Monday, January 2, 2012

रम्य

कातळ दगडांच्या वाटेवरून निघालो होतो तू आणि मी 
क्षितिजावर दूरवर दिसत होती सूर्योदयाची लाली ..
तुझ्या चेहऱ्यावरच्या लालीपुढे ती सुद्धा फिकी पडत होती . 
घाटाचा रस्ता दिसत होता वळणदार..
तुझ्या कमरेवरच्या वळणाची सर नव्हती त्याला.
धुक्याने झाकून टाकलेली दरी .. थंडीत जणू दरीने पांघरलेली दुलई ,
पण तुझ्या स्पर्शातली उब नव्हती तिच्यात 
ढग बदलत होते आकार प्रत्येक क्षणाला,
तुझ्या नजरेत बदलत जाणाऱ्या प्रत्येक भावाचे चित्रच जणू !!
दूरवर उडणारा पक्ष्यांचा थवा दिसत होता लयबद्ध 
पण तुझ्या पावलांची लय त्यांच्या नाजूक पंखांमध्ये नव्हती. 
कोकिळेचे कूजन येत होते कानी 
पण आपल्यातल्या संवादाची गोडी नव्हती त्यात. 
दूर  डोंगरात उगवणाऱ्या सुर्यबिम्बाला सुद्धा सर नव्हती तुझ्या भाळीच्या पिंजराची 
एका रम्य पहाटे मला  जाणवले .. तुझ्या सहवासापेक्षा रम्य हल्ली काहीच भासत नाही मला 
अगदी ती पहाट सुद्धा 

कविता

नव्हतास कधी तू माझ्या शब्दांना दाद देणारा ,
पण माझ्या कवितांना साद देणारा तूच होतास 
माझ्या शब्दांचा अर्थ कधी समजलाच नाही तुला ,
पण ते शब्द तुझ्यासाठी कधी निरर्थक नव्हते.
माझ्या शब्दांमागची प्रेरणा नव्हतास तू कधी ,
पण शब्दांसाठी प्रेरणा तुझीच असायची. 
आता शब्द असतात मनात ,
पण कविता नाही बनत त्यांची.
कविताच हरवली आहे माझी , 
जसे हरवलेत तुझे शब्द माझ्या कवितेसाठीचे , प्रेरणेचे..
मला साद घालशील ??
प्रतिसादात  शब्दांची कविता बनेलही कदाचित

Thursday, March 10, 2011

पाउस ... !!

मुसळधार पाउस कोसळत होता .. पावसाचा तो आवाज ... आणि सोबत गाणी ... गारवा  ssssss .. एकटेपण खाऊन टाकेल असे वाटले कि गाणीच तिला सोबत करत. मग ते घर असो , गर्दी असो कि ऑफिस , सगळीकडे गाण्यांची तिला सोबत .. आज तर पाउस पण सोबत करत होता. उगाच लग्नाचा अल्बम चाळत बसलेली ती . अगदी हरवून गेलेली कुठेतरी...

" तांदूळ खाऊ नको लग्नात पाउस पडेल .."   .. " अगं आई मी न जानेवारीत लग्न करेन मग पाउस कसा पडेल ?"  .. हा संवाद आठवला आणि स्वतःशीच हसली . मुठभर कच्चे तांदूळ घेऊन ते तासभर खात  राहणे हे काही कधीच सुटले नव्हते न ?? खरेच काही संबंध आहे का तांदूळ आणि पाउस यांचा ?? नेमके जून मध्ये लग्न ठरले आणि ते हि जोरदार पावसाने वरातीचे स्वागत करून  ..घोड्यावर बसून नवरा येणार हे स्वप्न स्वप्नच राहिले ..... तो असाहि घोड्यावरून आला नसताच . " मला छान छौकी आवडत नाही . उगाच का दिखावा करायचा ?? सरळ सही करून लग्न करायचे. आणि सप्तपदी झाली नाही तर तू माझी नाही का होणार ? हे नवीन खूळ घेऊन नको येउस ग . आपण सहीचे लग्न करायचे ..एकदम सही आयडिया आहे हि "  असा उगाच शब्दांची कोटी करून हसायचा तो . पण तिची इच्छा होती म्हणून मोजकी १०० माणसे बोलावून लग्न करायचे ठरले. त्यात पण यादी करताना नेमके कोणाचे नाव गाळावे हा चर्चेचा विषय बनला होता त्या काळात . आई आणि तो किती टाळ्या देत हसायचे एकमेकांना .. ते चित्र क्षणभर समोर आले आणि मी किती भाग्याची असे वाटून गेले तिला. 

