Friday, November 16, 2012

अंतर
एका अनोळखी वाटेवरून तू आणि मी चालत होतो. हातात हात कधी गुंफले गेले .. कळालेच नाही .आपण बोटांशी खेळता खेळता एकमेकांच्या कवेत हरवून गेलो .काय होते ते ? तो आवेग , तो स्पर्श , तो तू आणि ती मी !! चिंब भिजत राहावे अशी एक सर . ती सर बरसून गेली...आणि मग जी आली तिला शुद्ध म्हणतात कदाचित !! शुद्धीवर आल्यावर तू आणि मी दोन अनोळखी बेटांवर होतो. एकमेकांकडे ' आपण काय केले ? ' अशा अविर्भावात पाहत उभे राहिलेले आपण दोघे !! चूक कि बरोबर ठावूक नाही , पण कसल्याशा जाणीवेतून आपल्यातले अंतर वाढले .

तू माझ्या नजरेसमोर असताना अचानक तुझ्या माझ्यातले अंतर केव्हा वाढले मला उमगलेच नाही . तू दूर दूर जात राहिलास . आणि आता .. आता आठवणींमध्ये एका ठिपक्याएवढा दिसतोस . मी एकटीच आहे या बेटावर ... तुझ्या एका कटाक्षासाठी , तुझ्या स्पर्शासाठी आसुसलेली ... लाटा आदळतात विचारांच्या आणि त्यांचे तुषार झेलत मी एकटीच उभी आहे ... तुझी वाट पाहत ......कित्येक वर्षे सरली. तुझे असणे सवयीचे होते कि तुझे नसणे हि सवय आहे हे न जाणवण्याइतकी  वर्षे सरली तो आवेग अनुभवून 


मधल्या काळात  तुझे पत्र,मग इ मेल  तुझी खुण म्हणून  मागे उरलेली आपली मुलगी ह्यांनी  त्या आवेगाची आठवण  ताजी ठेवली. आणि त्या बातमीने मला मुळासकट हलवून टाकले. तू कधीच परत येणार नाहीस असे नाही वाटले . पण तू कधी येणार हे मात्र निश्चित नव्हते. आज तू येणार ह्या बातमीने मी खुश झालेय. खरच खुश झालेय का मी ? कि हा आनंद सुद्धा नुसतीच कल्पना आहे हेच समजत नाहीये मला.

माझ्या मुलीने नकळत्या वयात पाहिलेले तिचे वडील आज ४ वर्षांनी तिला  कवेत घ्यायला भारतात येणार हि बातमी तिला सांगून तिच्या डोळ्यात पाहिलेल्या आनंदाने मला जाणीव करून दिली आहे तुझे असणे आमच्यासाठी काय आहे याची .  वडील काय असतात हेच नाही अनुभवलंय तिने अजून . वडील म्हणजे परदेशात असलेला एक सांता  जो दर वर्षी न चुकता भरपूर कपडे आणि खाऊ पाठवतो एवढीच समज आहे तिला . तो खाऊ ते कपडे पाठवणारा सांता  तिची आईच आहे हे कधी कळलेच नाही तिला.

आणि मी . माझ्यासाठी तू कोण आहेस ?  ज्याने मला माझ्यातल्या  सौंदर्याची  जाणीव करून दिली. ज्याने मला स्त्रीत्वाचा अनुभव दिला. ज्याने मला माझ्यातले मी पण , माझे स्वातंत्र्य जपण्याची जाणीव करून दिली तो तू. माझे अस्तित्व बनलेला तू आणि  एक दिवस माझे अस्तित्व मुळासकट हलवणारा सुद्धा तूच. 

"अन्विता " ...तुझी  हाक ??? तू  आलास? तू मला हाक मारलीस ?  हो तूच ... माझ्या आठवणीतल्या ठीपक्याच्या रुपात मी जपलेला तू.. आज माझ्यासमोर आला आहेस . आणि माझे शब्दच हरवलेत. डोळ्यातून ओघळणारे अश्रू आहेत कि  माझे विचार ? तू परत  आलास ह्याच्यावर माझा विश्वासच नाही बसत आहे.

