Friday, April 16, 2010

A new girl in the city

wake up sid पहिला  आणि मनामध्ये विचारांचे चक्र सुरु झाले . a new girl in the city !!  शीर्षकाचा लेख  पाहून मनामध्ये असंख्य विचार सुरु झाले. मी पण तर आहे a new girl in the city !! फक्त शहर निराळे !! " पुणे "

" हे पुणं आहे " अशा F .M . च्या  जाहिरातींपासून , पु लं च्या पुणेरी पुणेकर पर्यंत आपले मराठीपण आणि मराठी बाणा आवर्जून जपणाऱ्याबद्दल प्रत्येकाने लिहिले आहेच. पुन्हा नवीन आणि वेगळी कोणती जाणीव या शहराने मला करून दिली आहे ?? मला काय वाटते ?? 

चित्रपटात लहान शहरातून मुंबईत आलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर दाखवतात तसा आत्मविश्वास ?? मी स्वतंत्र आहे हि जाणीव ?? शहराबद्दल प्रेम ?? आपुलकी ?? नेमकं काय ??  आणि या प्रश्नाचे उत्तर शोधताना पडणार्या नवीन प्रश्नाचे काय ?? आणि मग मला मिळाले ते उत्तर !!!

मला या शहराने  दिली जाणीव !! " हरवलेपणाची  " !!! खूप काही मिळवताना खूप काही निसटून गेले याची जाणीव !!!

शाळेच्या सुट्टीत काकाकडे आल्यावर एस. टी. ने जाताना  पुण्याचा झगमगाट , मोठ्या गाड्या , गर्दी याचे आकर्षण कधी वाटायला लागले समजलेच नाही . फर्ग्युसन  रस्ता  , तुळशी बाग  आवडायला कधी लागले समजलेच नाही. " मी पण एक दिवस पुण्यात येणार " असे वाक्य मनाशी घोळवतच स्वप्न पाहणारी मी !!!  मनातली इच्छा पूर्ण होऊनही हरवले पणाची जाणीव का व्हावी मला ??

खूप सारे सोने देणारा परीस हातात असताना मला लोखंडाचा तवाच चवीची भाकरी देतो असे का वाटायला लागले आहे ??  काय मिळाले याची यादी भारंभार लांब वाढत जात असताना पण पांढऱ्या कागदावरचा शाईचा काळा  ठिपकाच का पाहते आहे मी ?? कारण त्याच काळ्या ठीपाक्याला मी गमावले आहे .

पुणे !!! ११ वी नाही , graduation नाही , finally post graduation ला  मी पुण्यात आलेच !!!

सुरुवातीचे काही दिवस गाडी शिवाय फिरताना इथले रस्ते , f .c . वरची गर्दी , barista , ccd  अशा कधी न पाहिलेल्या गोष्टींच्या प्रेमात पडत गेले मी !!! पण आता ते सगळे सोडून मला माझ्या गावाची ओढ वाटते आहे .

कारण उन्हातून आल्यावर स्टीलच्या फुलपात्रात माठातल्या पाण्यापासून बनलेल्या कोकमाच्या सरबताची जागा आधी पाकीट बंद कोकमाने आणि मग महागड्या कोक ने घेतली  पण फुलपात्राच्या कडांना ओठ लागल्यावर मिळणारा ओलावा स्ट्रो  मध्ये नाही हि जाणीव हल्लीच होतेय . 

Mc D चे बर्गर  असो  कि जोशींचा वडा बाबांनी शनिवारी सुट्टी मिळाल्यावर  बनवलेल्या भजीचा घमघमाट आणि स्वाद कुठेच मिळाला नाही !! त्याला शोधात मी सिंहगडावर पोहोचले  पण जिभेवर रेंगाळणारी घरच्या अन्नाची चव  आता घरगुती खानावळीत सुद्धा नाही .