" हा पाउस आलाच हम्म .. खरा मित्र आहे तुझा हा  .. लग्नाला हजेरी लावलीच .. "  असे म्हणत तिच्यावर हसलेला तो , मग कुठेच फिरायला न जाता आल्यामुळे चिडलेला तो , आणि मग  रुसवा गेल्यावर तिच्यासाठी फुले आणणारा तो ... सगळेच सुंदर , अकल्पित.  त्याच्या नंतर खरा सखा वाटेल असा पाउसच तर होता . त्याच्याशिवाय जर ती कोणाला कवेत घेत असे तर तो पाऊसच होता . तो पण म्हणायचा कि " पाउस बनून बरसेन मी तुझ्यासाठी . पण फक्त मलाच या मिठीत जागा हवी . " वाटायचे कि किती प्रेम आहे त्याचे तिच्यावर.  प्रेम कि वेड हे तेव्हा उमजलेच नाही. निव्वळ हट्टी होता पण तो .

सुरुवातीला तिचे मित्र घरी येणे बंद केले आणि मग त्याचे मित्र पण ?? आईच्या शेवटच्या दिवसात तर मावस भाऊ सोडायला येतो म्हणून आईला घरी आणून ठेवलेले  त्याने . हे पण त्याने मावस भावाला हाकलून लावले तेव्हा समजले . तोवर वाटत होते कि किती प्रेमळ आहे हा .. अगदी स्वतःच्या आईप्रमाणे काळजी घेतो आईची . आई गेली तेव्हा पण पाउस बरसला . आभाळाला पण दुक्ख झालेले .. इतके ..कि रात्रभर धाय मोकलून आभाळ रडत राहिलेले.

माहेरची नाती तर त्याने कधी जुळू दिली नाहीत आणि सासरच्या कोणाला ती पसंतच नव्हती म्हणून कधी त्यांच्याशी संबंधाच नाही आला. पण तिने तिचे जग बनवलेले. त्यात होते ती , तो आणि वर्षातून चार महिने आवर्जून तिच्यासाठी बरसणारा पाउस. पाउस गेला कि उरलेले ८ महिने तिच्यासाठी कधी बोचरे वारे सुद्धा नसायचे . असायचे ते फक्त रखरखते उन . घरातही आणि घराबाहेरही !!

पण मग कधी कधी वळवाच्या पावसासारखा तो तिच्यावर बरसायचा आणि मग  ' आणखीन काय हवे त्याच्याकडून ?? '  असा विचार मनात चमकून जायचा .' कोणाची दृष्ट लागू नये या संसाराला 'असे वाटून जायचे. हि भावना होती म्हणूनच तर त्याच्याबद्दलची ओढ , प्रेम  अजूनही तशीच होते . मनातली भावना अगदी तशीच होती जशी पहिल्या भेटीतच त्याच्या प्रेमात पडल्यावर होती .. 'ह्याच्याशिवाय दुसरे कोणीच नसले तरी चालेल. पण तो नसला कि आयुष्याला काहीच अर्थ नसेल  '  हीच भावना तिला व्यापून होती. आणि त्याच्या मनात तर तिच्याशिवाय कोणत्याच गोष्टीला स्थान नव्हते. म्हणूनच त्याचे तिच्यावर प्रेम होते म्हणण्यापेक्षा त्याला तिचे वेड होते असे म्हणणे योग्य वाटेल !!  वेड्यासारखा प्रेम करायचा तो. आणि तिच्यासाठी ...  तोच तिचे सर्वस्व होता . त्याच्या संतापासकट प्रत्येक गोष्टीवर ती कायम मनापासून प्रेम करायची .

खिडकीतून तळवा बाहेर काढत तिने पावसाचे चार थेंब हातावर झेलले आणि जणू कोणीतरी हसत टाळी देत आहे असा भास झाला. वाटले पावसाने सोबत आईला आणले आहे. तोच स्पर्श , तोच ओलावा .. मायेचा !!  अचानक एक वीज कडाडली आणि समोरच्या झाडावर पडली . झाड जाळून खाक झाले. त्यानेच पावसाला टाळी देताना तिला पहिले कि काय असे वाटून घाबरून तिने खडकी बंद करून घेतली. इतके दिवस मनाच्या खिडक्या देखील अशाच बंद केल्या होत्या तिने ... तो जिवंत असेपर्यंत .. 

यांना blood  cancer  झाला आहे . हे शब्द आई गेल्यावर अगदी वर्षभरातच  कानावर आले आणि  आई गेल्यावर रात्रभर बरसणारे आभाळ त्या वेळी तिच्यावर कोसळले ...  त्याच्या सोबतचे शेवटचे ते क्षण किती छान होते .  जाताना " एकदाच मला तुझ्या कुशीत घे " हि त्याची विनवणी आणि मग डोळ्यात तरळून गेलेले पाणी. तो दिवस .. ती संध्याकाळ .. आणि आजची संध्याकाळ यात साम्य एकच होते . पाउस ...  !!  तो गेला त्या दिवशी बरसला , आई गेली त्या दिवशी बरसला तोच पाउस . 