तिकडे जाऊन तू केलेले लग्न. तू माझी केलेली फसवणूक . आणि तुझे परत येणे .. खरे काय समजावे ? तुझे माझ्यावरचे  प्रेम  कि परिस्थितीने केलेला खेळ ? मधल्या काळात तू तुझ्या बायकोपासून लपवून मला पाठवलेले मेल हि तिची सुद्धा फसवणूकच होती. तिच्या गोऱ्या  समाजाइतके मोकळे आणि मोठे मन नाही माझे... पण आज माझे मन तुझ्याकडे का धाव घेत आहे हे नाही समजत आहे मला . असे काय बंधन आहे आपल्यामध्ये ज्याने तुला आणि मला असे बांधून ठेवले आहे ?

तू अगदी तसाच दिसतोस अजूनही.... नकळत माझ्या केसांकडे माझा हात गेला आणि उगाचच आपण गबाळे  दिसतोय कि काय असा वाटून गेले.


तू समोर आहेस.... मन तुझ्याकडे धाव घेत आहे . पण पावले ... पावलांना नाही जायचं तुझ्याजवळ ..आपण समोर येईपर्यंत  तुझ्याकडे  धावून येण्याची इच्छा करणारी माझी पावले आज तुझ्याजवळ नाही येत आहेत . मनाची अशी द्विधा स्थिती मी कधीच अनुभवली नव्हती ..असे का होतंय  ?? कदाचित आता उमगतंय कि आपल्याला बांधून ठेवणारे दुसरे कोणी नाही आपल्यातले अंतर होते. 

आपल्यामध्ये ते बंधन तू दूर असताना माझे वाटायचे. आणि आता कसलीच बंधने नाही आहेत पण तरीही मन चालतंय तुझ्या दिशेने आणि पावले अगदी विरुद्ध दिशेने. मनात आपल्या मुलीचा विचार आला आणि वाटले '  आपली ?  नाही ती माझी मुलगी आहे. तू काय दिलेस तिला ? जन्माआधी एक सावत्र आई  , जन्मानंतर सक्ख्या आईकडून सतत फसवणूक . तू माझी फसवणूक केलीस , तुझ्या बायकोची फसवणूक केलीस आणि ती गेल्यावर तू पुन्हा एकदा मला फसवायला परत आला आहेस? का ?  ' 

मनात असे विचारांचे वादळ का आहे ? मला काय हवे आहे तेच समजत नाहीये . " तू आलास ?? " माझ्याच नकळत मी काय बोलतेय हे ....?

 " तू का आलास ? निघून जा . मला आणि माझ्या मुलीला सोडून निघून जा.  आम्हाला तुझे अस्तित्व  मान्य  आहे पण कदाचित ते आमच्यापासून दूर कुठेतरी असताना  . तुझ्यावर माझी भाबडी माया आहे ती टिकून आहे त्याचे कारण आहे तुझ्या माझ्या मधले अंतर. ते कधीच कमी होऊ देऊ नकोस. आणि आम्हालाही अंतर देऊ नकोस . जा निघून जा . आम्हाला एकटे सोड " 

माझ्या आकान्ताकडे हताशपणे पाहणारा तू आणि मग आल्या पावली माघारी जाणारा तू ...अजूनही नजरेसमोर तसेच्या तसे आठवते. अजूनही मनापासून प्रेम आहे माझे तुझ्यावर.  पण तोपर्यंतच जोवर आपल्यात आपणच जपू तेच अंतर जे तू एके काळी मला दिलेस आणि जे मी अजूनही जपलय मिलन

विरहाचे उन रखरखले डोंगर माथ्यावरती
मिलनास आतुर झाले आकाश आणि धरती
सरसावून आपले बाहू बरसले जणू आकाश
अधीर धरती वेडी आतुरली त्या स्पर्शास
घन गर्द एका राती बरसला श्याम मेघ
आतुर धरती वेडावली पाहुनी तो आवेग
तृषार्त धरती झाली तृप्त त्या स्पर्शाने
ते दीर्घ चुंबन सजले अंगणात पावसाने

Thursday, August 30, 2012

दत्तू

पहाटे पहाटे दार ठोठावत दत्तू ओरडत होता " शकू ताई ...... शकू ताई "  . दत्तू चे सकाळी सकाळी असं कापर्या आवाजात ओरडणे मला घाबरवून टाकणारे होते. दार उघडल्यावर कसलाच विचार न करता त्याने मला मिठी मारली . त्याचा कपड्यांना रक्त लागलेले. त्याची हाफ चड्डी भिजलेली होती.

