Friday, May 28, 2010

पहिली रात्र

पहिली रात्र हि कल्पना हिंदी सिनेमाने ठरवून दिली आहे. कल्पना करायची ठरवली तर सेज पे  शरमाती  हुई नटी आणि शेर म्हणत शेर सारखा खोलीत येणारा नट असे चित्र नजरेसमोर येते नं ? पण ती सुहाग रात असते  . ती पहिली रात्र ....असे आपण मराठीत केलेले भाषांतर आहे असे  म्हणूयात!!!!

माझ्या आयुष्यात मात्र खूप पहिल्या रात्री आल्यात  ( वाचून माझ्यावर संशय आला न  ? ) , गैरसमज नको.... पण खरच माझ्या आयुष्यात  मात्र खूप पहिल्या रात्री आल्यात. आणि त्यांचीच हि आठवण.

हो..... माझी सगळ्यात पहिली रात्र होती तेव्हा मी काय केले असेल अंदाजाने सांगते..... तिला मी माझी पहिली.. पहिली रात्र म्हणते . म्हणजे ...माझा जन्म झाला ती रात्र ...माझ्या आयुष्यातली पहिली... पहिली रात्र होती.  जन्म रात्री १ वाजता झाला त्यामुळे माझी पहिली रात्र रडतच गेली असेल असा माझा एक अंदाज !!

म्हणजे बालवाडी ....पहिलीत... काही आठवत नाही त्या रात्री मी काय केले म्हणून मग थेट मोठी उडी मारतेय माझ्या मोठ्या शाळेवर ....

पुढे मला समजत होते तेव्हाची पहिली रात्र म्हणजे मी पाचवीला शाळेत जाऊन आले  ती रात्र. त्या रात्री मी खूप खुश होते. नवीन शाळा ( आम्ही त्याला मोठी शाळा म्हणायचो तेव्हा .. ) , सगळे काही नवीन. आणि त्यात मला हवी ती म्हणजे अ तुकडी मिळालेली. त्यामुळे माझी स्वारी खूप खुशीत होती. आता मी या शाळेत खूप अभ्यास करेन . आणि नेहमी गृहपाठ पूर्ण ठेवेन असे नवीन नवीन बेत. थोडक्यात माझे शालेय आयुष्य खूप सुंदर कसे बनेलयाचे बेत आखत आणि स्वप्ने रंगवत मी झोपून गेलेले.

मग शाळा , अभ्यास , आणि मग परीक्षा या सगळ्यात  " कुठून मी मोठ्या शाळेत आले रे देवा ?  छोट्या शाळेतच छान होते "  असे वाटायला लागले .  आता पुढच्या पहिल्या रात्रीची स्वप्नं पाहत मी दिवस मोजत होते . शाळा संपली कि मग मी कॉलेजात जाणार अशी स्वप्नं पाहायला लागले.

लवकरच ती पहिली रात्र पण आली. चक्क दहावी पास  होऊन मी कॉलेजात आलेच !!  पहिल्यांदा तिथे गेले ना.... तर खूप मोकळे वाटले . म्हणजे.... हेच हवे होते मला असे वाटले.  नकोत ते सर जे पांढरे बूट नसले कि मग रागवतात आणि नको तो युनिफोर्म . रोज नवीन कपडे ....आहा !! तास बुडवा , पळून जा  ... सगळे हवे तसे.... हो कॉलेजातून आल्यावर पहिल्याच दिवशी कॅन्टीन मध्ये वडा पाव खाऊन आले आणि किती तरी वेळ मी माझ्या कॉलेजात मी काय काय करेन याचे बेत आखत होते आणि स्वप्न रंगवत होते.

मग समजले अरे इथे शाळेपेक्षा जरासे कठीणच आहे. अभ्यास किती वाढलाय ??  तास बुडवून काही काही नाही होणार. तासाला बसले तर निदान काहीतरी समजेल. आणि आता रोज काय नवीन घालू हा प्रश्न . आणि आईने अकरावीतच गाडी मिळणार नाही अशी तंबी दिली आणि मग पुन्हा सायकल आणि मी ... मला हे नको होते. आता मेडिकल कि इंजिनिअर हा एक नवीन प्रश्न आलेलाच होता सोबत. पुन्हा एकदा " कुठून शाळा संपली रे देवा ??  हे रोज उशिरा पर्यंत क्लास आणि मग अभ्यासाचा त्रास. हे जुनिअर आयुच्या नकोच. सिनिअर व्हावे पटकन म्हणजे सुटले मी . " पुन्हा तेच पुढचे बेत , पुढची स्वप्ने ..... आणि... माझी पहिली रात्र!!!

सिनिअर कॉलेजात आल्यावर भावनांमध्ये काही बदल नाही झाला.... आता नोकरी आणि पुढे काय शिकायचे हे प्रश्न सोबत होतेच. आणि त्यांच्याबद्दल वेगळे काही नव्हते पण हो.... आणखीन एक गोड स्वप्न होते . लग्न आता मला प्रश्न सुटतील अशी एकच जागा होती . मी लग्न करेन आणि घरात बसेन. नवरा कमवेल आणि मी मजा करेन. हे स्वप्न !!!  त्याचे बेत !!!  घर कसे सजेल इथ पासून काय करावे कसे बनवावे इथपर्यंत सगळेच..... तर या काळातली स्वप्ने मोठी होती, आणि नेहमीप्रमाणे पुढच्या पहिल्या रात्रीची स्वप्ने पाहणे हा नियम मी सोडला नव्हता. 

हो.... पण ..... अजून त्या पुढे काय हे अनुभवले नाही. पण नेहमीप्रमाणे हि रात्र गोड आणि मग " अरे देवा याच्यापेक्षा एकटीच बरी होते " हि भावना आणि मग  पुढच्या पहिल्या रात्रीची स्वप्नं!!! हे चक्र चालत राहील ना ??

 जशी मी आले तसे आणि कोणी येईल याची स्वप्नं आणि मग त्या लहानग्या जीवाच्या आयुष्यातले ते सगळे क्षण आणि त्या सगळ्या पहिल्या रातींची स्वप्नं !! आई ने सुद्धा पहिली असतीलच ना ती सगळी स्वप्ने माझासाठी ?? माझ्या प्रत्येक पहिल्या रात्रीत तिची पण एक पुढची पहिली रात्र असेल नाही ??

प्रश्न ... त्या प्रत्येक फेज चा कंटाळा ....आणि मग पुढे काहीतरी छान असेल ....हे एक गोड स्वप्न !! हे चक्र प्रत्येक जण जगत असेल नाही ?

यात सगळ्यात सुखाचा काळ असतो ..." पहिली रात्र" . आपल्याला हवे ते मिळाले आहे हि भावना.... आणि त्यातून मिळणारे समाधान... हे सगळ्यात जास्त केव्हा असते  ?? तर त्या प्रत्येक पहिल्या रात्री जेव्हा आपण आपल्याला हवे त्या शिखराकडे जाणाऱ्या पुढच्या पायरीवर चढतो आणि  एका रात्री साठी त्या पायरीवर निवांतपणे विसावतो. तीच तर असते  कल्पना केलेली पुढची पहिली रात्र ....

ती सेज.... ती फुले ....असतात ...आपल्या कल्पनेत....  आणि ती प्रत्येक पहिल्या रात्री असतात आपल्या सोबत . हो ....पण शेर सांगणारा शेर आणि शेर  ऐकणारी शेरनी एकदाच येते !!! प्रत्येकाने कल्पना केलेली असते ना  .....सिनेमातली पहिली रात्र !! त्याच दिवशी !!!

No comments:

Post a Comment