Monday, January 2, 2012

रम्य

कातळ दगडांच्या वाटेवरून निघालो होतो तू आणि मी 
क्षितिजावर दूरवर दिसत होती सूर्योदयाची लाली ..
तुझ्या चेहऱ्यावरच्या लालीपुढे ती सुद्धा फिकी पडत होती . 
घाटाचा रस्ता दिसत होता वळणदार..
तुझ्या कमरेवरच्या वळणाची सर नव्हती त्याला.
धुक्याने झाकून टाकलेली दरी .. थंडीत जणू दरीने पांघरलेली दुलई ,
पण तुझ्या स्पर्शातली उब नव्हती तिच्यात 
ढग बदलत होते आकार प्रत्येक क्षणाला,
तुझ्या नजरेत बदलत जाणाऱ्या प्रत्येक भावाचे चित्रच जणू !!
दूरवर उडणारा पक्ष्यांचा थवा दिसत होता लयबद्ध 
पण तुझ्या पावलांची लय त्यांच्या नाजूक पंखांमध्ये नव्हती. 
कोकिळेचे कूजन येत होते कानी 
पण आपल्यातल्या संवादाची गोडी नव्हती त्यात. 
दूर  डोंगरात उगवणाऱ्या सुर्यबिम्बाला सुद्धा सर नव्हती तुझ्या भाळीच्या पिंजराची 
एका रम्य पहाटे मला  जाणवले .. तुझ्या सहवासापेक्षा रम्य हल्ली काहीच भासत नाही मला 
अगदी ती पहाट सुद्धा 

कविता

नव्हतास कधी तू माझ्या शब्दांना दाद देणारा ,
पण माझ्या कवितांना साद देणारा तूच होतास 
माझ्या शब्दांचा अर्थ कधी समजलाच नाही तुला ,
पण ते शब्द तुझ्यासाठी कधी निरर्थक नव्हते.
माझ्या शब्दांमागची प्रेरणा नव्हतास तू कधी ,
पण शब्दांसाठी प्रेरणा तुझीच असायची. 
आता शब्द असतात मनात ,
पण कविता नाही बनत त्यांची.
कविताच हरवली आहे माझी , 
जसे हरवलेत तुझे शब्द माझ्या कवितेसाठीचे , प्रेरणेचे..
मला साद घालशील ??
प्रतिसादात  शब्दांची कविता बनेलही कदाचित