" कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे ....सरताना आणि सांग सलतील ना ? गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर मुसु मुसु पाणी सांग भरतील ना ? " हे कसे काय समजले या कवीला ? ती मला जेव्हा म्हणाली कि " मी लग्न करतीये " तेव्हा असेच विचार आले मनात . नोकरी नव्हती मला तेव्हा. आता गाड्या घोडे आहेत तर तीच नाही. पण हो.... मला वाटले होते कि कसे जमेल तिला माझ्याशिवाय जगणे ? एक दिवस मी गावी घरी गेलो तर रडू बाई व्हायची तिची. मी आलो कि घट्ट मिठी मारून " मला सोडून देणार नाहीस ना ? " असे म्हणायची ....ती आज मला सोडून जातेय ? असे सगळे वाटलेले मला पण तिने निर्णय घेतला होता. हे सगळे घडले तेव्हा हा कवी तितकासा प्रसिद्ध नसावा. पण त्याने कसे ताडले हे सगळे ?
त्या दिवशी हे गाणे ऐकून ती नजरेसमोर आली. अगदी तशीच !! तशीच असेल का ती अजून ?? फार नाही ६ वर्षे झालीत तिच्या लग्नाला . पण मी तसाच आहे . तिच्या आठवणीने तिचा सुगंध अनुभवणारा !! तिने दिलेल्या स्वेटर मध्ये तिची उब शोधतोय. पण .....
भेटली होती लग्नानंतर. " आवडलेत ते मला. ठावूक आहे ? ते माझी खूप काळजी घेतात . पण मला अजून तुझी वाटायची तितकी काळजी नाही रे वाटत त्यांची. असे का हेच कळत नाही आहे .पण .... पण तू गावी गेल्यावर साप पकडलास म्हणालास ना तेव्हा चक्क देव घरातल्या नागोबाला दुधाचा नैवेद्य केलेला मी !!! तसे काहीतरी यांच्यासाठी करावे वाटते पण ते वेड नाही रे जाणवत माझ्यातून . पण म्हणून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे पण नाही . कळतच नाही.... हे असे मन सैरभैर झाले आहे. ते हवेत पण आणि तू नको पण आहेस . पण .... वाटते तुझ्यावरचे प्रेम निस्वार्थी होते आणि यांच्यावर माझे प्रेम स्वार्थापोटी आहे. त्यांना काही झाले तर माझे कोण असे वाटते म्हणून .. पण तसे मला तुझ्या बद्दल पण वाटायचे रे ... नकोच होते प्रेमात पडायला .. हे असले प्रश्न नसते पडले मला. " असे काही पण बरळत होती. प्रेमात पडली तेव्हा अल्लड होती पण आता पोक्त वाटत होती.......खूपच !!वाटले ज्या अल्लड पणावर भाळलो तोच हरवला आहे. आणि जाणवले ती माझी होती ....तेव्हा जी होती... जशी होती.... तशी नाही ......म्हणजे आता ती माझी नाहीच !!! शरीर... मन ....यापेक्षा त्या जुन्या स्वभावाने आवडलेली ती माझी नाही.माझी ती आणि आता आलेली ती आता तीच नाही आहे . शरीर तेच पण आत्मा जणू बदलून गेलाय पार !!!
आता मला तिची आठवण येते पण म्हणून मला ती हवी आहे असे नाही आहे. खरे तर आता मी पण मुली पाहतो आहे माझ्यासाठी. पण तिची आठवण अलगद मोर पिसा सारखी स्पर्शून जाते आणि मग तो मखमली स्पर्श अनुभवत रहावासा वाटतो.
प्रत्येकाचे पहिल्या प्रेमाच्या बाबतीत असेच होत असेल का ? हो अर्थात जे लग्न करतात ते नाही पण तरी ...
भूतकाळात काही गोष्टी अशाही असतात ज्या हव्याशा वाटत असतात . ते भूतकाळात नेणारे मशीन खरच असते तर किती छान झाले असते असे वाटायला लागते. पण ते केवळ त्या क्षणापुरते वाटते. भानावर आले कि कळते एक सर बरसून गेली आणि रान हिरवेगार झाले. पण म्हणून ढगाने त्याच रानावर राहायचे आणि कायम बरसत राहायचे असे म्हणून कसे चालेल. कधी न कधी तो पण रिता होईलच ना ? आणि अखंड बरसला तर रानाचा हात थिटा पडेलच ना ?? शेवाळे साचेलंच ना ??
असे होत असेल का प्रत्येकाचे पहिल्या प्रेमाबाबत ?
खूप दिवसांनी तिची आठवण आली .....कारण काल मला भेटलेली मुलगी मला खरच आवडली . त्या मुलीची तिच्याशी तुलना करण्याची चूक मी केली नाही !! ती चूक तिने केली !! हो..... तिने माझी आणि तिच्या नवऱ्याची तुलना केलेली !! मी आज भेटलेल्या मुलीला फक्त ती म्हणून पहिले !! तिची तुलना मला आवडलेल्या , मी जिच्या प्रेमात पडलो होतो अशा माझ्या भूतकाळातल्या सौंदर्याबरोबर नाही केली . मी ठरवलंय ..... मी माझ्या आयुष्यात येईल त्या मुलीला कायम खुश ठेवेन . पण तिचे सौंदर्य आठवलेच !! कारण तुलना करायची नाही असा म्हणताना तुलना कशासोबत नाही करायची ह्याचा विचार आलाच मनात ! ठरवले तसे वागताच येत नाही का मला ?? विसरूच शकत नाही आहे मी तिला . म्हणजे मग मी पण तिच्यासारखे वागेन का ?? माझ्या बायकोशी वागताना कायम तिचा विचार येईल माझ्या मनात ?? भूतकाळ काही असला तरी वर्तमान आहे तेच राहणार आहे हे मला मान्यच होत नाही का ?? " वाटते तुझ्यावरचे प्रेम निस्वार्थी होते आणि हिच्यावर माझे प्रेम स्वार्थापोटी आहे. " असे ती मला भेटली कधी तर तिला सांगेन का मी ??
पिसाटले मन थाऱ्यावर नाही येत आहे !! असे का ??? कशामुळे ?? या विचारांमधून बाहेर यायचं आहे मला !!
No comments:
Post a Comment