आज तिला कोणाच्या तरी मिठीची नितांत गरज वाटली . ठीक एक महिन्याने.... त्याच्या मिठीची तहान लागली पण आता पावसाच्या थेम्बानेच फक्त ती भागणार होती . मनाच्या ..घराच्या खिडक्या उघडून तिने बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पहिले. दाराकडे धावत गेली . पावसाला कवेत घेतले आणि तिच्याच नकळत तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहायला लागले. तिने हव्रतासारखे पावसाच्या प्रत्येक थेंबाला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला . आणि गुडघ्यांवर खाली बसून आभाळा कडे पाहत ती जोरात ओरडली ... " आनंद मला नको रे सोडून जाउस .... मी अपूर्ण आहे तुझ्याशिवाय ... आनंद ...."  ...........प्रतिसाद म्हणून आभाळात एक वीज कडाडली ..... 

Tuesday, March 1, 2011

मला भेटलेल्या आजी

सावरकर स्मृतिदिनाच्या दिवशी मी आणि माझा नवरा एकत्र त्याच्या आई बाबांच्या निवेदनाला ऐकण्यासाठी मुद्दाम पुण्याहून पेण ला गेलो होतो . त्यांनी नेहमीच्या कामा व्यतिरिक्त केलेले हे पहिलेच सादरीकरण असावे कदाचित . पण ते त्या दिवशी एकत्र पहिल्यांदाच कार्यक्रम सादर करणार होते आणि आम्हाला भारी कौतुक म्हणून आम्ही पेण ला गेलो होतो. संध्याकाळी कार्यक्रम जोरदार झाला. सावरकरांवर आधारित गोष्टी आणि मग त्यांना बहारदार बनवणारे आई बाबांचे निवेदन आणि सोबतीला सावरकरांच्या कवितांनी केलेली वातावरण निर्मिती . या सगळ्यानंतर बराच वेळ आमचा पाय निघत नव्हता तिथून . आई बाबांना लोकांनी गराडा घातलेला आणि त्यांचे कौतुक चाललेले होते .  मी नवीन सून अनोळखी वातावरणात इकडे तिकडे पाहत बसलेले.

मी माझ्या साडीला सावरत बाजूला बसलेले. तेवढ्यात एक तरुण मुलगी आली . माझे छोटे छोटे केस आणि त्याच्यावर साडी असे रुप पाहून ... " तुम्ही मराठी साहित्य मंडळातल्या आहात का ?" असे विचारून गेली . "नाही ....पेहरावावरून शहरातल्या  वाटता म्हणून विचारले " असे म्हणून पुढे गेली . मला अचानक मी प्रभावी वगैरे वाटतेय कि काय असे वाटले .

इतक्यात एक आजी समोर आल्या . अंगात ढगळ म्हणावा असा एक भडक निळ्या रंगाचा सलवार कमीज अडकवलेल्या , तोंडात दात नसलेल्या , अतिशय कृश म्हणावे अशी शरीरयष्टी असलेल्या त्या आजी माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या , " तुम्ही इथल्या नाही दिसत . मराठी साहित्य मंडळात आहात का ? तुमच्याकडे पाहून तुम्ही काहीतरी वेगळे काम करत असाव्यात असे वाटले. मग मनातून वाटले कि तुमच्याशी बोलावे . " असे म्हणत जवळच्या कापडी पिशवीत हात घालत त्यांनी एक कागद बाहेर काढला !! " मी हे लिहिलेले . माझ्या शेजारी एक जण राहतात न त्यांना दाखवलेले मी हे लिखाण ... मी पुण्याच्या स . प  ची विद्यार्थिनी . मला शिकवायला पु ग सहस्त्रबुद्धे होते . त्या वेळेपासून लिहिते मी. पण हल्ली वाचायला कोणी नसते. आम्ही दोघेच इथे राहतो . मुलगी परदेशात आहे आणि मुलगा ठाण्याला असतो . मी सावरकर भक्त आहे एकदम  !! आणि आज मी हे वाचायला घेऊन आले होते. पण कार्यक्रम संपेपर्यंत कोणाला सांगू नाही शकले कि मी लिहून आणले आहे आणि मला हे वाचून दाखवायचं आहे . तुम्ही हे वाचाल असे वाटले. "  असे म्हणत त्यांनी एक कागद पुढे केला. सावरकरांचे चित्रच त्यांनी काढले होते. त्या कार्यक्रमातून आले समोर ते इतिहासातले सावरकर आणि या आज्जीच्या लेखणीतून समोर आले ते तिला आवडलेले ... तिने पाहिलेले सावरकर .

काय योगायोग असतो न ?? खूप दिवसात काहीच लिखाण न करू शकलेली मी आणि खूप काही लिहून कोणाला वाचायला देऊ न शकलेली आजी असे आम्ही  अशा वेळी समोर यावे . तिने पण नेमका मलाच कागद द्यावा . आणि मला माझ्याच वयाची लाज वाटावी . ७५+ वय असेल नक्कीच त्यांचे . आणि मी लग्नानंतर ३ च महिन्यात आळशी झाले आहे. गोष्टी मनात येतात पण कागदावर लिहिल्या जात नाहीत . वेळ मिळत नाही .... असल्या मूर्ख सबबी सांगत असते. मी मनातून ओशाळून गेलेले. ते लिखाण अगदी भाषण करण्याच्या तयारीत लिहिले असावे असे वाटत होते. पण आजींच्या वयाकडे पाहता .. फारच छान . शुद्ध भाषा , स्पष्ट विचार आणि सुसंगत मांडणी .