" काय रे दत्तू ? काय झाले  ?? " " घरला पोलीस आलेत शकू ताई . बाबाचे डोके आणलंय !! चेंदा मेंदा झालाय  !! " 

वय वर्षे १० .......दत्तात्रय सखाराम पोटे आमच्या दारात उभे राहून रडत होता. त्याला भीतीने कापरे भरलेले. आणि डोळ्यातून पाणी... !!

सखाराम काका ?? पण इतक्या पहाटे ??

सखाराम काका अपघातात गेला होता . मागे दत्तूला एकटा टाकून !!

दत्तूची आई कोणाचा तरी हात धरून पळून गेलेली. दत्तू ३ महिन्याचा असतानाच !! सखाराम काका देव माणूस !!  गळ्यातले स्वामी समर्थ आणि हातातली साई बाबाची अंगठी या दोन गोष्टींवरून त्याचे धड लोकांनी ओळखलेले. आणि मग रेल्वे रुळावर त्याचे डोके सापडले. अगदीच चेंदा मेंदा झालेला डोक्याचा !!

दत्तू ची कापरे भरलेली प्रतिमा अजूनही मला तशीच आठवते. सगळे सोपस्कार पार पडून सखाराम काकाचे निष्प्राण शरीर चाळीत आणलेले. पोलिसांनी!! शेजारच्या कोणी काकू नि ते धड सखाराम काकाचेच आहे असे ओळखले. आणि मग दत्तू धावत सुटला ते थेट माझ्या दारात येऊन थांबला. दरम्यान भीतीने त्याचे कपडे ओले झालेले !!

" उद्यापासून आमच्याकडे पण पेपर टाकत जा " या वाक्याने आमच्या नात्याला सुरुवात झालेली आणि मग अहो पेपर वाले पासून ए सखाराम काकापर्यंत ते नाते बदलत गेले . कधी आणि कसे समजलेच नाही .

मी नवीन लग्न होऊन आले तेव्हा सखाराम काका भाजी आणण्यापासून सगळे करून बदल्यात एक कप चहा घ्यायचा आणि मग  पुढे....  " शकू ताई  आमच्या दत्तू ला पण तुझ्या गौरव सोबत शिकवत जा !! पोराला माय टाकून गेली ग !! तुलाच शकू ताई शकू ताई करून जीव लावतो !!  " अशा गप्पापर्यंत सगळेच खूप छान !!  वयाने माझ्या एवढाच असलेला माणूस पण मी त्याला सखाराम काका म्हणायचे.  आमच्या गौरव ने सुरुवात केलेली या नावाने त्याला हाक मारायला !!  

दत्तूला मी मिठीत घेतले . हे आणि मी त्याला घेऊन शेजारच्या चाळीत गेलो. तिथे लोक गोळा झालेले !! आणि मधोमध सखाराम काकाचे तुकडे जोडलेले कलेवर पडलेले . दत्तू भीतीने काळा निळा पडलेला . मी त्याला पाणी पाजले आणि मग त्याची शुद्ध हरपली . दत्तू पुढचे ८ तास शुद्धीवर आला नाही !!

