Friday, November 16, 2012

अंतर




एका अनोळखी वाटेवरून तू आणि मी चालत होतो. हातात हात कधी गुंफले गेले .. कळालेच नाही .आपण बोटांशी खेळता खेळता एकमेकांच्या कवेत हरवून गेलो .काय होते ते ? तो आवेग , तो स्पर्श , तो तू आणि ती मी !! चिंब भिजत राहावे अशी एक सर . ती सर बरसून गेली...आणि मग जी आली तिला शुद्ध म्हणतात कदाचित !! शुद्धीवर आल्यावर तू आणि मी दोन अनोळखी बेटांवर होतो. एकमेकांकडे ' आपण काय केले ? ' अशा अविर्भावात पाहत उभे राहिलेले आपण दोघे !! चूक कि बरोबर ठावूक नाही , पण कसल्याशा जाणीवेतून आपल्यातले अंतर वाढले .

तू माझ्या नजरेसमोर असताना अचानक तुझ्या माझ्यातले अंतर केव्हा वाढले मला उमगलेच नाही . तू दूर दूर जात राहिलास . आणि आता .. आता आठवणींमध्ये एका ठिपक्याएवढा दिसतोस . मी एकटीच आहे या बेटावर ... तुझ्या एका कटाक्षासाठी , तुझ्या स्पर्शासाठी आसुसलेली ... लाटा आदळतात विचारांच्या आणि त्यांचे तुषार झेलत मी एकटीच उभी आहे ... तुझी वाट पाहत ......कित्येक वर्षे सरली. तुझे असणे सवयीचे होते कि तुझे नसणे हि सवय आहे हे न जाणवण्याइतकी  वर्षे सरली तो आवेग अनुभवून 


मधल्या काळात  तुझे पत्र,मग इ मेल  तुझी खुण म्हणून  मागे उरलेली आपली मुलगी ह्यांनी  त्या आवेगाची आठवण  ताजी ठेवली. आणि त्या बातमीने मला मुळासकट हलवून टाकले. तू कधीच परत येणार नाहीस असे नाही वाटले . पण तू कधी येणार हे मात्र निश्चित नव्हते. आज तू येणार ह्या बातमीने मी खुश झालेय. खरच खुश झालेय का मी ? कि हा आनंद सुद्धा नुसतीच कल्पना आहे हेच समजत नाहीये मला.

माझ्या मुलीने नकळत्या वयात पाहिलेले तिचे वडील आज ४ वर्षांनी तिला  कवेत घ्यायला भारतात येणार हि बातमी तिला सांगून तिच्या डोळ्यात पाहिलेल्या आनंदाने मला जाणीव करून दिली आहे तुझे असणे आमच्यासाठी काय आहे याची .  वडील काय असतात हेच नाही अनुभवलंय तिने अजून . वडील म्हणजे परदेशात असलेला एक सांता  जो दर वर्षी न चुकता भरपूर कपडे आणि खाऊ पाठवतो एवढीच समज आहे तिला . तो खाऊ ते कपडे पाठवणारा सांता  तिची आईच आहे हे कधी कळलेच नाही तिला.

आणि मी . माझ्यासाठी तू कोण आहेस ?  ज्याने मला माझ्यातल्या  सौंदर्याची  जाणीव करून दिली. ज्याने मला स्त्रीत्वाचा अनुभव दिला. ज्याने मला माझ्यातले मी पण , माझे स्वातंत्र्य जपण्याची जाणीव करून दिली तो तू. माझे अस्तित्व बनलेला तू आणि  एक दिवस माझे अस्तित्व मुळासकट हलवणारा सुद्धा तूच. 

"अन्विता " ...तुझी  हाक ??? तू  आलास? तू मला हाक मारलीस ?  हो तूच ... माझ्या आठवणीतल्या ठीपक्याच्या रुपात मी जपलेला तू.. आज माझ्यासमोर आला आहेस . आणि माझे शब्दच हरवलेत. डोळ्यातून ओघळणारे अश्रू आहेत कि  माझे विचार ? तू परत  आलास ह्याच्यावर माझा विश्वासच नाही बसत आहे.

