Thursday, July 8, 2010

तो

मुसळधार पावसात एक दिवस भेदरलेला तो थेट घरात शिरला. थरथर करणारे त्याचे अंग चिंब भिजलेले होते. त्याचे भिजलेले रुपडे पाहून त्याला जाऊन घट्ट मिठीत घ्यावे असा वाटत होते.

आईने त्याला घरात घेतलेच !! अगदी हट्टाने !! म्हणजे आता आमचेच  दार उघडे आहे पाहून या मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी तो घरात शिरला तर त्यात गैर काय आहे ?? असा सवाल केल्यावर नेहमीप्रमाणे बाबा गप्पच बसलेले.  " अहो मागे त्या समोरच्या झाडाखाली पावसापासून वाचण्यासाठी जोडपे उभे राहिलेलं आणि वीज पडलेली आठवते न  ?? त्यांना घरात बोलवायला पाहिजे होते हि हळहळ मागाहून होती न तुम्हाला ??  मग हा आला आपल्या घरात तर बिघडले काय ?? तुला करायचीये न ग त्याला मदत कर जा  " आई म्हणाली . तिचे हे कोकणी संस्कारातले संभाषण तिच्या भाषणात परिवर्तीत होण्या आधी बाबा खोलीत शिरले  " काय करायचे ते करा . हि पोरगी हातातून गेली न तुझ्या लाडात मग समजेल . " असा मोठा आवाज मात्र खोलीतून बाहेर पडत होता. हो पण ते ऐकण्यासाठी मी खोलीत नव्हतेच !! मी केव्हाच दाराकडेपळालेले !!

त्याचे डोळे किती बोलके होते. आणि केसांवरून ओघळणारे पाणी त्याच्या डोळ्यांपाशी आले कि किती मोहक वाटत होते !! आणि त्याच्या डोळ्यातून किती प्रेम दिसत होते !! माझ्यासाठीच  असेल का ते प्रेम ?? मी मदत केली त्यासाठी आभार मानायला शब्द नसतील त्याच्याकडे ...म्हणून डोळ्यांची भाषा बोलत होता !!

पाऊस थांबणे कठीण वाटत होते. बातम्यांमधून पण पूर आल्याचे कळत होते. अशा वेळी त्याने बाहेर जाणे मला आणि आई ला मान्य नव्हते. त्याच्या अवती भोवती फिरताना त्याच्या बद्दलची नापसंती बाबांच्या डोळ्यातून समजायची !! त्याचा या घरातला पहिलाच दिवस होता त्यामुळे त्याच्या खाण्या पिण्याच्या वेळा किंवा काही असं आम्हाला ठावूक असणे शक्यच नव्हते. आणि आता आमच्या घरात आमच्या प्रमाणे राहायचे हे त्याला पण मान्य असावेअसं त्याच्या एकंदर वागण्यातून वाटत होते.

मी मात्र त्याला एक क्षण पण एकटे सोडले नव्हते. म्हणजे त्याच्या पासून दूर जावे असे वाटतच नव्हते मुळी मला !!  त्या दिवशी जेवण मी आणि त्याने आणि आई ने एकत्र घेतले. अंगणातल्या शेड मध्ये पाउस पाहत पाहत आम्ही जेवलो. बाबा आले नाहीत !! त्याच्या पंगतीला बसणे त्यांना मान्य नव्हते जणू काही !! त्या रात्री त्याचा बिछाना पण माझ्या शेजारीच बाहेरच्या खोलीत लागलेला . आमच्या तीन खोल्यांच्या घरात जेव्हा बाबांना त्याचे असे इतका वेळ घरात थांबणे मान्य नव्हते तेव्हा मला त्याला माझ्या सोबत बाहेरच्या खोलीत झोपवून घेणे भाग होते.

अंगणातल्या शेड मध्ये बिछाना होईल त्याचा असं बाबांचे म्हणणे आम्ही कसे मान्य करणार होतो ?? थंडीने गारठून जाईल असं वातावरण होते बाहेर!! तो कदाचित खूप दमलेला !! आणि गाढ झोपून गेला !! पण मी मात्र त्याच्याकडे पाहत राहिले !! बराच वेळ !!   मनापासून आवडलेला मला तो !!  ' पण उजाडले कि तो आल्या वाटेने गेला तर ?? '  मनातून भीती !!

' अजून आमची तशी खाशी मैत्री पण नव्हती झालेली !! आणि एक दिवस थोडीच पुरतो मैत्री  व्हायला  ?? '  त्याच्या जाण्याच्या भीतीने मनात वादळ !! तशीच मला केव्हा झोप लागली समजलेच नाही !!

उजाडले तेव्हा तो त्याच्या बिछान्यात नव्हता !! मी डोळे किलकिले करून पहिले !! बाहेर अंगणात तो होता .... बाबा पण होते !! आणि त्यांची मैत्री झालेली होती !! ते एकत्र चक्क खेळत होते !!  बाहेर हवा पण मोकळी झालेली !! सूर्याने पण हसून त्यांच्या मैत्रीला दाद दिलेली !! अर्थातच त्याचे आमच्या घरात बाबांनी पण स्वागत केले होते !!

' म्हणजे आता तो जाणार नाही ? '  मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या !! कालच्या पावसाने आमच्या घरात एक नवीन सदस्य आणला होता!!

" खंड्या ये "  बाबांची हाक !!

" खंड्या ??  पण मी तर त्याचे नाव tommy ठेवणार होते !! शी हे बाबा पण ना !! खंड्या काय नाव आहे का?? "

मी पण उठून त्यांच्या खेळत शामिल झाले !!

" खुश का बाई आता ?? कुत्रे पाळणे सोप्पे काम नाही आहे !! अहो त्याने ती खोली केलेली घाण हिला दाखवा !! आता त्याच्या सगळ्या वेळा पाळायच्या !! तो आता आपल्या घरातला सदस्य झाला !! "

मी मनातल्या मनात टुणकन उडी मारली आणि त्याला कुशीत घेतले !! " माझा खंड्या !! "  शेवटी बाबांनी कुत्रे पाळायला परवानगी दिलीच आज  !!

No comments:

Post a Comment