सखाराम काकाची बायको मी त्या दिवशी पहिल्यांदाच पाहिली. तिने भपकेबाज कपडे घातलेले . आणि तितकेच भडक कपडे घातलेला एक माणूस आला होता तिच्या सोबत !! "  देवाकडे गेला देव मानूस तुमचा "  असे म्हणून तिने चार टिपे गाळली आणि प्रत्येक अश्रू गळताना ती शेजारच्या माणसाला आणखीनच घट्ट मिठी मारत होती. अंत्ययात्रा निघे पर्यंत थांबायची सुद्धा तसदी न घेता त्या बाईने काढता पाय घेतला. आणि जाताना दत्तू कुठे आहे.. कसा आहे .. या बद्दल चकार शब्दही काढणे टाळून ती आली तशी निघून गेली . हे सगळे अनपेक्षित होते मला. पण चाळीतल्या लोकांना हे सगळे जणू सवयीचे होते. त्या बाई चे येणे आणि जाणे यावर आश्चर्य करणारे माझ्याशिवाय तिथे कोणीच नव्हते !' सखाराम काका गेल्यावर दत्तुचे पुढे काय ? ' हा प्रश्न त्याच्या जन्मदात्रीला खरच पडला नसेल का ?  पण तिच्या वागण्यातून काहीच जाणवले नाही .

सखाराम काकाचा अंत्यविधी पार पडला. दिवस घालायला पुढाकार घेऊन त्याच्या घरातले कोणीच आले नाही. दत्तूने माझ्याकडून थोडे पैसे नेऊन दिवस घातले... आणि मग एक दिवस अचानक ते पैसे परत केले. " शकू ताई ..झोपडी विकली  त्याचे २०००० मिळाले . हे तुझे पैसे " असं म्हणत माझ्या हातात पैसे टेकवून दत्तू पाणावल्या डोळ्यांनी गेला. 

बरीच वर्षे झाली या गोष्टीला... दत्तू कुठे गेला , काय करतो , पुढे त्याच्या आईचे काय झाले, त्याने त्या २०००० चे काय केले, शिकला कि नाही असे खूप प्रश्न पडत राहिले . एखादा मळक्या कपड्यातला साधा मुलगा दिसला कि दत्तुचा भास होतो. दत्तू तसाच राहिला असेल कि  हातात सोनेरी घड्याळ . कडक इस्त्री केलेला पांढरा शर्ट आणि पांढरी  विजार आणि बूट घातलेला  एखादा गुंड झाला असेल . मी केलेल्या थोडक्या संस्कारांना विसरला असेल का... असे अनेक  प्रश्न सतत पडत राहिले. कुठेतरी देवा दत्तू चांगल्या मार्गाला लागला असू देत , त्याचे सगळे चांगले होऊ देत असे विचार येत ....देवापुढे मनातून अनेकदा  हात जोडले जायचे 

पण आज सकाळच्या पेपरातली आदर्श शिक्षकाची बातमी आणि त्यात आलेले नाव 'दत्तात्रय सखाराम पोटे 'या सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊन गेले. दत्तू आता आदरणीय दत्तात्रय सर झालेला आहे हे पाहून मन सुखावले. आणि मनात कुठेतरी असलेले विचारांचे वादळ शमले. दत्तूने माझे थोडके संस्कार सार्थकी लावले. 

पावसा कधी येशील ?

ग्रीष्मातल्या एखाद्या रटाळ  दुपारीनंतर  ढगांची  मैफल  जमावी  , गडगड आवाजाने  ताल  धरावा  , विजेचे  नृत्य   व्हावे   आणि  सरींची  मैफल  जमावी … अशा  वेळी  अवघ्या  सृष्टीने  त्या  सुरांमध्ये   तल्लीन  होऊन  हरवून  जावे  असा  एक  दिवस  घेऊन  येतो  श्रावण … मैफिलीचे   पडसाद   उमटतात   अवघ्या  सृष्टीत   … सरी   कोसळताना  होणारा  रव   जणू  टाळ्यांचा  कडकडाट  करत  असतो  …आणि  मग  … प्रसन्नतेचे  नवीन  रुपडे  लेवून   धरणी  प्रतिसाद  देते  पावसाच्या  मैफिलीला  आणि  नकळत  ओठांमधून  शब्द   उमटतात  वाह   ..या  मैफिलीला  भैरवी  नको ..यंदा हि मैफल जमतच नाहीये ... पावसा कधी येशील ? 

