धा आपल्या बहिणीचे लग्न कसे होईल असा विचार करत १० वर्षे त्रास सहन केला आणि आता बहिणीचे लग्न ठरलेले आहे म्हणून ती सहन करणार होती, हे ऐकून तिचे कौतुक करू कि कीव करू असे वाटले . बहिणीच्या सासरचे लोक काय म्हणतील हि भीती . सोशल कंडिशनिंग चे एक रूप. आधी लग्न ठरेल का आणि ठरलेले लग्न मोडेल का ?? पण... मला त्रास होत आहे आणि मी सहन नाही करणार.... असे म्हणून वेळीच निर्णय घेतला गेला असता तर मग पुढे झालेले किती तरी त्रास वेळीच मिटले असते.
या सगळ्या घटना घडताना लोक काय म्हणत होते ते पाहूयात आता .... कोणी म्हणाले " आज काल च्या पिढीला आपले दुक्ख कळत नाही . शेवटी आपल्याला समाजात राहावे लागते . हे इतके सोपे नसते " , " लग्न ठरवताना अक्कल नव्हती ?? आता पुढच्या लग्नाला किती अडचणी येतील ?? ( हे वाक्य बोलणाऱ्या काकूचे सुनेशी पटत नसते आणि तिचा मुलगा पण बायकोला वैतागलेला असतो.थोडक्यात ते चुकलेला निर्णय रेटत असतात आणि आपली सोशल इमेज जपत राहतात . मानसिक त्रास होतो पण सांगणार कोणाला ?? ) , " सासूने त्रास दिला नाही का आम्हाला कधी ?? असे चालायचेच " ( हे वाक्य बोलणाऱ्या काकू ची मुलगी वेगळी झालेली असते . तिला हा नियम नसतो ) , "ड्रेस किती भकास असतात तिचे ?? पिवळा काय अरे?? " ( तिला आवडला.... तिने घातला .... आणि हे असले वाक्य बोलणार्याने केशरी pant वर लाल शर्ट घातलेला असतो )
सोशल कंडिशनिंग स्वतः वर जे लागू करून घेतात त्यांच्या तर नैसर्गिक विधिना सुद्धा ते लोक काय म्हणतील याचा विचार करून ते जात असतात . ( म्हणजे प्रवासात !!! गैरसमज नको !!! ) तेव्हा आत्ता हे आपल्याला असे वाटत आहे असा विचार होत नाही.हि मनाची आणि शरीराची गरज आहे आणि व्हायला हवे असे वाटणे महापाप वाटते त्यांना .
आता पुस्तकातले एखादे वाक्य तरी टाकायलाच हवे ...... पुस्तक " चतुर साहचर्य " या बद्दल होते . त्यात त्यांनी छान उदाहरण दिले होते आणि ते सोशल कंडिशनिंग कसे असते त्यात फिट बसत आहे म्हणून लिहित आहे ( थोडी धाडसी वाटली वाक्य तर क्षमा !! मी पण जरासे सोशल कंडिशनिंग पाळते इथे !! लिखाणातला विरोधाभास !! ) " माणूस सुख शोधात असतो, लहान मुलगा त्याच्या लैंगिक अवयवांशी खेळत असेल . तर तेव्हा त्याला पहिल्यांदा सुखाची अनुभूती येते .. आणि आपण त्याला रागावून सांगतो " असे घाणेरडे पणा नाही करायचा " ... बरे नाही म्हणाले कि मग ते हवेसे वाटते आणि मग त्यातून चोरून वागायची वृत्ती निर्माण होते त्यातून मग कसले तरी video पाहणे चोरून काहीतरी वागणे सुरु होते "
उदाहरणाचा संदर्भ सोडू पण त्याचा आशय मात्र मला आवडला सोशल कंडिशनिंग पाळण्याच्या प्रयत्नात आपण चुकीच्या वागण्याला प्रवृत्त करतो आणि त्याला नकळत आपण support करतो. म्हणजे धडधाकट भिकारयाला भिक देऊन आपण त्याला " माग रे भिक... काम नको करूस ...आमच्यासारखे देतीलच " असे सुचवण्यासारखे आहे .