 " मी पण लिहिते. तुम्ही फारच छान लिहिले आहे. तुमची हरकत नसेल तर मी ते  तुमच्या नावाने इंटरनेट वर लिहीन . लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला पोस्टाने पाठवेन . मी हे xerox करून घेतले तर काही हरकत नाही न ?? "   " मी देते न स्पष्ट xerox मिळतात न त्या दुकानातून आत्ता काढून आणते , देव पावला बाई ... मला वाटलेच तुमच्याशी बोलावे असे , कोणी वाचायला नसते न घरी म्हणून मग मी असा कोणी वाचले कि खुश होते एकदम . देवानेच सांगितले मला तुमच्याशी बोलायला . तुमची तंत्रज्ञ भाषा काळात नाही मला. पण मी इंटरनेट वर कसे पाहीन माझे लेखन ?? मी शिकेन पाहिजे तर .. म्हणजे माझा लेख इंटरनेट वर कसा दिसतो कसे कळेल ? "  .

 " कागद द्या माझा नवरा काढून आणेल xerox . तुम्ही नका धावपळ करू . " असे म्हणत मी त्यांच्या हातातला कागद काढून घेतला आणि नवर्याला नजरेनेच आज्ञा केली आणि तो पण आजींच्या कौतुकात सामील होत दुकान शोधायला बाहेर पडला. पण रात्र बरीच झालेली . त्यामुळे दुकाने बंद झाली होती . कागद हलवत तो परत आला. मी त्यांना माझा पत्ता दिला " या पत्त्यावर पोस्टाने पाठवा ,मी तुमचे लिखाण तुमच्या नावाने सगळ्यांना वाचायला देईन . चालेल न ? " असे म्हणत माझा पत्ता त्यांच्या हातात दिला.  त्या खूप खट्टू झालेल्या खऱ्या पण दुकाने बंद झालेली त्यामुळे त्यांच्याकडे पर्याय नव्हता . त्यांनी मला त्यांच्या सुंदर अक्षरात त्यांचा पत्ता आणि फोन नंबर दिला. आणि माझा आणि त्यांचा संवाद सुरु झाला.

दूर बसलेल्या माझ्या दिराला हि आजी हिला बोर करतेय कि काय असे वाटल्याने त्याने मला बोलावून घेतले आणि मग मी काय करणारे हे ऐकून खुश झाला आणि मला म्हणाला कि जा आपण घरी गप्पा मारू. आत्ता जाऊन तू त्यांच्याशी गप्पा मार .

त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कोणत्याही फोटो मध्ये नाही दिसणार असा होता. बोळक्यात दात नसताना ते दाखवत बाहुली मिळाली कि हसून दाखवणारी लहान मुलगी आणि हि आजी यात काहीच फरक नव्हता वाटत . त्या भरभरून त्यांनी कोणकोणत्या विषयांवर लिहिले आहे हे बोलत होत्या. " सगळे जण सावरकरमय झाले तरच या देशाचे खरे आहे  "  इथपासून " असे आमचे गणपती आणि असा आमचा उत्सव " पर्यंत सगळ्या लिखाणांची मला माहिती मिळाली होती. आता ते सगळे लेख वाचायला कधी मिळतील असे मला झाले आहे .

त्यांचे लेखन मला पोस्टाने मिळाले कि त्यांच्याच नावाने मी मा बो वर लवकरच प्रकाशित करेन. त्याच्यावर सगळ्यांनी जरूर प्रतिक्रिया टाकाव्यात म्हणून लिखाणाचा हा खटाटोप .

आजींचे लेखन घेऊन लवकरच मा बो वर येईन आणि तेव्हाच त्यांचे नाव पण सगळ्यांना सांगेन . तोपर्यंत हा लेख वाचणार्यांचे आभार  !!

Wednesday, September 15, 2010

आमचे ऑटोमेटेड लग्न

हा लेख हि आमच्या अति तंत्रज्ञ बुद्धीतून जन्माला आलेल्या कल्पना आहेत !!

आम्ही सगळेच कॉम्पुटर चे विद्यार्थी !! एखाद्या लग्नाला जाऊन आलो कि हे असे केले तर किती मजा येईल अशी चर्चा व्हायची !! माझे लग्न ठरले तेव्हा पण अशा किती तरी अभिनव कल्पनांचा उगम झाला !! त्याच इथे लिहित आहे !!