तुझ्यासाठी ...

तू आयुष्यात आलास.... असा ...जसे घोंगावत वादळ यावे . आणि मग त्या वादळाने मागे आपल्या खुणा ठेवाव्यात ! अस्ताव्यस्त , सैरभैर झालेल्या गोष्टींनी आठवण करून द्यावी त्या वादळाची ...मग त्या वादळाच्या तडाख्यात आलेल्या वस्तूंच्या अस्तित्वाच्या फक्त खुणा राहाव्यात . आणि मग नवीन आयुष्याची सुरुवात व्हावी !!

अगदी तसाच आलास माझ्या आयुष्यात !! सैरभैर झालेले माझे मन माझ्याच अस्तित्वाच्या खुणा शोधत राहिले !! पण माझे अस्तित्व मी म्हणून संपून गेले होते !! तूच भरून राहिला आहेस  !! मनात ....श्वासात .... आणि  माझ्यातल्या अणु रेणू मध्ये !! आणि हे वादळ माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात घेऊन आले आहे हि एक हळुवार जाणीव मनाला स्पर्शून गेली !!
आता आपल्या आयुष्यात जी वादळे येतील ती आपली असतील ...तुझी आणि माझी ....

 नवीन आयुष्यात प्रवेश करताना मी हळुवारपणे  माझ्या आठवणींचा शिंपला उघडून पहिला आणि मला मोत्यांची रास मिळाली ....

आपल्या आयुष्याच्या वादळांमध्ये  त्या आठवणी धूसर होण्याआधी  त्यांचा नजराणा .... माझ्या आयुष्यातल्या वादळा...

Monday, January 2, 2012

रम्य

कातळ दगडांच्या वाटेवरून निघालो होतो तू आणि मी 
क्षितिजावर दूरवर दिसत होती सूर्योदयाची लाली ..
तुझ्या चेहऱ्यावरच्या लालीपुढे ती सुद्धा फिकी पडत होती . 
घाटाचा रस्ता दिसत होता वळणदार..
तुझ्या कमरेवरच्या वळणाची सर नव्हती त्याला.
धुक्याने झाकून टाकलेली दरी .. थंडीत जणू दरीने पांघरलेली दुलई ,
पण तुझ्या स्पर्शातली उब नव्हती तिच्यात 
ढग बदलत होते आकार प्रत्येक क्षणाला,
तुझ्या नजरेत बदलत जाणाऱ्या प्रत्येक भावाचे चित्रच जणू !!
दूरवर उडणारा पक्ष्यांचा थवा दिसत होता लयबद्ध 
पण तुझ्या पावलांची लय त्यांच्या नाजूक पंखांमध्ये नव्हती. 
कोकिळेचे कूजन येत होते कानी 
पण आपल्यातल्या संवादाची गोडी नव्हती त्यात. 
दूर  डोंगरात उगवणाऱ्या सुर्यबिम्बाला सुद्धा सर नव्हती तुझ्या भाळीच्या पिंजराची 
एका रम्य पहाटे मला  जाणवले .. तुझ्या सहवासापेक्षा रम्य हल्ली काहीच भासत नाही मला 
अगदी ती पहाट सुद्धा 

कविता

नव्हतास कधी तू माझ्या शब्दांना दाद देणारा ,
पण माझ्या कवितांना साद देणारा तूच होतास 
माझ्या शब्दांचा अर्थ कधी समजलाच नाही तुला ,
पण ते शब्द तुझ्यासाठी कधी निरर्थक नव्हते.
माझ्या शब्दांमागची प्रेरणा नव्हतास तू कधी ,
पण शब्दांसाठी प्रेरणा तुझीच असायची. 
आता शब्द असतात मनात ,
पण कविता नाही बनत त्यांची.
कविताच हरवली आहे माझी , 
जसे हरवलेत तुझे शब्द माझ्या कवितेसाठीचे , प्रेरणेचे..
मला साद घालशील ??
प्रतिसादात  शब्दांची कविता बनेलही कदाचित