फक्त त्याला आपण भिक मागू नकोस हे सांगत नाही आणि मग भिक मागण्याचे चुकीचे काम करायला आपण त्याला प्रवृत्त करतो . आणि घरात आपण ...करू नकोस , असे नको , चांगले नाही असे म्हणून त्यांना चुकीचे वागायला प्रवृत्त करतो .
मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करणारी मुले असोत , मुलीला सासरी कोणी काही म्हणू नये म्हणून ऐपत नसताना भरमसाठ खर्च करून मुलीचे लग्न करणारे पालक असोत , मुलाला मार्क कमी पडले तरी त्याला डोनेशन देऊन कुठेतरी शिकायला पाठवणारे पालक असोत . सगळे लोक अवास्तव कल्पनांनी समाजात आपल्याला कोणी काही म्हणेल म्हणून मन काय म्हणत आहे याच्याकडे लक्ष देत नाहीत.
मग पुढे हुंड्यासाठी मुलीला मारून टाकणे , मुलांनी अभ्यास न केल्यामुळे त्यांनी नापास होणे , मुलांनी आई वडिलांच्या अब्रू ( ? ) चा विचार करून कमी मार्क पडले म्हणून जीव देणे हे प्रकार पेपरातले कॉलम च्या कॉलम भरून लेख लिहिण्याचे विषय बनलेत . पण त्यामुळे सोशल कंडिशनिंग काही थांबले नाही आहे .
" घालवा असे वागून बापाची आणि आईची अब्रू घालवा " , " लोक काय म्हणतील हे असे करू नकोस " . असल्या वाक्यांना थाराच दिला नाही तर ???
" हे असे केले न तर तुझ्यासाठी चांगले नाही " , " हे असे केलेस न त्यापेक्षा असे करायला हवेस , खूप फायदा होईल " " तुला वाटते न मग होऊन जाऊ देत " असे संवाद झाले तर त्यातून तन तणाव, भोवताली घडणारे किती तरी प्रकार टळतील .
सोशल कंडिशनिंग पेक्षा पर्सनल कंडिशनिंग केले तर घरातले वातावरण आनंदी आणि हसरे होईल.
" कधीतरी वेड्यागत वागायला हवे " हि संदीप खरे ची कविता म्हणूनच मला फार आवडते मग तिनेच या लेखाचा शेवट करूयात . आणि पर्सनल कंडिशनिंग अमलात आणायला लागुयात.
कधीतरी वेड्यागत वागायला हवे
भांड्यावर भांडे कधी भिडायला हवे
उगाचच सखीवर चिडायला हवे
मुखातून तिच्यावर पाखाडता आग
एकीकडे प्रेमगीत लिहायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे
मनातल्या माकडाशी हात मिळवून आचरावे कधीतरी विचारावाचून
झाडापास झोम्बुनिया हाती येत फळ ........
सहजपणाने ते हि फेकायला हवे.
कधीतरी वेड्यागत वागायला हवे
कधी राती लावूनिया नयनाचे दिवे , पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे
शोधुनिया मनातले दुमडले पान...... मग त्याने आपल्याला चाळायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे
स्वतःला विकून काय घेशील विकत , खरी खरी सुखे राजा मिळती फुकट
हपापून बाजारात मागशील किती , स्वतःतच नवे काही शोधायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे
तेच तेच पाणी आणि तीच तीच हवा आणि तुला बदल हि कशासाठी हवा ?
जुनेच आहे अजून रीयाजावाचून ....
गिळलेले आधी सारे पचायला हवे .
कधीतरी वेड्यागत वागायला हवे
नको बघू पाठीमागे येईल कळून , कितीतरी करायचे गेलेले राहून...
नको करू त्रागा असा उद्याच्या दारात.....
स्वतःलाही कधी माफ करायला हवे .
कधीतरी वेड्यागत वागायला हवे
अर्थात काही गोष्टींमध्ये समाज मर्यादा आणि कौटुंबिक मर्यादा योग्य वेळी योग्य ठिकाणी पाळायलाच हव्यात. त्यातूनच तर परफेक्ट पर्सनल कंडिशनिंग होईल ना? पर्सनल कंडिशनिंग मधून अपोआप सोशल कंडिशनिंग होईलच आणि तेही विनासायास .
मग वागुयात न कधीतरी वेड्यागत
No comments:
Post a Comment