रस्त्यावर १०० १०० रुपयांच्या ढीगभर चपला घेतल्या मी . पण मोडक्या चपलांना शिवून  घालणारे आणि बुटाचे सोल बदलून जुन्या बुटांना नवीन बनवणारे बाबा जेव्हा ७७.९९ रुपयांचे बाटा  चे कॅनवास चे बूट घेऊन यायचे तेव्हा ते बूट मिरवताना मिळणारा निखळ आनंद या चपलांमध्ये  कधीच का नाही मिळत ?? 

घरात मटकीची उसळ बनली कि हळूच १०० ग्रॅम फरसाण आणून , कांदा चिरून घातल्यावर तयार झालेल्या मिसळी चा स्वाद आता बेडेकर असोत कि काटा किर्र कोणी कोणी नाही मिळवून देऊ शकत.  त्यांना माझ्या गावाची चव नाही असे का वाटते ??

इथे खूप खड्डे आहेत अशी तक्रार नेहमीच ऐकू येते. पण रस्ता आहे कि खड्डा असा प्रश्न पडावा अशा रस्त्यंवरून धूळ उडवत जाणर्या ट्रक  आणि ट्रक्टर पासून सांभाळत शाळेत जाताना , ख्द्द्यातले पाणी उडवताना येणारी मजा इथे का नाही येत ??

इथे गणपती उत्सव जोरदार होतो. पण आरतीसाठी घरातून नैवद्य आणणाऱ्या बोहरा समाजातल्या  काकू इथे नाही भेटल्या !! आणि " माझ्या मुलाला पहिले बक्षीस का नाही ?? " असे म्हणत कमरेवर हाथ ठेवून भांडणाऱ्या बायका असतीलही इथे !! पण गावरान भाषेतला वाद इथे नाही  आणि तितक्याच लवकर भांडणे मिटवून जवळ आणणारे प्रेम मला इथे फारच sophisticated  आणि professional वाटले .

अहिराणी भाषेत बोकडाला नवस बोलणारे धुळे , जळगाव कडचे लोक असोत  , कि भेळेमध्ये भडंग शोधणारे सांगली कोल्हापूर कडचे लोक असोत. मराठवाडा , विदर्भ , पश्चिम महाराष्ट्र कुठून कुठून किती तरी प्रकारचे लोक इथे आलेत. त्यांनी पुण्याला अंगिकारले , स्वीकारले . पण... " आमच्याकडे न अस असते " हे वाक्य कानावर पडतेच !! आणि त्यातून त्यांच्या पण आठवणी कदाचित जाग्या होत असतील !!

माझ्याच गावातून आलेले जेव्हा इथल्या " कल्याण भेळ " चे कौतुक करतात  तेव्हा ते हजारे ची चटका भेळ विसरले कि काय असे वाटते . आणि " मामा एक कोरडी भेळ द्या " असं म्हणाल्यावर  विकत घेतलेल्या भेळीपेक्षा जास्त चुरमुरे आणि शेव असलेले पाकीट हात देऊन " घेऊन जा " म्हणणारा भेळ वाला इथे नाही भेटला !! १ रुपायाची कोथिंबीर घातल्यावर हळूच थोडेसे  आलं पिशवीत घालणारा भाजीवाला क्वचीतच भेटतो .

मित्रमंडळ , नाटक सिनेमांवर आवर्जून चर्चा करणारे सगळे भोवती आहेत. त्यांच्यासोबत पुढे जाताना मिठास आली पण गोडवा तो गावच्या आठवणीतच वाटला.

माझं गाव , गावच्या आठवणी आणि त्यांच्यापासून दुरावल्यावर त्यांची कळलेली किंमत हे दिले पुण्याने मला !!!

माझी स्वतंत्र ओळख  , माझ्यातल्या मी ची जाणीव , पुढे जाण्यासाठी हात पसरून येणारया असंख्य वाटा , नवीन जगाशी ओळख आणि भौतिक गोष्टींमधली प्रगती सगळे मला इथे आल्यावरच मिळाले.

पण हत्तीच्या पावलाने मातीत उमटावे तशा  खोलवर आहेत आठवणी !!!  गावाच्या ....तिथल्या मातीच्या ... मातीच्या ओलाव्याच्या ... !!!

