कातळ दगडांच्या वाटेवरून निघालो होतो तू आणि मी
क्षितिजावर दूरवर दिसत होती सूर्योदयाची लाली ..
तुझ्या चेहऱ्यावरच्या लालीपुढे ती सुद्धा फिकी पडत होती .
घाटाचा रस्ता दिसत होता वळणदार..
तुझ्या कमरेवरच्या वळणाची सर नव्हती त्याला.
धुक्याने झाकून टाकलेली दरी .. थंडीत जणू दरीने पांघरलेली दुलई ,
पण तुझ्या स्पर्शातली उब नव्हती तिच्यात
ढग बदलत होते आकार प्रत्येक क्षणाला,
तुझ्या नजरेत बदलत जाणाऱ्या प्रत्येक भावाचे चित्रच जणू !!
दूरवर उडणारा पक्ष्यांचा थवा दिसत होता लयबद्ध
पण तुझ्या पावलांची लय त्यांच्या नाजूक पंखांमध्ये नव्हती.
कोकिळेचे कूजन येत होते कानी
पण आपल्यातल्या संवादाची गोडी नव्हती त्यात.
दूर डोंगरात उगवणाऱ्या सुर्यबिम्बाला सुद्धा सर नव्हती तुझ्या भाळीच्या पिंजराची
एका रम्य पहाटे मला जाणवले .. तुझ्या सहवासापेक्षा रम्य हल्ली काहीच भासत नाही मला
अगदी ती पहाट सुद्धा
No comments:
Post a Comment