१. कन्व्हेयर बेल्ट वरून आशीर्वाद द्यायला आलेले लोक  -

लग्नात सगळ्यात जास्त कोण दमते.. तर वधू आणि वर !! वर खाली करूनच त्यांची वाट लागते !! त्यात भरीस भर मुलगी सांगते " या कि नै आमच्या काकुच्या काकू  हम्म !! "  (याचा गर्भित अर्थ  " पाया पडा "  असा असतो ) आणि मग वाका !! पुन्हा नवीन काकू येईपर्यंत वाकून राहता येत नाही म्हणून काकू येई पर्यंत वर या !! वाका वाका ( शकीराचे नाही हो !! ) मध्ये कंबर " मला जाऊ द्या न घरी आता वाजले कि बारा " असे ओरडून सांगायला लागते !! म्हणून आमच्या एका मैत्रिणीने सुचवलेला उपाय  !!

लग्नात कन्व्हेयर बेल्ट बनवायचा !! वधू वराने खाली वाकून उभे राहायचे आणि बेल्ट वर मोठ्यांनी चढायचे . एकाच्या पाया पडून झाले कि दुसर्याने यायचे आणि विमानतळावर सरकणाऱ्या सामानाप्रमाणे मोठे पुढे पुढे सरकत राहतील !! यांनी मात्र हात जोडून खाली वाकून उभे राहायचे !!

२.   आहेर न देणाऱ्याला जेवण मिळू नये अशी सोय !!

हल्ली आहेर आणू नये अशी तळटीप असते !! पण तरीही मनातून कोणीतरी काहीतरी आणले आहे का असे चपापून पहिले जात असतेच !! तर मग अशी तळटीप लिहिलीच नाही आणि आहेर आणला नाही त्याला जेवण मिळू नये अशी सोय केली तर ?? अशी एक अभिनव कल्पना एका सुपीक डोक्यातून आली .

त्यातून उगम झाला स्क्राच कार्डाचा . आहेर मिळाला कि करवलीने स्क्राच कार्ड द्यायचे आणि मग त्यात आलेला नंबर टाईप केला कि भोजन समयी चविष्ट पदार्थांच्या चवीचा आनंद घेता येऊ शकेल !! हि एक सुपीक कल्पना !!

३.  आहेर नाहीतर बाहेर !!

तळटीप बदलून आहेर नाही तर बाहेर अशी केली तर कसे ?? हि आणखीन एक अभिनव कल्पना !!

४. अक्षता टाकणारे मशीन

मुला मुलीच्या डोक्यापर्यंत अक्षता क्वचितच  पोहोचतात !! हल्ली काही लग्नांमध्ये रांगेत उभे राहून त्यांच्या जवळ जाऊन डोक्यावर अक्षता टाकणे असा एक प्रकार मी पहिला !! पण तो मंत्र पुष्पांजली नंतर देवापाशी जाऊन फुले वाहण्यासारखे झाले आणि ती कल्पना काही रुचली नाही आम्हाला !! म्हणजे मंगलाष्टके संपली कि मग डोक्यावर अक्षता !! त्यात मजा नाही .

म्हणून दारातून आत येताना पाहुण्यांनी अक्षतांच्या ताटावर हात ठेवायचा !! मंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी त्या अक्षता मशीन मध्ये टाकायच्या !! आणि सावधान असा शब्द आला कि मशीन मधून मुला मुलीच्या डोक्यावर अक्षता पडायला पाहिजेत  अशी सोय करायची !! मोठ्यांच्या आशीर्वादाचा आणि अक्षता मुला  मुलीच्या डोक्यावर बरोबर पोचतील याचा पूर्ण लाभ मिळेल !!

५.  नाव सुचवणारे मशीन

नाव घेणे हा आणखीन एक कठीण जाणारा प्रकार !!

म्हणून डिजिटल स्लायडिंग साईन बोर्ड अशी एक कल्पना आली !! म्हणजे प्रत्येक विधीच्या वेळी घायचे नाव त्याच्यावर दिसेल अशी सोय !!
जो विधी सुरु होईल त्या विधीशी संबंधित नाव त्या बोर्डावर दिसेल आणि मुलासाठी आणि मुलीसाठी अशी वेगळी वेगळी उखाण्यांची यादी सरकत राहील !! यादीतली २ एक नावे घेतली तरी पुरेल !!

अशा किती तरी विनोदी कल्पना मला गप्पा मारताना बहिणी नाहीतर मैत्रिणी सुचवत राहतात !! तुमच्या डोक्यात आहे का काही ऑटोमेशन ची कल्पना ?? आमचे ऑटोमेटेड लग्न बहारदार बनवायला ??


तळटीप : या प्रयोगांची कल्पना एक विनोदाचा भाग म्हणून घ्यावी !! गंभीरपणे घेतल्यास लग्नात ऑटोमेशनचे गंभीर परिणाम भोगावे लागतील

Thursday, September 9, 2010

ती गेली तेव्हा..

" ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता " .... गाण्याचे शब्द कानावर पडले आणि अभिनव च्या गालावर त्याच पावसाचे थेंब ओघळले... ती जाऊन आज २२ वर्षे झाली.

" अनुज्ञा गेली. "  चे शब्द कानावर आदळले . आणि अभिनव कोसळला.

अनुज्ञा विमानतळावर त्याला सोडायला आली तेव्हाच तिला शेवटचे पहिले होते...किती आनंदात होती ती !! ती आई होणार होती . अभिनव ला तर तिला कुठे ठेवू नि कुठ नको असे झाले होते.

तिचे हास्य अजूनही तसेच.....नजरेसमोर तरळत होते ..ते सगळे चित्र...त्याला आवडते म्हणून तिने घातलेला पांढरा शुभ्र फ्रॉक !! किती सुंदर दिसत होता तिच्यावर. "हि छोटी मुलगी आता आई होणार का ?" अस म्हणत सगळ्यांनी तिची किती चेष्टा केलेली. आणि " असू देत हा मोठा माणूस तर बाप होणार आहे न ?? " असे म्हणत ती पण प्रत्येक चेष्टेला उत्तर देत होती.

अभिनव पण तिच्या सोबत बालपण जगत होता. मोठ्यांमध्ये किती सहज मोठी होऊन जायची ती. आणि लहान मुलांना तर ती प्रचंड आवडायची.

" अभिनव मला न छोतू  बेबी गल पाहिजे....... माझ्यासारखी छोतुशी !! " ...."बाप रे बाप म्हणजे मला दोन दोन लहान मुलांना सांभाळायला लागणार ....  त्यापेक्षा एक मोठा मुलगा... या मोठ्या माणसासारखा " .."" नाही हम्म दोन दोन नाही ... छोटू गल आली न कि मी मोठी होणार ...नको ....तूच मोठा चांगला रे !! नाहीतर मला खाऊ कोण आणेल ? " अस म्हणत असताना आपल्या हसण्यात सामील  झालेली अनुज्ञा आठवली आणि .... अभिनव पुन्हा कोसळला ....  तो मनातून कोसळून गेला होता पूर्णपणे ... विमान प्रवासातले उरलेले १२ तास त्याला नको नको झाले होते. तिचा हसरा चेहरा आता निष्प्राण कलेवारासारखा दिसेल या कल्पनेनेच त्याला गिळून टाकले .

 मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवीत होता ... 

हृदयनाथांचे शब्द कानावर आले आणि अनुज्ञाच्या आठवणीने मनावर  आलेले मळभ अजूनच वाढले.त्याने ओघळणार्या अश्रुना वाट मोकळी  करून दिली. 'हुबेहूब तशीच दिसते न आयुषी ?' या कल्पनेने क्षणभर सुखावला आणि स्वतःशीच हसला ..विमानातून दिसणारे दृश्य खरच सूर्य किरणांना सोडवत असल्यासारखे वाटत होते त्या दिवशी.

" अभिनव बाळा मुलगी झाली रे पण आपले बाळ गेले ... अनुज्ञा गेली."दुपारी अनुज्ञा च्या बाबांचा फोन आला

सकाळी अनुज्ञाला दवाखान्यात नेतानाच कल्पना आलेली कि आता हे मुल काही जन्माला येणार नाही. पण अनुज्ञाला काही होऊ नये म्हणून मनातून किती तरी वेळा नकळत हात जोडलेले त्याने . मिळेल त्या विमानाने परत ये हा फोन आला तेव्हा मनात शंकेची पाल चुकचुकली होतीच पण ........अनुज्ञाला काही.......  छे मन चिंती ते वैरी न चिंती असा म्हणून त्याने दुर्लक्ष केलेले.. .आणि दुपारी अनुज्ञा च्या बाबांचा फोन आला ....सगळेच संपून गेल्यासारखे झाले ...

पांढरा शुभ्र फ्रॉक  ... गळ्यात मंगळसूत्र आणि जरासेच वाढलेले ते पोट घेऊन धडपडत  विमानतळावर आलेली अनुज्ञा नजरेसमोरून काही केल्या जात नव्हती. तिला "छोटू बाल येताना मी थांबेन हो माझ्या बाळासोबत " असे दिलेले वचन सुद्धा पाळता न आल्याची खंत त्याला आतल्या आत पोखरून टाकत होती. सातव्या महिन्यात हे असे काही घडेल याची कल्पना सुद्धा कोणी केली नव्हती .

विमानतळावर घ्यायला आलेला तिचा भाऊ पाहून तो कोसळला " अविsssssss.........हे काय रे ?? मला माझी अनु आणून दे अवि " असे म्हणत त्याने टाहो फोडलेला !!

अवि सोबत रत्नागिरी पर्यंतचा प्रवास संपेपर्यंत तो जरासा सावरला !! मुलगी झाली हि बातमी अशी ऐकायला मिळेल अशी कल्पना सुद्धा त्याने केली नव्हती !! हुबेहूब अनुसारखी दिसते या वाक्यावर पुन्हा एकदा अनु नजरेसमोर आली आणि त्याने आपला हुंदका आवरला ..