Saturday, April 10, 2010

लाखात एक

एका संध्याकाळची गोष्ट .... मी घरात एकटीच होते. अंधार पडायला सुरुवात झाली होती . मागच्या गच्चीत कपडे गोळा करताना एक मुलगा दिसला .न जाणे काय सांगत होता .विचित्र भाषेतले त्याचे बोलणे न समजल्याने मी  जरा गोंधळलेच .तो कोण ??कुठला ?? काहीच ठावूक नव्हते .म्हणून त्याच्या बद्दलची उत्सुकता अजूनच वाढली .

दुसऱ्या दिवशी  कॉलनीतला एक मुलगा त्याच्यावर हात उगारताना दिसला. काकू - काकू म्हणत तो ओरडत होता.हे पाहून त्या मारणाऱ्या मुलाला रागावून मी घरात आले . त्याच्या चेहऱ्यावर मला आनंद ,दिलासा दिसला.

रोज संध्याकाळी ७- ८ वर्षांचा तो चिमुरडा मला मैदानात मुलांमध्ये दिसायला लागला . अंगावरचा शर्ट त्याची हाफ चड्डी  झाकणारा !!! काहीसे विस्कटलेले तरी पण नेटके भासणारे केस . सगळ्यांच्या छान छान चपला आणि कपड्यांना न्याहाळणारे त्याचे बोलके डोळे आणि दगड , काटे यांचा विचार न करता उड्या मारणारे त्याचे पाय माझ्या कुतूहलाचा विषय बनले . वरच्या गच्चीत आम्हाला मोबाईल वर बोलताना पाहून लाकडाला कानावर ठेवून " हालो " म्हणणारा तो , फुटबॉल खेळणारी मुले गेल्यावर फुटक्या बॉलला लाथा मारणारा तो किंवा हातात bat धरल्याचा उत्तम अभिनय करणारा तो नेहमीच कॉलनीतल्या मुलांकडून दुर्लक्षित होता. पण तरीही बाकीची मुले त्याच्या खेळांची मजा अनुभवायचे . रंगपंचमीच्या दिवशी तर फुटक्या बाटलीत पाणी भरून  " ओ मामा ओ मामा " म्हणत मोठ्या खुबीने सगळ्या मोठ्यांमध्ये तो मिसळून गेला होता, आता कॉलनीताली मुले त्याच्याबरोबर पकड पकडी खेळायला लागली होती. जुन्या डब्यावर काठी बडवत तो खूप छान वाजवायचा .

 मागे बांधकाम  चालू होते तिथे watchman  असलेल्या आजोबांचा हा नातू ! मतीमंद आहे तो ! त्याची आई वडिलांकडेच रहायची. तो पूर्वी शाळेत जायचा. पण तिथली मुले त्याला वेडं म्हणून मारायची .हताश झालेल्या आईने नंतर त्याला मतीमंद मुलांच्या शाळेत घातले.आता तिथे तो रमलाय.

त्याला पहिले कि प्रश्न पडतो. या निरागस चेहऱ्याच्या , बोलक्या डोळ्याच्या ,निखळ हास्याच्या मुलाच्या नावापुढे मतीमंद हा शिक्का का बसावा ??दोष देवाचा कि दैवाचा ???

समाधान मिळावे म्हणून मग मीच स्वतःला समजावते कि ...तो चेहरा कायम निरागस राहावा , डोळे बोलके राहावेत आणि सगळे मिळूनही अतृप्त असणाऱ्या या जगात त्याचं निखळ हास्य असंच कायम राहावे म्हणून देवाने त्याला सगळ्यांपासून वेगळे घडवले आहे . अगदी वेगळे !!!

बांधकामाच्या वाळूवर डोंगर बनवणाऱ्या त्याला पहिले कि त्याच्या डोळ्यातली चमक , चेहऱ्यावरचा आनंद मला वेगळेच समाधान देऊन जातो !!! कदाचित या शहाण्यांच्या  जगात कोणत्याही शहाणपणा शिवाय सच्च्या दिलाने , आनंदाने जगण्यासाठीच देवाने त्याला घडवले आहे !!!