तिकडे जाऊन तू केलेले लग्न. तू माझी केलेली फसवणूक . आणि तुझे परत येणे .. खरे काय समजावे ? तुझे माझ्यावरचे  प्रेम  कि परिस्थितीने केलेला खेळ ? मधल्या काळात तू तुझ्या बायकोपासून लपवून मला पाठवलेले मेल हि तिची सुद्धा फसवणूकच होती. तिच्या गोऱ्या  समाजाइतके मोकळे आणि मोठे मन नाही माझे... पण आज माझे मन तुझ्याकडे का धाव घेत आहे हे नाही समजत आहे मला . असे काय बंधन आहे आपल्यामध्ये ज्याने तुला आणि मला असे बांधून ठेवले आहे ?

तू अगदी तसाच दिसतोस अजूनही.... नकळत माझ्या केसांकडे माझा हात गेला आणि उगाचच आपण गबाळे  दिसतोय कि काय असा वाटून गेले.


तू समोर आहेस.... मन तुझ्याकडे धाव घेत आहे . पण पावले ... पावलांना नाही जायचं तुझ्याजवळ ..आपण समोर येईपर्यंत  तुझ्याकडे  धावून येण्याची इच्छा करणारी माझी पावले आज तुझ्याजवळ नाही येत आहेत . मनाची अशी द्विधा स्थिती मी कधीच अनुभवली नव्हती ..असे का होतंय  ?? कदाचित आता उमगतंय कि आपल्याला बांधून ठेवणारे दुसरे कोणी नाही आपल्यातले अंतर होते. 

आपल्यामध्ये ते बंधन तू दूर असताना माझे वाटायचे. आणि आता कसलीच बंधने नाही आहेत पण तरीही मन चालतंय तुझ्या दिशेने आणि पावले अगदी विरुद्ध दिशेने. मनात आपल्या मुलीचा विचार आला आणि वाटले '  आपली ?  नाही ती माझी मुलगी आहे. तू काय दिलेस तिला ? जन्माआधी एक सावत्र आई  , जन्मानंतर सक्ख्या आईकडून सतत फसवणूक . तू माझी फसवणूक केलीस , तुझ्या बायकोची फसवणूक केलीस आणि ती गेल्यावर तू पुन्हा एकदा मला फसवायला परत आला आहेस? का ?  ' 

मनात असे विचारांचे वादळ का आहे ? मला काय हवे आहे तेच समजत नाहीये . " तू आलास ?? " माझ्याच नकळत मी काय बोलतेय हे ....?

 " तू का आलास ? निघून जा . मला आणि माझ्या मुलीला सोडून निघून जा.  आम्हाला तुझे अस्तित्व  मान्य  आहे पण कदाचित ते आमच्यापासून दूर कुठेतरी असताना  . तुझ्यावर माझी भाबडी माया आहे ती टिकून आहे त्याचे कारण आहे तुझ्या माझ्या मधले अंतर. ते कधीच कमी होऊ देऊ नकोस. आणि आम्हालाही अंतर देऊ नकोस . जा निघून जा . आम्हाला एकटे सोड " 

माझ्या आकान्ताकडे हताशपणे पाहणारा तू आणि मग आल्या पावली माघारी जाणारा तू ...अजूनही नजरेसमोर तसेच्या तसे आठवते. अजूनही मनापासून प्रेम आहे माझे तुझ्यावर.  पण तोपर्यंतच जोवर आपल्यात आपणच जपू तेच अंतर जे तू एके काळी मला दिलेस आणि जे मी अजूनही जपलय 







मिलन

विरहाचे उन रखरखले डोंगर माथ्यावरती
मिलनास आतुर झाले आकाश आणि धरती
सरसावून आपले बाहू बरसले जणू आकाश
अधीर धरती वेडी आतुरली त्या स्पर्शास
घन गर्द एका राती बरसला श्याम मेघ
आतुर धरती वेडावली पाहुनी तो आवेग
तृषार्त धरती झाली तृप्त त्या स्पर्शाने
ते दीर्घ चुंबन सजले अंगणात पावसाने