आज मी निवृत्त झालो ......................
बायको अजुनही कामातच असते . तिच्या नोकरीचे रहाटगाडगे अजुन चालू आहेच ...
अजुन तिची निवृत्ति नाही , अगदी रजोनिवृत्ति नंतर देखिल तिच्या यातना संपलेल्या नाहीत ....
ह्म्म्म आता माझ्या संन्यासाश्रमाला सुरुवात !!!!
असते का असे काही माणसाच्या आयुष्यात ???
संन्याश्याला कधीच भोगावादाची स्वप्न पडत नसतील का ????
सर्वसंन्गपरित्याग कोणी कधी सर्वांगाने केला आहे का ???
नसेलच !!!! नाहीतर मेनका कधी जिंकू शकली नसती. माया आणि मोह यातून सुटका चितेवरच होत असावी!!!
आज पहिल्यांदाच वाटते आहे की खुप पोकळी आली आहे !!! पोकळी इतकी मोठी पण असू शकते असे आजच जाणवत आहे किंवा माझ्या नोकरीने माझ्या आयुष्यात इतकी जागा व्यापलेली की आता जाणीव होण्याइतके रिकामेपण आले आहे.
काय बरे छंद होते मला तरुण असताना ?? डोंगर चढायला जायचो मी. छे !! आता तर जीना पण नही चढवत.
घरातल्या झोपण्याच्या खोलीतले हे पुस्तकांचे कपाट मी आजच उघडतो आहे . आठवते मला तिचे प्रदर्शनात जाणे आणि १०% सूट मिळावी म्हणून धडपड करणे. शनिवारच्या एखाद्या दुपारी मांडलेला रद्दीचा ढीग अजुन तस्सा आठवतोय!! चाळले पाहिजे होते एकदा तरी व.पु. , पु.ल.!!! पण कामातून सवड नव्हती तेव्हा !!
घरासभोवती बागेत हिने किती सुन्दर फुले लावलेली आहेत. आजच ती सुन्दर वाटत आहेत . नाहीतर देवपुजेच्या वेळी परडी मधेच पाहिले मी त्यांना !!! हा फुलांचा वेल आम्हीच आणलेला !!! किती बहर आला आहे त्याला आता !
तिने कसे काय जमवून आणले आहे हे सगळे ? लोन आणि सेविंग्स शिवाय कसलीच गणिते नाही केली मी कधी ! आणि तिने मात्र हसत हसत सगळे कसे चोख बजावले आहे .
बैठकीची खोली !!! हा पडदा घेताना कित्ती वेळ लावला होता तिने !!! पण त्याने किती शोभा आली आहे या खोलीला !!!
कधीही तक्रार नाही ऐकली मी मुलांची आणि मुले मोठी पण झाली !!! त्या पाखरांना पंख फुटत होते तेव्हा मी मात्र उडून अमेरिकेला गेलो. परत आलो तर ती पाखरे आपापल्या दिशेला उडून गेलेली.
हिची अर्ध्या दिवसाची शाळा !! शाळेत मुलांचे नाच बसवता बसवता, घरात किती ठिकाणी नाचावे लागले तिला हे आत्ता समजले.
वेळच्या वेळी चहा पासून पाहुणे आले गेले सगळे कसे केले तिने ???
झोपण्याची खोली !!! इथे पण कधी माझा उत्साह कमी नाही होऊ दिला तिने !!! तिचे सळसळ करणारे केस आठवले तरी " अभी तो में जवान हु " असे वाटायला लागले आहे .
एकेका खोलीला तिने दिलेले अस्तित्व आजच समजते आहे मला .
पण आता आमचा संन्यासाश्रम सुरु होणार !!!
" अहो दारात का उभे ?? जा जाऊंन पड़ा तरी मी आलेच चहा घेउन !! सुट्टीचा पहिलाच दिवस रटाळ गेलेला दिसतोय !! " तिचा आवाज ...............................
पुन्हा पोकळी भरून निघाली. ही पोकळी मला कधीच जाणवू देणार नाही आयुष्यात !!!! तिचे नाजुक हास्य , माझ्या आसमंताला पुरून उरते !!!
" ऐकतेस ??????? बस ना जरा वेळ जवळ ....... "
" इश्श !!! अहो वय काय तुमचे ??? " खुदकन हसताना तिचा लालेलाल झालेला चेहरा !!!! आणि आणि मला झालेली तिच्यातल्या प्रेयसीची जाणीव !!!!
संन्यासाश्रम नसतोच मुळी !!!!
मेनका आहे तोवर संन्यासाश्रम नाही !!! आणि तीच जिंकणार !!!
मी संन्यास आत्ता तरी नाही घेत !!!!
Khare aahe he.
ReplyDeleteAani yaat strila kadhihi n milnari vishranti dakhavli aahes...
Chhan..