 अंगणात बरीच गर्दी जमलेली. बरेच लोक येऊन गेले होते. बर्फावर ठेवलेला तिचा देह पाहून अभिनव कोसळला !! अविला मिठी मारून त्याने पोटभर रडून घेतले . " फाज्जील उगाच बर्फ नाही हम्म... मला गार सहन नाही होत अजिबात .." तिच्या अंगावर शिमल्यात बर्फ उडवला तेव्हा तिची प्रतिक्रिया अशीच होती . आणि तिचे कलेवर असे बर्फात ?? त्याची वाट पाहत होती न ती ?? पण अशी ???

ती आई होती म्हणुनी घन व्याकूळ मी हि रडलो ... त्या वेळी वारा सावध ss...  पाचोळा उडवीत होता

या ओळी कानावर आल्या  .....

"अभिनव ... मुलगी ....." असे म्हणत अनुज्ञाच्या वाहिनीने आयुषीला हात दिले आणि " अनु आहे रे आपल्याsssत हि पहा " असे म्हणत अवीने त्याच्या खांद्यावर डोके ठेवून हमसून हमसून रडायला सुरुवात केलेली .  आणि मग हातातले मुल सावरत रडणारा अभिनव आणि अवि ....बाजूला अनुचा निपचित देह ...हे दृश्य अभिनव च्या नजरेसमोर आले .

"तिला न्यायची सोय झाली आहे अभिनव. फार वेळ आता ठेवायला नको ..." गर्दीतून कोणीतरी मोठ्यांनी सुचवलेल्या वाक्यानिशी अंत्ययात्रेची सुरुवात झालेली . तिन्हीसांजा तिला निरोप देऊन सगळे परतले . घर शांत होते. पूर्ण  वाड्याला संजीवनी देणारी अनुज्ञा नव्हती. घर अंधारून आले होते. अंगणात रडणाऱ्या आयुषी ला घेऊन अनुज्ञा ची वाहिनी चकरा मारत होती. याच अंगणात अभिनव अनुज्ञा सोबत लहान मुलासारखा उड्या मारत खेळत होता ... तिथे तिच्या मुलीला खेळवायला तीच नव्हती...

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

त्या दिवशी अभिनव एकटा झाला होता . अनुसोबतचे अवखळ अल्लड क्षण आता संपले होते आणि ते तसेच पुन्हा कधीच जगता येणार नव्हते. उरली होती फक्त एक कधीही न भरून येणारी पोकळी !! विचारात हरवलेला ... आयुषीच्या आयुष्याला उजेड देण्यासाठी अनुज्ञा ने तेवत ठेवलेला ...एकटाच ..... अभिनव !!

" बाबा रे तुला किती वेळा सांगितले... हे गाणे लावायचे नाही म्हणून ... हे गाणे ऐकलेस कि उगाच रडत बसतोस ... आणि अंधार काय केला आहेस हा खोलीत ??  चल चल उठ.. " आयुषीच्या आवाजाने तो भानावर आला . दिव्याचा उजेड खोलीत पसरला आणि समोर ... पांढऱ्या शुभ्र फ्रॉक मध्ये ... अनुज्ञा ??? ... अनुज्ञा चा भास .. आयुषी !!  ....... अनुज्ञा ने दिलेली अनमोल भेट .....

Thursday, July 8, 2010

कसे सरतील सये

" कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे ....सरताना आणि सांग सलतील ना ? गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर मुसु मुसु पाणी सांग भरतील ना ? "  हे कसे काय समजले  या कवीला ?  ती मला जेव्हा म्हणाली कि " मी लग्न करतीये "  तेव्हा असेच विचार आले मनात  . नोकरी नव्हती मला तेव्हा. आता गाड्या घोडे आहेत तर तीच नाही. पण हो.... मला वाटले होते कि कसे जमेल तिला माझ्याशिवाय जगणे ?  एक दिवस मी गावी घरी गेलो तर रडू बाई व्हायची तिची. मी आलो कि घट्ट मिठी मारून  " मला सोडून देणार नाहीस ना ? "  असे म्हणायची ....ती आज मला सोडून जातेय ?  असे  सगळे वाटलेले मला पण तिने निर्णय घेतला होता. हे सगळे घडले तेव्हा हा कवी तितकासा प्रसिद्ध नसावा. पण त्याने कसे ताडले हे सगळे ? 

त्या दिवशी हे गाणे ऐकून ती नजरेसमोर आली. अगदी तशीच !! तशीच असेल का ती अजून ?? फार नाही ६ वर्षे झालीत तिच्या लग्नाला . पण मी तसाच आहे . तिच्या आठवणीने तिचा सुगंध अनुभवणारा !! तिने दिलेल्या स्वेटर मध्ये तिची उब शोधतोय. पण .....

भेटली होती लग्नानंतर. " आवडलेत ते मला. ठावूक आहे  ? ते माझी खूप काळजी घेतात . पण मला अजून तुझी वाटायची तितकी काळजी नाही रे वाटत त्यांची. असे का हेच कळत नाही आहे .पण .... पण तू गावी गेल्यावर साप पकडलास म्हणालास ना तेव्हा चक्क देव घरातल्या नागोबाला दुधाचा नैवेद्य केलेला मी !!! तसे काहीतरी  यांच्यासाठी करावे वाटते पण ते वेड नाही रे जाणवत माझ्यातून . पण म्हणून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे पण नाही . कळतच नाही.... हे असे मन सैरभैर झाले आहे. ते हवेत पण आणि तू नको पण आहेस . पण ....  वाटते तुझ्यावरचे प्रेम निस्वार्थी होते आणि यांच्यावर माझे प्रेम स्वार्थापोटी आहे.  त्यांना काही झाले तर माझे कोण असे वाटते म्हणून .. पण तसे मला तुझ्या बद्दल पण वाटायचे रे ... नकोच होते प्रेमात पडायला .. हे असले प्रश्न नसते पडले मला. " असे काही पण बरळत होती. प्रेमात पडली तेव्हा अल्लड होती पण आता पोक्त वाटत होती.......खूपच !!वाटले ज्या अल्लड पणावर भाळलो तोच हरवला आहे. आणि जाणवले ती माझी होती ....तेव्हा जी होती... जशी होती.... तशी नाही ......म्हणजे आता ती माझी नाहीच !!!  शरीर... मन ....यापेक्षा त्या जुन्या स्वभावाने  आवडलेली ती माझी नाही.माझी ती आणि आता आलेली ती आता तीच नाही आहे . शरीर तेच पण आत्मा जणू बदलून गेलाय पार !!!

आता मला तिची आठवण येते पण म्हणून मला ती हवी आहे असे नाही आहे. खरे तर आता मी पण मुली पाहतो आहे माझ्यासाठी. पण तिची आठवण अलगद मोर पिसा सारखी स्पर्शून जाते आणि मग तो मखमली स्पर्श  अनुभवत रहावासा वाटतो. 


प्रत्येकाचे पहिल्या प्रेमाच्या बाबतीत असेच होत असेल का  ? हो अर्थात जे लग्न करतात ते नाही पण तरी ...

भूतकाळात काही गोष्टी  अशाही असतात ज्या हव्याशा वाटत असतात .  ते भूतकाळात नेणारे मशीन खरच असते तर किती छान झाले असते असे वाटायला लागते. पण ते केवळ त्या क्षणापुरते वाटते.  भानावर आले कि कळते एक सर बरसून गेली आणि रान हिरवेगार झाले. पण म्हणून ढगाने त्याच रानावर राहायचे आणि कायम बरसत राहायचे असे म्हणून कसे चालेल. कधी न कधी तो पण रिता होईलच ना ? आणि अखंड बरसला तर रानाचा हात थिटा पडेलच ना ??  शेवाळे साचेलंच ना ??


असे होत असेल का प्रत्येकाचे पहिल्या प्रेमाबाबत ?

खूप दिवसांनी तिची आठवण आली .....कारण काल मला भेटलेली मुलगी मला खरच आवडली .  त्या मुलीची तिच्याशी तुलना करण्याची चूक मी केली नाही !! ती चूक तिने केली !! हो..... तिने माझी आणि तिच्या नवऱ्याची तुलना केलेली !!  मी आज भेटलेल्या मुलीला फक्त ती म्हणून पहिले !! तिची तुलना मला आवडलेल्या , मी जिच्या प्रेमात पडलो होतो अशा माझ्या भूतकाळातल्या सौंदर्याबरोबर नाही केली . मी ठरवलंय ..... मी माझ्या आयुष्यात  येईल त्या मुलीला कायम खुश ठेवेन .  पण तिचे सौंदर्य आठवलेच !!  कारण तुलना करायची नाही असा म्हणताना तुलना कशासोबत नाही करायची ह्याचा विचार आलाच मनात ! ठरवले तसे वागताच येत नाही का मला ??  विसरूच शकत नाही आहे मी तिला . म्हणजे मग मी पण तिच्यासारखे वागेन का ?? माझ्या बायकोशी  वागताना कायम तिचा विचार येईल माझ्या मनात ?? भूतकाळ काही असला तरी वर्तमान आहे तेच राहणार आहे हे मला मान्यच होत नाही का  ?? " वाटते तुझ्यावरचे प्रेम निस्वार्थी होते आणि हिच्यावर  माझे प्रेम स्वार्थापोटी आहे. " असे ती मला भेटली कधी तर तिला सांगेन का मी ?? 



पिसाटले मन थाऱ्यावर नाही  येत आहे !! असे का ??? कशामुळे ?? या विचारांमधून बाहेर यायचं आहे मला !!